कार्यकारी अध्यक्षांचीही झाली हकालपट्टी
दक्षिण कोरीया संसदेत हान विरोधात मतदान
► वृत्तसंस्था / सोल
दक्षिण कोरीया या देशात अध्यक्षांच्या हकालपट्टीपाठोपाठ कार्यकारी अध्यक्षांचीही त्यांच्या पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. या देशाच्या संसदेत शुक्रवारी त्यांच्या विरोधात बहुसंख्य सदस्यांनी मतदान केल्याने त्यांना पद सोडावे लागणार हे निश्चित झाले आहे. हान डक सू असे या कार्यकारी अध्यक्षांचे नाव आहे.
14 डिसेंबर 2024 या दिवशी दक्षिण कोरीयाचे अध्यक्ष यून सुक येओल यांना पदत्याग करावा लागला होता. त्यांच्या विरोधात तेथील संसदेत महाभियोग चालविण्यात आला होता. या महाभियोगावरील चर्चेनंतर झालेले मतदान त्यांच्या विरोधात गेल्याने त्यांना पद सोडावे लागले होते. त्यांनी देशात आणीबाणी लागू करुन मार्शल लॉ आणला होता. मात्र, जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्या तीव्र विरोधातमुळे त्यांना तो सहा तासांमध्ये मागे घ्यावा लागला. तरीही त्यांच्या विरोधात महाभियोग चालविण्यात आला होता. त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली होती.
कार्यकारी अध्यक्षही त्याच मार्गाने
येओल यांच्यानंतर कार्यकारी अध्यक्ष म्हणून सू यांची निवड करण्यात आली होती. तथापि, त्यांच्याही विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणण्यात आला. या प्रस्तावावर शुक्रवारी मतदान झाले. या मतदानात त्यांचीही गत अध्यक्षांप्रमाणेच झाली. मतदान विरोधात गेल्यानंतर त्यांनी त्वरित पदत्याग केला. आता त्यांच्याजागी कार्यकारी अध्यक्ष म्हणून दक्षिण कोरीयाचे अर्थमंत्री चोई-सँग-मॉक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि, ते तरी या पदावर किती काळ राहतील, याची शाश्वती नाही, अशी स्थिती आहे. हा देश सध्या राजकीय अस्थिरतेच्या काळातून जात आहे. केवळ दोन आठवड्यांच्या काळात या देशात दोन वरीष्ठ नेत्यांची हकालपट्टी झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.