अनन्य योगी नेहमी परमपुरुषाचे चिंतन करत असतात
अध्याय आठवा
भगवंत म्हणाले, मी मांडलेला विश्वाचा प्रपंच विनाशी असून मिथ्या आहे हे लक्षात आलेले योगी नित्य अशा परमपुरुषाचे ठायी अनन्य होऊन स्मरण करतात. त्याचे नित्य स्मरण करणाऱ्याचे चित्त त्याच्याशी एकरूप झाल्याने त्याला जाणवणारा जन्ममरणाचा शीण तो आपोआपच विसरतो. तो ज्या परमपुरुषाचे स्मरण करतो त्याचे वर्णन पुढील श्लोकात भगवंत करत आहेत. त्याची वैशिष्ठ्यो सांगताना ते म्हणतात, तो सर्वज्ञ असून, पुरातन कालपासून विश्वाचा नियंता आहे, अणूहून लहान असून, सर्वस्थूलसूक्ष्म जगाचा आश्रय आहे. त्याचे स्वरूप कल्पनेने दिसण्यासारखे नाही. तो सूर्याप्रमाणे प्रकाशरूप असून, अज्ञानरूप अंधाराच्या पलीकडे तो असतो
सर्वज्ञ कर्ता गुरू जो पुराण । सूक्ष्माहुनी सूक्ष्म अचिंत्य-रूप । गिळूनि अंधार उजेडला जो । तो चिंतुनीया प्रभु सूर्य-
वर्ण ।। 9।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, परमपुरुषाचे अस्तित्व आकाराशिवाय आहे, तो जन्ममृत्युरहित असून तो सर्वव्यापी आहे. तो आकाशाहून पुरातन आहे आणि परमाणुपेक्षाही लहान असून ज्याच्या सांनिध्याने विश्वाची हालचाल होते. त्याच्यामुळे विश्वाची निर्मिती, पालन आणि संहार होतो. तर्काने त्याची कल्पना करता येत नाही. विस्तवाला जशी वाळवी लागत नाही, त्याप्रमाणे स्वरूपप्रकाशाच्या ठिकाणी अज्ञानरूप अंधाराचा टिकाव लागत नाही. परमपुरूष स्वभावत: ज्ञानाच्या प्रकाशाने तेजस्वी असला तरी मायेने झाकला गेलेला असल्याने सामान्य माणसाच्या दृष्टीने अंधारात असल्यासारखा असतो. सामान्य माणसाच्या दृष्टीने तो अंधारात असला तरी त्याच्याभोवतालचे मायेचे पटल हटावे म्हणून जे त्याला शरण जातात त्यांच्यावर त्याची कृपा होऊन त्यांना आत्मज्ञान होते. त्यांना मात्र तो परमपुरुष चैतन्यपूर्ण असलेल्या स्वच्छ सूर्यरूपी कणांच्या ढिगासारखा कायम समोर दिसत असल्याने त्याचा कधीही अस्त होत नाही.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, ज्यांना परमपुरुषाचे नित्य दर्शन होत असते ते मरणसमयी एकाग्र मनाने, भक्तीने व योगबलाने युक्त होऊन, दोन भुवयांच्यामध्ये प्राणवायूची योग्य प्रकारे स्थापना करून त्याचे स्मरण करतात आणि त्या तेजस्वी परम पुरुषाप्रत
जातात.
प्रयाण-काळी स्थिर चित्त राखे । प्रेमे तसा योग-बळे कसूनि? भ्रू-संगमी प्राण जडूनि ठेवी । तेंव्हा मिळे त्या पुरुषास
दिव्य ।।10।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अनन्य योगी नेहमी परमपुरुषाचे चिंतन करत असतात. त्यामुळे त्याची आठवण त्यांना मृत्यूसमयीही येते. त्याच्या समाधी घेण्याचे वर्णन करताना माउली म्हणतात, मृत्यूसमयी योगी पद्मासन घालून, उत्तरेकडे तोंड करून बसतात. कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख ते अंत:करणात साठवतात. आता मन एकाग्र झाल्याने व आत्मस्वरूपप्राप्तीच्या प्रेमाने त्याचा ईश्वराप्रती जाण्याचा सर्वांग सोहळा सुरू झालेला असतो.
क्रमश: