‘इनफ इज इनफ’ची सभा होणार ऑनलाईन
गाभा समिती बैठकीत निर्णय
पणजी : ‘इनफ इज इनफ’ च्या आझाद मैदानावरील जाहीर सभेसाठी दिलेली परवानगी मनपाने मागे घेतल्यामुळे संतप्त झालेल्या चळवळीतील नेत्यांनी प्रस्तावित सभा घेणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र ती सभा जाहीर न होता आभासी पद्धतीने घेण्याचे ठरविण्यात आले आहे. गोवा घटकराज्य दिनी दि. 30 मे रोजी ‘इनफ इज इनफ’ तर्फे आझाद मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मनपाकडून कायदेशीर परवानगीही मिळविण्यात आली होती व ती मिळविल्यानंतर अन्य संबंधित खात्यांकडूनही आवश्यक परवानगी घेण्यात आल्या होत्या. मात्र मनपाने सदर परवानगी मागे घेतली आहे. घटकराज्य दिनानिमित्त आझाद मैदानावर सरकारी पातळीवर प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे कारण मनपाने दिले आहे.
त्यामुळे बुधवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेतून आझाद मैदानावरील सभेसाठी परवानगी नाकारण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. चळवळीच्या गाभा समितीच्या बुधवारी सायंकाळी झालेल्या तातडीच्या बैठकीत सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पुढे नेण्याचा एकमताने ठराव घेण्यात आला. त्या सभेत गोव्याचे प्रशासन, पर्यावरण, सार्वजनिक धोरण आणि सार्वजनिक हित यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर माजी न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांच्यासह अनेक प्रमुख वक्ते संबोधन करणार आहेत. त्याचबरोबर हा कार्यक्रम जगभरातील गोमंतकीयांना पाहता यावा यासाठी सदर बैठकीची लिंक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत जगभरातील गोमंतकीयांनी सामील व्हावे आणि गोव्याचे भविष्य व सार्वजनिक कार्यांच्या समर्थनार्थ आपली सामुहिक शक्ती दाखवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.