For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एनएच-66’च्या वेर्णा ते नुवे जुन्या भागाचा विस्तार रद्द करावा

12:35 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘एनएच 66’च्या वेर्णा ते नुवे जुन्या भागाचा विस्तार रद्द करावा
Advertisement

प्रतिनिधी मंडळाची खासदार विरियातो फर्नांडिस यांच्याकडे मागणी

Advertisement

मडगाव : नुवेच्या रहिवाशांसह व्यावसायिक, परिसरातील मालक-भाडेकरूंनी एनएच-66 च्या जुन्या भागातील फादर आग्नेल आश्रम, वेर्णा ते कार्मेल कॉलेज नुवे या रस्त्याच्या विस्ताराबाबत शुक्रवारी दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची भेट घेतली आणि हा विस्तार रद्द करण्याची विनंती केली. यावेळी खासदारांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बगलरस्ता, राज्य सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आलेले रस्ते आणि महामार्ग यावरून सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. त्यामुळे फा. आग्नेल आश्रम, वेर्णा ते कार्मेल कॉलेज, नुवेपर्यंत एनएच-66 च्या जुन्या भागाचे ऊंदीकरण टाळणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

काँग्रेस नेते एव्हर्सन वालीस यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने खासदारांचे लक्ष वेधताना सांगितले की, सुमारे अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या जुन्या भागात प्राथमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालयासारख्या शैक्षणिक संस्था आहेत. या रस्त्याचे आणखी ऊंदीकरण केल्यास विद्यार्थी तसेच पालक आणि अन्य रहिवाशांना रस्ता ओलांडताना धोका निर्माण होईल. रस्ता ऊंदीकरणामुळे विद्यमान वीजवाहिन्या, दूरसंचार केबल्स तसेच जलवाहिनीसारख्या व्यवस्थेवर परिणाम होईल, असे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. पश्चिम बगलरस्ता असूनही वरील जुना मार्ग ऊंद करण्याच्या योजनेमुळे मार्गावर कोणतेही मूल्यवर्धन होणार नाही. कारण मोठ्या प्रमाणात रहदारी आधीच नवीन पश्चिम बगलरस्ता एनएच-66 वर वळली आहे, असे या निवेदनातून नजरेस आणून देण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.