मेस्सी पर्वाचा अस्त
शरीर आणि मनाचा कस लावणाऱ्या फुटबॉलसारख्या आव्हानात्मक खेळावर आपल्या कसदार शैलीने अमीट ठसा उमटविणाऱ्या अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या निवृत्तीने एका झंझावाती पर्वाचाच अस्त झाला आहे. यापुढे मेस्सी संघात नसला, तरी त्याची कारकीर्द उदयोन्मुख फुटबॉलपटूंना तसेच फुटबॉलप्रेमींना कायमच प्रेरणा देत राहील, यात तीळमात्र शंका नाही. फुटबॉलमध्ये शारीरिक ताकदीबरोबरच प्रचंड मानसिक चपळाई, पायांवर नियंत्रण आणि वेगाने निर्णय घेण्याची क्षमता लागते. अशा या रफ अँड टफ खेळावर खऱ्या अर्थाने ज्या फुटबॉलपटूंनी वर्चस्व गाजवले, त्यात प्रामुख्याने पेले, फ्रांझ बेकेनबॉर, योहान कुफ, दियागो माराडोना, झिनेदिन झिदान, ख्रिस्टियानो रोनाल्डो यांसह काही मोजक्या खेळाडूंचा समावेश होतो. या महान खेळाडूंच्या नामावलीत मेस्सीचेही नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. अप्रतिम डिब्लिंग, चेंडूवरील असामान्य नियंत्रण, विलक्षण पासिंग, डाव्या पायाचा जादुई वापर, वेगातील बदल, फ्री कीकचे अस्त्र व या साऱ्याला लाभलेली नैसर्गिक शैलीची जोड हे त्याच्या खेळाचे वैशिष्ट्या. याशिवाय त्याचा दुर्लक्षित पण महत्त्वाचा गुण म्हणजे मैदान वा खेळ वाचण्याची अचाट क्षमता. विरोधी संघाची रचना, बचावपटूंची हालचाल आणि मोकळी जागा हेरण्याचे असाधारण कौशल्य त्याच्या ठायी होते. त्यामुळे मेस्सी फुटबॉलमध्ये कायम वेगळा ठरला. मेस्सीची कारकीर्द पाहिली, तर कुणाचेही डोळे दिपावेत. 207 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने तब्बल 125 गोल नोंदवले आहेत. विश्वचषक स्पर्धांमधील 26 सामन्यांचा विचार करता त्यात त्याच्या नावावर 21 दणदणीत गोलची नोंद दिसते. याशिवाय कोपा अमेरिका स्पर्धेतील 14 गोल व इतर स्पर्धांमधील त्याची कामगिरी गुणवत्ता सिद्ध करण्यास पुरेशी ठरावी. अर्जेंटिना म्हटले, की एकेकाळी दियागो माराडोना यांचे नाव घेतले जाई. मेस्सीनेही त्यांच्या पंक्तीत स्थान मिळवण्यामागे त्याची कठोर तपश्चर्या आहे. मुळात मेस्सी हा केवळ गोल करणारा खेळाडू नव्हता. अनेक सामन्यांमध्ये तो गोलची संधी निर्माण करायचा. त्याच्या पासिंगमुळे संघाचा गोल सत्कारणी लागल्याची कित्येक उदाहरणे सापडतात. 207 सामन्यातील 68 गोल साहाय्य ही आकडेवारी बोलकी ठरावी. मेस्सीची कारकीर्द विक्रमांनी भरलेली असली, तरी त्यालाही अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. 2005 मध्ये मेस्सीने अर्जेंटिनाकडून पदार्पण केले. अल्पावधीत त्याला लोकप्रियता मिळाली. परंतु, सुवर्णक्षणांकरिता त्याला प्रतीक्षा करावी लागली. 2014 च्या विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभव आणि सलग दोन कोपा अमेरिका अंतिम लढतीत अपयश हा खरे तर अर्जेंटिना व मेस्सीकरिता अत्यंत निराशेचा क्षण होता. परंतु, नंतरच्या काळात या लढवय्या फुटबॉलपटूने घेतलेली फिनिक्स भरारी अफलातूनच ठरते. मेस्सीने 2021 मध्ये पहिली मोठी आंतरराष्ट्रीय कोपा अमेरिका चषक स्पर्धा जिंकून दाखवली. तर 2022 च्या कतार विश्वचषक स्पर्धेत त्याने आपल्या देशाला विश्वचषक प्राप्त करून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. सरत्या 2026 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतही मेस्सीचा खेळ बहरल्याचे दिसून आले. आठ गोल, चार असिस्टसह त्याने पटकावलेला सिल्व्हर बॉल हे त्याच्या चमकदार कामगिरीचेच प्रतीक. परंतु, अंतिम सामन्यात मेस्सीला जखडून ठेवण्याची स्पॅनिश फुटबॉलपटूंची खेळी यशस्वी ठरल्याने अर्जेंटिनाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. यानंतर वयानुरूप शारीरिक मर्यादा पडत असल्याची कबुलीच त्याने दिल्याने एकप्रकारे त्याच्या निवृत्तीचेच संकेत मिळत होते. अखेर फुटबॉलला अलविदा करण्याचा आपला निर्णय मेस्सीने जाहीर केल्याने एका सुवर्णाध्यायाचीच समाप्ती झाली आहे. अशा या भावूक क्षणी ‘निवृत्तीचा निर्णय वेदनादायी असला, तरी नव्या खेळाडूंना संधी मिळायला हवी. मी नेहमीच माझे सर्वस्व दिले,’ ही प्रतिक्रिया त्याचा खेळाप्रतिचा समर्पित भाव दर्शवतो. कुठे थांबायचे हे कळले, तर कुठलाही खेळाडू संघाकरिता ओझे ठरत नाही. फॉर्मात असतानाच गुडबाय करून मेस्सीने आपली कारकीर्द आणखी उजळून टाकली आहे, हे निश्चित.