दिग्गजांची ‘परीक्षा’ !
‘टी-20’ विश्वचषक जिंकल्यानंतर फॉर्मात आलेल्या भारतीय संघाची खरी हवा काढली ती मायदेशात ‘व्हाईटवॉश’ सहन करायला लावणाऱ्या न्यूझीलंडनं...यातही विशेष सलणारी बाब राहिली ती दिग्गज विराट कोहली नि कर्णधार रोहित शर्माचं अपयश. यामुळं त्यांची कसोटी कारकीर्द संपत आलीय की काय अशी चर्चा सुरू होण्यापर्यंत मजल गेलीय...आता खडतर ऑस्ट्रेलिया दौरा उंबरठ्यावर असताना दोन्ही अफलातून फलंदाजांपुढं आव्हान असेल ते त्या निराशाजनक कामगिरीतून उसळी घेण्याचं...
29 जून, 2024...बार्बाडोसमधील ती दुपार आठवतेय ?...त्या दिवशी भारतानं ‘टी-20’ स्पर्धेचा विश्वचषक जिंकला अन् या पिढीतील त्या दोन सर्वोत्तम भारतीय फलंदाजांचं स्वप्न पूर्ण झालं...मायदेशात आपला क्रिकेटचा ध्वज सतत फडकणार याची काळजी घेणाऱ्या त्या दोन झुंजार योद्ध्यांनी त्यानंतर वेळ न गमावता अर्ध्या तासाच्या अंतरानं आंतरराष्ट्रीय ‘टी-20’मधून निवृत्ती जाहीर केली. कारण त्यांना एकदिवसीय व कसोटी सामने या क्रिकेटच्या अन्य दोन प्रकारांत प्रतिस्पर्ध्यांचा फडशा पाडण्याची संधी मिळेल याची खात्री होती...परंतु त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्पर्धा व अनिश्चितता किती तीव्र असते याची कल्पना येण्यास फारसा वेळ लागला नाही...
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पाय ठेवणार तेव्हा जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळणं बरंच कठीण झालेलं असेल असं स्वप्नात देखील त्यांना वाटलेलं नसेल...रोहित शर्मा नि विराट कोहली...दोन दिग्गज फलंदाज...रोहित भारतीय भूमीवर ‘व्हाईटवॉश’चं दर्शन घेणारा पहिलावहिला कर्णधार ठरलाय, तर विक्रमांचे डेंगर सातत्यानं रचणाऱ्या विराटला गेल्या सहा कसोटी सामन्यांत केवळ 250 धावांची नोंद करता आलीय ती 22.72 सरासरीनं...त्या दोन्ही खेळाडूंनी रवींद्र जडेजा नि रविचंद्रन अश्विन यांच्या सहकार्यानं भारताला मायदेशात हरविणं कुणालाही शक्य होणार नाही याची मागील एका तपापासून नि 18 कसोटी मालिकांत आत्मविश्वासानं काळजी घेतली. परंतु ‘अनप्रेडिक्टेबल’, कुठल्याही वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता असलेला न्यूझीलंडचा संघ भारतात पोहोचला अन् झाला तो रंगाचा बेरंग...
भारताची येऊ घातलेली मायदेशातील मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध ऑक्टोबर, 2025 मध्ये होणार असल्यानं रोहित शर्मा नि विराट कोहली यांना त्यात खेळण्याची संधी मिळेल की नाही याचं भविष्य वर्तविणं आताच शक्य नाहीये. कारण रोहित 37 वर्षांचा झालाय, तर विराटनं 5 नोव्हेंबर रोजी 37 व्या वर्षात पाऊल ठेवलंय...भारत 2012 सालच्या हिंवाळ्यात इंग्लंडनं 2-1 असं हरविल्यानंतर मायदेशात तब्बल 55 कसोटी सामने खेळला अन् त्यापैकी चक्क 42 लढतींत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली, तर फक्त सहा सामन्यांत त्यांना पराभवाचे कडू घोट गिळावे लागले...
2020 नंतर विराट कोहलीला आशियाई खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंविरुद्ध अवघ्या 28 च्या सरासरीच्या आसपास पोहोचता आलंय. महान कोहलीला फिरकी गोलंदाजांचा टप्पा ओळखणं कसं जमत नाही ते छानपणे दाखवून दिलं ते न्यूझीलंडविरुद्धच्या पुण्यातील कसोटीच्या दोन डावांमध्ये सँटनरनं. या दशकाला सुरुवात झाल्यानंतर तो 34 कसोटी सामन्यांत खेळलाय नि त्याला फटकावणं जमलंय सुमारे 32 च्या सरासरीनं केवळ 1838 धावा. त्यात समावेश पाच भोपळ्यांचा अन् तब्बल 10 एकेरी धावसंख्यांचा...
