For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्मज्ञानी माणसाला सगळ्यांच्यातलं ब्रह्माचं अस्तित्व ठळकपणे दिसत

06:11 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
आत्मज्ञानी माणसाला सगळ्यांच्यातलं ब्रह्माचं अस्तित्व ठळकपणे दिसत
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

भगवंत म्हणतात, ज्ञान अज्ञानाने आच्छादलेले असले की, आत्मस्वरूपाचा विसर पडून माणसाला समोर दिसणाऱ्या गोष्टींचा मोह होतो. ह्याउलट ज्याचे अज्ञान नाश पावले आहे, त्याला आत्मज्ञानामुळे वस्तू आहे तशी दिसू लागते. अज्ञानी जीवाना समोर दिसणाऱ्या वस्तू कधी ना कधी नाश पावणार आहेत हे लक्षात न आल्याने त्यांना तिचा मोह पडतो. त्यांचे अज्ञान जेव्हा संपूर्ण नाहिसे होते, त्यावेळेला सर्व ब्रह्मव्याप्त आहे हे लक्षात येते. बुद्धी सदैव परब्रह्माच्या चिंतनातच रंगलेली असते. त्याच्याशी ते इतके एकरूप होतात की, त्यांना आपणच ते परब्रह्म आहोत असे वाटू लागते. त्या लोकांना पुनरपि संसार प्राप्त होत नाही कारण आत्मज्ञानाच्या योगाने त्यांचे दोष नाहिसे झालेले असतात. असे व्यापक ज्ञान ज्यांना प्राप्त झाले आहे त्यांची दृष्टी सम होते. त्यामुळे ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षतेने ते करतात. ज्याप्रमाणे सूर्याला अंधार माहित नसतो किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही वा उष्णता कशी असते हे चंद्राच्या लक्षात येत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी लोकांना भेदभाव कशाला म्हणतात ते समजत नाही. भेदभावामुळे हा आपला, तो परका असे विचार माणसाच्या मनात येतात आणि त्यानुसार तो ज्याला आपला समजतो. त्याची लायकी नसली तरी त्याला झुकते माप देतो आणि परक्या माणसाला लायकी असूनसुद्धा डावलतो. हे सर्व समोर दिसणारी दुनिया खरी आहे आणि मी कर्ता आहे ह्या अज्ञानामुळे झालेल्या गैरसमजुतीतून घडत असते.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, विद्या व विनय यांनी युक्त असलेली ब्राह्मण व्यक्ती, गाय, हत्ती, तसेच कुत्रा आणि कुकर्म करणारे लोक या सर्वांकडे तत्वज्ञ सारख्याच नजरेने पाहते.

Advertisement

विद्या-विनय-संपन्न द्विज गाय तसा गज । श्वान चांडाळ हे सारे तत्त्व-ज्ञ सम पाहती ।। 18 ।।

आत्मज्ञानी माणसाला सगळ्यांच्यातलं ब्रह्माचं अस्तित्व ठळकपणे दिसत असतं, त्यामुळे तो वस्तू किंवा प्राण्यात बिलकुल फरक करत नाही. त्याला समोरची वस्तु किंवा प्राणी वेगवेगळे दिसत नसून सर्वत्र फक्त परब्रह्माचीच उपस्थिती आहे हे जाणवत असतं. सहाजिकच त्याला हे चिलट, हा हत्ती, चांगली, वाईट कर्मे करणारी  माणसे किंवा हा आपला मुलगा आणि पलीकडे असलेला तो परका, हे सगळे सारखेच वाटतात कारण त्यांच्यातील परब्रह्माच्या अस्तित्वामुळे एकच ईश्वर विविध रूपांनी वावरतो आहे असे त्यांना वाटते. प्रल्हादाची गोष्ट स्मरली की, ही बाब लगेच लक्षात येते. प्रल्हादाला जेव्हा त्याच्या वडिलांनी म्हणजे हिरण्यकश्यपुने विचारले की, तुझा देव सगळ्यात आहे म्हणतोयस तर तो ह्या समोरच्या निर्जीव खांबात आहे का? तेव्हा त्याने छातीठोकपणे सांगितले होय आहे कारण त्यात तो असल्याचे त्याला स्पष्टपणे दिसत होते. हिरण्यकश्यपूने तिरीमिरीने जाऊन त्या खांबाला लाथ मारली आणि श्रीविष्णु नृसिंहअवतारात त्या खांबातून प्रकट झाले आणि त्यांनी प्रल्हादाचे बोल खरे ठरवून दाखवले.

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, ज्यांना आत्मज्ञान झालेले नाही ते हे जग खरे मानत असतात. प्रत्यक्षात हे खरे नसल्याने हे एक स्वप्न आहे असे समजले तरी चालेल कारण स्वप्नातल्या गोष्टी जाग आली की नाहीशा होतात. विशेष म्हणजे मनुष्य त्याबद्दल सुख वा दु:ख मानत नाही. आत्मज्ञान झालेला योगी मात्र सदैव आध्यात्मिकदृष्ट्या जागाच असल्याने तो हे जग खरे असल्याचे स्वप्न पहात नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.