कराडचे प्रवेशद्वार बनले ‘भकास’
कराड :
शहराचे सुशोभीकरण करण्याच्या हेतूने देशात स्वच्छ सर्वेक्षणमध्ये क्रमांक 1 मिळवलेल्या कराड नगरपरिषदेने कोल्हापूर नाक्यावर ‘आय लव्ह कराड’ या अक्षरांचा लक्षवेधी सेल्फी पॉईंट बनवला होता. हा सेल्फी पॉईंट कराडच्या प्रवेशद्वारावर असल्याने या परिसराचे रूपडे पालटून कराडकरांचा ऊर अभिमानाने भरून येत होता. मात्र अलिकडे या सेल्फी पॉईंटच्या आयलॅण्डमधे झाडेझुडपे वाढली असून अत्यंत भकास अशी अवस्था या परिसराची झाल्याचे दिसत आहे. या परिसराच्या स्वच्छतेकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
कोल्हापूर नाका हे कायम वर्दळीचे ठिकाण असून कोल्हापूर, पुण्या, मुंबईसह परराज्यातून कराड शहरात येणारे नागरिक याच प्रवेशद्वारातून येत असतात. केंद्रशासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात कराड नगरपरिषदेने सलग तीन वेळा देशात नावलौकिक मिळवला. स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम राबवत असतानाच कोल्हापूर नाक्यावर ‘आय लव्ह कराड’ हा सेल्फी पॉईंट उभारला होता. या सेल्फी पॉईंटने कराडच्या सौंदर्यात भर पडून हा सेल्फी पॉईंट कराडची नवी ओळख बनला होता. नगरपरिषदेकडून या परिसराची कायम स्वच्छता, देखभाल दुरूस्ती केली जात होती. मात्र गेल्या चार महिन्यांपासून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. आय लव्ह कराड या अक्षरांच्या रंगांचे पोपडे निघाले असून त्यावर धुरळा साचला आहे. अक्षरांच्या भोवतीच्या परिसरातील रंगीबेरंगी लाईट बंद आहेत. काटेरी झुडपांसह अस्ताव्यस्त झाडे वाढीस लागली आहेत. त्यामुळे या सेल्फी पॉईंटचा देखणेपणा गायब झाल्याने हा परिसर येणारा जाणारांना भकास वाटू लागला आहे. प्रशासनाला तो वाटतोय का? जर वाटत असेल तर त्यांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा एक खरे आहे की या परिसरात नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने धुरळ्याचे प्रमाण जास्त आहे. धुरळा जरी असला तरी अस्ताव्यस्त वाढलेली झाडवेली काढून किमान देखभाल दुरूस्तीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
प्रवेशद्वार कमानीची डागडुजी सुरू
कोल्हापूर नाक्यावर स्व. यशवंतराव चव्हाण स्वागत कमान आहे. कमानीवरील चव्हाण साहेबांच्या नावाची काही अक्षरे गळून पडली होती. ती दुरूस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले असून कमानीच्या बंद असलेल्या लाईटही सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. त्यासाठी पायाड रचून दोन दिवसांपासून काम सुरू आहे. त्याचप्रमाणे सेल्फी पॉईंटच्या परिसरातील देखभाल दुरूस्तीकडेही लक्ष द्यावे शिवाय कमानीशेजारी असलेला भला मोठा खड्डा बुजवण्यात येऊन हा परिसर पुन्हा देखणा करावा, अशी मागणी होत आहे.