रोहित शर्माला देखील आशियाईतील खेळपट्ट्यांवर सर्व प्रकारच्या गोलंदाजांसमोर सुमारे 36 च्या सरासरीनंच धावा काढणं जमलंय. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत स्वत:ला प्रस्थापित केल्यानंतर 2022 मधील ऑस्ट्रेलियातील ‘टी-20’ विश्वचषकापासून अचानक भारतीय कर्णधारानं आपल्या फलंदाजीची शैली बदलली आणि तो प्रत्येक चेंडू फटकावण्याचा प्रयत्न करू लागला. त्या भरात लय मात्र बिघडली आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे न्यूझीलंडविरुद्धची मालिका नि टीम साउदीनं बेंगळूर कसोटीत मिळविलेला त्याचा बळी...अॅडलेडनंतर (ऑस्ट्रेलिया) रोहित शर्मा 33 कसोटी सामन्यांत खेळलाय अन् त्यानं 50 पेक्षा जास्त चेंडूंना केवळ 14 वेळा तेंड दिलंय...
दस्तुरखुद्द कर्णधारच खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न करत नसल्यानं त्याचा परिणाम आपोआपच झालाय तो सहकाऱ्यांवर. त्यांनीही कारखाना उघडलाय तो डोकं फारसं न चालविता केलेल्या फटकेबाजीचा...विराट कोहलीच्या वयाचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाचा दौरा म्हणजे एक फार मोठं आव्हानच. कारण दिलीप वेंगसरकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, राहुल द्रविडसारख्या महान फलंदाजांची कारकीर्द संपविली ती धूर्त कांगारुंनीच. या पार्श्वभूमीवर कोहलीच्या असंख्य चाहत्यांना त्याच्या बाबतीत तरी याची पुनरावृत्ती होऊ नये असं निश्चितच वाटेल...
दिग्गज समालोचकांच्या मते, विराट कोहलीत क्षमता आहे ती घोंगावत येणाऱ्या तुफानाला परतवून लावण्याची. त्याचा कणखरपणा अन् धावा काढण्याची भूक त्याला अजूनही पुढं नेऊ शकते यात शंका नाही. विराटनं पहिल्या कसोटी शतकाची नोंद केली होती 2011-12 मधील अॅडलेड कसोटीत आणि त्यानंतर या आधुनिक काळातील ‘मास्टर’नं ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर भर घातली ती आणखी पाच शतकांची...महत्त्वाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडू उसळत असला, तरी विराट कोहलीला चिंता करण्याचं कारण नाहीये. कारण आखूड टप्प्याच्या चेंडूंना खेळणारा तो एक सर्वोत्तम फलंदाज. खेरीज त्याची तंदुरुस्ती देखील त्याला मदतकारी ठरणार...
रोहितचा विचार केल्यास मात्र ताटात विराटपेक्षा अधिक आव्हानं वाढून ठेवलीत असं दिसून येतंय. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांत मिळून शंभर धावांचा टप्पा देखील ओलांडता आला नाही (एकूण 91 धावा) अन् त्याला मानसिकदृष्ट्या सर्वांत जास्त छळणार ती त्याची बाद होण्याची पद्धत. फिरकी गोलंदाजांनी गाजविलेल्या या कसोटी मालिकेत रोहित शर्मा सहा डावांपैकी चारमध्ये बाद झाला तो वेगवान गोलंदाजांच्या चेंडूंवर. त्यातही आणखी वेदना देणारी बाब म्हणजे त्याचा अत्यंत आवडणारा ‘पूल’च सध्या घात करू लागलाय. वानखेडेवर दोन्ही डावांत तो हा फटका हाणण्याच्या भरात परतीचं तिकीट कापून बसला...अनेक माजी दिग्गजांना वाटतंय की, फलंदाज कितीही आक्रमक असला, तरी गरज आहे ती त्यानं खेळपट्टीवर थोडा अधिक वेळ घालवून जम बसविण्याची, परिस्थिती ओळखून वागण्याची. ऑस्ट्रेलियात तर हे फार गरजेचं...
त्यात भर पडलीय ती रोहित शर्माकडील कर्णधारपदाच्या भाराची. कारण भारत हरल्यास सारी जबाबदारी त्याला स्वीकारावीच लागेल. महान सुनील गावस्करांच्या सूचननेनुसार, तो जर वैयक्तिक कारणास्तव पहिल्या कसोटीत खेळला नाही, तर संपूर्ण मालिकेसाठी नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे सोपविणं योग्य ठरेल. अन्य कित्येक माजी खेळाडूंना वाटतंय की, रोहितनं सावध होण्याची वेळ आलीय. कारण काही वेळा घात करण्याची क्षमता असते ती ताकदीतच...मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स अन् त्याच्या सहकाऱ्यांना व्यवस्थित माहीत आहे की, रोहित शर्मा डावाच्या सुरुवातीपासून पूल खेळण्यास मागंपुढं पाहत नाही. त्यामुळं ते त्याला या जाळ्यात पकडण्याचा खात्रीनं प्रयत्न करतील...सर्वांना आता प्रतीक्षा लागून राहिलीय ती विराट कोहली नि रोहित शर्मा यांनी पुन्हा एकदा सुरात येऊन ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरी घडविण्याची !
- राजू प्रभू