ठाकरे सेनेच्या अस्तित्वाला धक्का, शिंदे सेनेचा उदय
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालात राज्यात महायुतीने अभूतपूर्व यश मिळविले आहे. त्यात कोकणातीलही शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला, असे म्हटले जात आहे. परंतु शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळलेला नसून ठाकरे सेनेचा अस्त होऊन शिंदे सेनेचा उदय झाला आहे. जनतेनेच खरी शिवसेना कोणाची हे दाखवून दिले आहे, असे म्हणता येईल. विधानसभेच्या निकालाने ठाकरे सेना उद्ध्वस्त होऊन त्यांना आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. संघटना टिकवून आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका) निवडणुकांमध्ये अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उबाठा सेनेसमोर निर्माण झाले आहे.
विधानसभा निवडणुकीतील 1972 पासूनचा कोकणातील इतिहास पाहता, कोकण हा कधी काँग्रेस, कधी समाजवादी, तर कधी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. परंतु, काही ठराविक वर्षांनी त्याचा अस्त होत गेला. सुऊवातीला काँग्रेस नंतर समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता. मात्र, 1990 नंतर कोकणात शिवसेनेने शिरकाव करत पुढे जाऊन कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आणि हा बालेकिल्ला अजूनही टिकून आहे. फक्त नेतृत्व बदललेले आहे. म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा अस्त होऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उदय झालेला आहे. पुढील काळात हीच शिवसेना किती काळ राहील किंवा भाजपचा बालेकिल्ला होईल हे आताच सांगणे शक्य नाही. मात्र, राजकीय उलथापालथी होत असतात. हे पुन्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. त्यात कोकणही अपवाद नाही. कोकणातही महायुतीची महासरशी झाली असून महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला आहे.
कोकण प्रांत हा मुंबईपासून सुरू होत असला, तरी तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही ग्रामीण जिल्ह्यांना वेगळे महत्त्व आहे. या दोन्ही जिल्ह्यांत मिळून विधानसभेच्या 8 जागा आहेत. या आठ जागांवर महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर महायुतीला सात जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजप व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक-एक जागा मिळाली. उर्वरित पाच जागा शिंदे शिवसेनेला मिळाल्या आहेत. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने कोकणचा बालेकिल्ला गमावला आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने हा बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. त्यामुळे कोकणात ठाकरे सेनेचा अस्त होऊन शिंदे सेनेचा उदय झाला, असे म्हणता येईल.
खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर शिंदे सेनेचाच हक्क होता. परंतु त्यांच्याकडे निवडणुकीला सामोरे जाऊ शकणारा प्रभावी चेहरा नसल्याने भाजपला जागा देऊन नारायण राणे विजयी झाले. त्यामुळे भाजप लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जास्तीच्या जागा घेणार, असे वाटत होते. परंतु शिंदे सेनेने आपला दावा न सोडता, आठ पैकी सहा जागांवर आपला दावा कायम ठेवत, तेवढ्या जागा लढल्या. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यातील एकमेव गुहागरची जागा त्यांना गमवावी लागली. बाकीच्या पाचही जागांवर विजय मिळविला आणि शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत ठेवला.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत शिंदे सेनेच्या योगेश कदम यांनी ठाकरे सेनेच्या संजय कदम यांचा मोठा पराभव केला. भाजपशी मनोमिलन झाल्याचा योगेश कदम यांना फायदा झाला. चिपळूणमध्ये अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम थोड्या फरकाने निवडून आले. संगमेश्वर तालुक्याने दिलेली साथ आणि एक गठ्ठा मुस्लिम मते महाविकास आघाडीकडे जाण्यापासून रोखण्यात त्यांना यश आले. रत्नागिरीतील शिंदे सेनेच्या उदय सामंत यांनी एकतर्फी विजय मिळविला. ऐनवेळी भाजपच्या बाळ माने यांना आपल्याकडे घेऊन उमेदवारी देण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयोग अयशस्वी ठरला. राजापुरात विद्यमान आमदार असलेल्या ठाकरे सेनेच्या राजन साळवी यांचा शिंदे सेनेच्या किरण सामंत यांनी पराभव केला. रत्नागिरी-गुहागरची एकमेव जागा शिवसेना ठाकरे पक्षाच्या अर्थात महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली. तीही भास्कर जाधव यांचा वैयक्तिक करिष्मा आणि मतदारसंघावरील असलेली पकड त्यांच्यासाठी फायद्याची ठरली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीतून भाजपचे नीतेश राणे आणि सावंतवाडीतून शिवसेनेचे दीपक केसरकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले. नीतेश राणे यांची मतदारसंघावर असलेली पकड आणि विरोधात असलेल्या ठाकरे सेनेच्या उमेदवाराची मोठी ताकद नसल्याने नीतेश राणेंचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल हे अपेक्षितच होते. परंतु, केसरकर यांच्यासमोर चौरंगी लढत होती आणि सर्वच उमेदवारांनी त्यांना आरोप-प्रत्यारोपांनी घेरले होते. मात्र, त्यांनी संयमी भूमिका घेत अनपेक्षितपणे मोठे मताधिक्य मिळवित सर्वांनाच धक्का दिला. कुडाळमध्ये ठाकरे सेनेचे आमदार असलेले वैभव नाईक आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र, भाजपमधून शिंदे शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाणावर निवडणूक लढविणाऱ्या नीलेश राणे हे राणे फॅक्टरच्या बळावर आमदार झाले.
