For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्षेत्रज्ञ हा एक असून, नाना प्रकारांनी भासमान होणारा असतो

06:24 AM May 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
क्षेत्रज्ञ हा एक असून  नाना प्रकारांनी भासमान होणारा असतो
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

रागलोभादि भावना हे मनाचे विकार म्हणजे आजार आहेत. जो मनुष्य त्यांच्यावर विजय मिळवतो त्याला क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार समजतात व त्यानुसार त्याची इतरांच्याबरोबर वागणूक होत असते. कारण त्याला इतरांच्यातला ईश्वर स्पष्ट दिसत असतो. क्षेत्र म्हणजे देह, हा देह पंचमहाभूतापासून तयार होतो आणि ईश्वर त्यात आत्म्याच्या रूपात वास करत असतो व शरीराचं सुनियोजितपणे संचालन होण्यासाठी प्राणशक्ती पुरवत असतो. म्हणून त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. हा क्षेत्रज्ञ सर्वव्यापी असून तो संपूर्ण विश्वाचे पालनपोषण करत असतो. क्षेत्रज्ञाची म्हणजे परमात्म्याची वैशिष्ट्यो याप्रमाणे आहेत. तो अनादि, इंद्रियरहित, गुण भोगणारा पण गुणांनी विरहित, अव्यक्त, सत् व असत या दोहोहूनहि वेगळा, इंद्रिये व त्यांचे विषय प्रकाशित करणारा, विश्वाचे पालन करणारा, सर्वव्यापी असतो. आता पुढील वैशिष्ठ्यांबद्दल विचार करू.

क्षेत्रज्ञ हा एक असून, नाना प्रकारांनी भासमान होणारा असतो. वास्तविक पाहता आपण सर्व त्याच्यापासूनच तयार झालेलो आहोत म्हणजे त्याच्या कुळातच आपला जन्म झालेला आहे. याचा अर्थ असा की, आपल्या सर्वांच्या रूपाने तोच एक सर्वत्र वावरत आहे. म्हणून आपण सर्व भासमान होणारी त्याचीच रूपे आहोत, भासमान म्हणायचं कारण म्हणजे त्याचं एकट्याचं अस्तित्व हेच सत्य असून इतर सर्व केवळ समोर दिसतायत म्हणून आहेत म्हणायचं एव्हढंच! क्षेत्रज्ञ हा एकमेव असून, एकसंधपणे तो सर्व सृष्टी व्यापून राहिलेला आहे. त्यामुळे तो आतून, बाहेरून परिपूर्ण आहे. नजरेला दिसत असलेल्या सर्व वस्तू ही त्याचीच निर्मिती असून त्या सर्व नाशवंत आहेत. त्यामुळे या वस्तूंच्या निर्मितीआधी, अस्तित्वात असताना व त्यांचा नाश झाल्यावर केवळ तो एकटाच होता, आहे आणि राहील असा असल्याने त्याला बाप्पांनी तो संगरहित आहे असे म्हंटले आहे. अंधकाराच्या पलीकडे असलेले, अति सूक्ष्मत्वामुळे जाणण्याला कठीण असे क्षेत्रज्ञाचे स्वरूप असते. इंद्रिये, मन, बुद्धीने त्याला जाणता येत नाही. ज्यांना परमतत्वाचे ज्ञान नाही त्यांना परमात्मा दिसत नाही. ज्यांना ज्ञान झाले आहे त्यांना तो एकच एक सर्वत्र भरून राहिलेल्याची जाणीव होते. सूर्य चंद्रासारख्या इतरांना प्रकाशमान करणाऱ्या वस्तूंना देखील प्रकाशित करण्याचे सामर्थ्य क्षेत्रज्ञात असते. सर्व विश्वाला प्रकाशमान करण्यासाठी सूर्य, चंद्राची योजना क्षेत्रज्ञाने केलेली आहे, तरीही या सर्वांपासून तो अलिप्त असून त्याचे राहण्याचे ठिकाण या सगळ्यांच्या पलीकडे आहे. त्याला प्रकाशित करण्यासाठी सूर्य चंद्राची आवश्यकता नाही. तोच एकमेव असा आहे की, त्याच्यात कोणतीही न्यूनता नाही.

Advertisement

क्षेत्रज्ञाची संपूर्ण माहिती बाप्पांनी आपल्याला समजाऊन सांगितली पण ती नुसती वाचून आपण त्याच्या सामर्थ्याची कल्पना करू शकत नाही. कारण तो निर्गुण आणि निराकार आहे. त्याला समजून घेऊन त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी सर्व संतमहात्म्यांनी नामस्मरण साधना करणं हा उत्तम उपाय आहे, असा निर्वाळा दिलेला आहे. संतांचं सांगणं हे आधी केले मग सांगितले अशा पद्धतीचे असते. त्यांनी ईश्वर समजून घेतला आणि प्राप्तही करून घेतला. पण सर्वांना निर्गुण निराकार ईश्वर सहजी समजणं आणि प्राप्त होणं शक्य नाही हे ओळखून संतांनी त्याला सगुणात आणला. त्यांनी चिंतनातून त्याचं सगुण रूप साकार केलं आणि त्यावर लक्ष केंद्रित करून त्याचं नाम अत्यंत आवडीने घ्या असा सर्वांना उपदेश केला. नाम घेण्याचा मुख्य उद्देश असा की, मनुष्य जसजसा नामस्मरणात रंगून जातो तसतसे ईश्वराचे सगुण रूप त्याच्या डोळ्यासमोर ठाण मांडून उभे राहते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.