For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याची ओळख... काजू महोत्सव पर्वणी!

06:08 AM Apr 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्याची ओळख    काजू महोत्सव पर्वणी
Advertisement

काजूची लागवड वाढवावी लागेल आणि त्यासाठी डोंगर सुरक्षित ठेवावे लागतील. काजूचे हे रसदार घबाड म्हणजे केवळ एक फळ नव्हे, तर ते गोव्याचे नैसर्गिक, पारंपरिक, आर्थिक आरोग्य आहे.

Advertisement

अनेक वैशिष्ट्यो असलेले गोवा राज्य आता महोत्सवांचेही राज्य बनले आहे. वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे महोत्सव होतात, ज्यामध्ये गोव्याच्या विविध कला, संस्कृती, राहणीमान, खाद्यपदार्थ, पेये, परंपरा आणि निसर्गाचा सुंदर आविष्कार घडत असतो. मुख्य म्हणजे यापैकी कोणताच महोत्सव संगीताशिवाय पूर्ण होत नाही आणि हे संगीत म्हणजे भारतीय व पाश्चात्य संस्कृतीचा श्रवणीय मिलाफ! अशा या महोत्सवांच्या मांदियाळीत आता गोवा काजू महोत्सवानेही मानाचे स्थान मिळविले आहे. गोवा वनविकास महामंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाने अल्पावधीतच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यंदाच्या 4 थ्या गोवा काजू महोत्सवाने आपली वेगळी छाप सोडली आहे.

गोव्याची ओळख सांगणारी जी काही खास फळे आहेत, त्यामध्ये काजूचे स्वत:चे खास स्थान आहे. काजू वर्षभर पिकत नाही, केवळ फेब्रुवारी ते मे पर्यंतच्या तीन-चार महिन्यांतच पिकणारे काजू फळ सर्वांनाच आवडते. गोव्यात काजू म्हणजे ‘मुट्टे’ आणि काजूगर म्हणजे ‘बी’. महाराष्ट्राला लागून असलेल्या काही भागांत ‘बोंडू’ म्हणतात. अशा या दोन भागांचे हे फळ रसदार आहे. त्याच्या रसापासून निरो, उर्राक, फेणी ही पेये तयार केली जातात. उर्राक व फेणी हे मद्यार्कात गणले जाते, तरीही त्यांची निर्मिती प्रक्रिया अत्यंत नैसर्गिकरित्या होते. त्यात रासायनिकतेला कुठेच थारा नाही. मुट्ट्यांच्या बिया वेगळ्या काढल्या की मुट्टे एका जागेत गोळा करतात तिला ‘कळमी’ म्हणतात. तिथे पायांनी मुट्टे मळले जातात. मळल्यामुळे मुट्ट्यांचा रस निघतो. रसापासून पुढे उर्राक, फेणी तयार केली जाते. मळलेल्या मुट्ट्यांच्या चोथ्याची ‘सोपाण’ म्हणजे राशी तयार करुन त्यावर वजनदार दगड ठेवला जातो. काहीवेळानंतर एकदम पाण्यासारखा रस निघतो त्याला ‘निरो’ म्हणतात, जो थेट पिता येतो. त्यामध्ये औषधी गुण आहेत. पचनसंस्था मजबूत होते. अलीकडे दुर्लक्षित होणाऱ्या या काजूकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधण्याचे काम गोवा काजू महोत्सवाने केले आहे. गोव्याच्या काही गावांपुरते सीमीत राहिलेले हे घबाड गोवा वनविकास महामंडळाने आता शहराच्या झगमगाटात आणून सर्वांपुढे ठेवण्याचे चांगले कार्य केले आहे.

Advertisement

गोवा काजू महोत्सवात आजच्या पिढीला काजूचे वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात आणि त्यांची चव चाखायलाही मिळते. प्रत्यक्ष काजू कशा मळल्या जातात, निरा कसा काढला जातो, उर्राक, फेणी कशी तयार केली जाते या साऱ्या पारंपरिक प्रक्रिया महोत्सवात पहायला मिळतात. काजूच्या वैशिष्ट्यापूर्ण पदार्थांची रेलचेल असते. पारंपरिक लोकसंगीताचीही जोड असतेच. काजू लागवडीसंदर्भात चर्चासत्रे, सादरीकरणे होतात, त्यातून शेतकऱ्यांना नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळते. विविध योजनांची माहितीही दिली जाते.

केवळ तीन ते चार महिन्यांचेच हे फळ आहे, मग गोव्यात काजूगर वर्षभर कसे उपलब्ध होतात? वर्षभरात लाखो किलोंच्या गरांची विक्री होते, एवढे गर गोव्यात तर नाही, मग जे वर्षभर उपलब्ध असतात ते गर कोठून येतात? गोव्याचे नसलेले काजूगर ‘गोवा ब्रँड काजू’ म्हणून विकले जातात काय? गोव्यात काजूगरांची विक्री कोट्यावधी रुपयांची आहे. काजूगर विक्रीची दुकाने कोण चालवितात? त्यांच्याकडे वर्षभर काजूगर कुठून येतात? उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इशारा दिला त्याचा रोख या सर्व प्रश्नांकडे आहे.  गोव्याचे नसलेले काजूगर गोव्यात आणून ते गोवा ब्रँड काजूगर म्हणून जर कोणी विकत असल्यास त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई होईल. विदेशांतील साध्या दर्जाचे काजूगर माफक दरात आणून त्यावर गोवा काजू ब्रँड लावून महागड्या दरात तो विकला जात आहे काय? हा विषयही आता सरकारला गांभीर्याने घ्यावाच लागेल. काजूच्या झाडांचीही लागवड वाढवावी लागेल आणि त्यासाठी डोंगर सुरक्षित ठेवावे लागतील. काजूचे हे रसदार घबाड म्हणजे केवळ एक फळ नव्हे, तर ते गोव्याचे नैसर्गिक, पारंपरिक, आर्थिक आरोग्य आहे.

राजू भिकारो नाईक

Advertisement
Tags :

.