कोकणात महायुतीने मिळविलेल्या यशामागे अनेक फॅक्टर आहेत. जसे की, राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ गेम चेंजर ठरली, तशी ती कोकणातही ठरली. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे फॅक्टरही चालला, असेही म्हणता येईल. नारायण राणे खासदार झाल्यानंतर त्यांच्या मुलांना तिकीट देताना घराणेशाहीचा आरोप झाला. असे असतानाही नीतेश व नीलेश या राणेंच्या दोन्ही मुलांनी निवडणूक जिंकली. त्यामुळे राणे फॅक्टर चालला हे स्पष्टच होते. रत्नागिरी जिल्ह्यातही सामंत बंधूंनी सामंत विकास फॅक्टर चालवून दाखवित उदय सामंत व किरण सामंत या दोन्ही बंधूंनी विजयी होऊन दाखवून दिले. कोकणात शिंदे सेनेने आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला असला, तरी तो शाबूत ठेवण्यासाठी भाजपने ठाकरे सेनेला रोखण्याची रणनीती आखून शिंदे सेनेला मनापासून साथ दिली. गेल्या दोन वर्षांपासून भाजपचे बूथ लेवलपासून मायक्रो प्लानिंग सुरू होते. तेही लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत कामी आले. संघ परिवाराने ही नियोजनबद्धरित्या हिंदुत्वाचा मुद्दा ग्रामस्तरापर्यंत पोहोचविला. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभांमध्ये महायुतीच्या नेत्यांवर आरोपांची राळ उठविली. विशेषत: नारायण राणेंवर जोरदार टीका करूनही राणे यांनी त्यांना जशास तसे प्रत्युत्तर न देता, संयमाने उत्तर दिले. शांत व संयम पाळणे त्यांना फायद्याचे ठरले. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महायुती सरकार अनेक विविध प्रकल्प आणू पाहत आहे. पण ठाकरे सेना कायम विरोध करत असल्यानेच कोकणचा विकास रखडल्याचे वारंवार सांगून प्रचारात महत्त्वाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवून विकासाला साथ देण्याचे आवाहन महायुतीने केले. त्यामुळे मतदारांनी विकासाच्या बाजूने साथ दिली. हे सर्व फॅक्टर चालल्यानेच विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला भरभरून साथ दिली, असे म्हणता येईल.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश पाहता, कोकणातील आठ पैकी फक्त एकच विरोधातील आमदार निवडून आला आहे. त्यामुळे पुढील काळात विकास प्रकल्पांना विरोध झाल्यास सत्ताधाऱ्यांना तो विरोध मोडून काढणे बहुमताने सोपे होणार आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीच्या आमदारांना कोकणात विकास प्रकल्प आणून कोकणचा विकास करून दाखवावा लागेल. रोजगार निर्माण करून कोकणातील तऊणांचे नोकरीसाठी होणारे स्थलांतर थांबवावे लागेल. तरच आगामी निवडणुकांमध्ये कोकण साथ देईल, अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.
कोकणातील जनता नेहमीच शिवसेनेच्या बाजूने राहिली आहे. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेला धक्का देत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुऊंग लावला, असे आपण म्हणत असलो तरी, या कोकणने शिवसेनेची साथ सोडलेली नाही. कोकणाने फक्त ठाकरे सेने ऐवजी शिंदे सेनेला साथ दिलेली आहे. त्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या ठाकरे सेनेचा अस्त होऊन शिंदे सेना कोकणात उदयास आली आहे. त्यामुळे ठाकरे सेनेसमोर आपली संघटना टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्याने संघटनेतील पदाधिकारी सत्तेशिवाय किती काळ साथ देतील हा मोठा प्रश्न आहे. तसेच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान ठाकरे सेनेसमोर निर्माण झाले आहे.
संदीप गावडे