अधिवेशनाची चाहूल अन् स्वतंत्र राज्याची हूल
स्वतंत्र राज्याच्या मागणीचे आमदार कागेंचे पत्र : आंदोलन उभारण्याचा इशारा
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाआधीच स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याच्या चर्चेने वेग धरला आहे. सत्ताधारी काँग्रेसचे आमदार राजू कागे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दक्षिणेच्या तुलनेने उत्तर कर्नाटकाचा विकास झाला नाही. त्यामुळे स्वतंत्र राज्याची घोषणा करा, अशी मागणी केली होती. आता उत्तर कर्नाटक विकास मंचचे अध्यक्ष अशोक पुजारी यांनीही स्वतंत्र राज्यासाठी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या विकासावर ठोस निर्णय घेतला नाही तर जानेवारी 2026 पासून स्वतंत्र राज्यासाठी आंदोलन सुरू करण्याचा इशारा अशोक पुजारी यांनी दिला आहे.
उत्तर कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. तरीही उत्तर कर्नाटक विकासात मागे आहे. दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावला होते. यंदा तरी विकासाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय घ्यावा. केवळ चर्चेपुरतेच मर्यादित न राहता प्रत्यक्ष विकासाला चालना मिळावी. उत्तर कर्नाटकातील पाणी योजना, शेतकऱ्यांच्या समस्या, तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आयटी उद्योग क्षेत्राला प्राधान्य द्यावे. याबरोबरच उत्तर कर्नाटकाचा सर्वांगीण विकास होईल, यासाठी आवश्यक योजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी मंत्री कै. उमेश कत्ती यांनी स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची मागणी केली होती. त्यावेळी संपूर्ण राज्यातून त्यांना विरोध झाला होता.
त्यांच्या निधनानंतर आता कागवाडचे आमदार राजू कागे यांनी स्वतंत्र राज्याची मागणी करीत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मात्र तो त्यांचा वैयक्तिक अभिप्राय आहे, असे सांगत या वादातून अंग काढून घेतले आहे. ए. एस. पाटील-नडहळ्ळी यांनीही विधानसभेत दक्षिण व उत्तर कर्नाटकाच्या विकासात असलेली तफावत अधोरेखित केली होती. पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, लघुपाटबंधारे, कृषी आदी विविध खात्यांचा लेखाजोखाच त्यांनी मांडला होता. सरकारी शाळांची संख्याही दक्षिणेत अधिक आहे, याकडे लक्ष वेधले होते. अधिवेशन जवळ आले की उत्तर कर्नाटकाच्या विकासाचा मुद्दा ठळक चर्चेला येतो. तसे यंदाच्या अधिवेशनाच्या तोंडावरही तो मुद्दा चर्चेला आला असला तरी विकास करा नहून स्वतंत्र राज्यासाठी आंदोलन सुरू करू, असा इशारा दिल्यामुळे तो आता कळीचा ठरत आहे.