स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : सिनेसफष्टीतील कलाकार आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती
मुंबई
स्वरसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवार दि. 13 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. दादरच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मराठी -हिंदी सिनेसफष्टीतील कलाकार, संगीत विश्वातील दिग्गज, राजकीय नेते यांनी उपस्थिती लावली होती.
आशा भोसले यांचे रविवारी मुंबईत निधन झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान हृदविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशभरातील त्यांचे लाखो चाहते आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला.
सोमवारी सकाळी 11 वाजता आशा भोसले यांचे पार्थिव कासा ग्रँट लोअर परेल येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सिनेसफष्टीतील कलाकार, राजकीय नेते, क्रीडा विश्वातील खेळाडू आले होते. तिरंग्यात लपटलेल्या त्यांच्या पार्थिवाला निवासस्थानाहून निघताना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानापासून दादरच्या शिवाजी पार्कपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी आशाताईंच्या अखेरच्या प्रवासाला अर्थात त्यांच्या अंत्ययात्रेला सुऊवात झाली. ‘आशाताई अमर रहे,’ ‘जब तक सूरज चाँद रहेगा, आशाताई का नाम रहेगा’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांनी आशाताईंच्या पार्थिवावर फुले अर्पण केली.
यानंतर दुपारी साडेचार वाजता आशाताईंचे पार्थिव हे दादर, शिवाजी पार्क स्मशानभूमीत पोहोचले.दादरच्या स्मशानभूमीत दुपारी 4 वाजून 50 मिनिटांनी आशाताईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास सुऊवात करण्यात आली. यावेळी मुंबई पोलिसांनी भारताचा ध्वज आनंद भोसलेंना दिला. यावेळी त्यांची लाडकी नात जनाई भोसले हिला अश्रू अनावर झाले. यावेळी भगवद्गीतेचा नववा अध्याय पुजाऱ्यांनी म्हणत कुटुंबीयांकडून आशाताईंवर धार्मिक विधि करण्यात आल्या. धार्मिक विधि झाल्यानंतर त्यांना पोलिसांकडून सलामी देण्यात आली. या सलामीनंतर शासकीय इतमामांत सर्वांच्या लाडक्या आशाताई अनंतात विलीन झाल्या.

निवासस्थानी जाऊन घेतले अंत्यदर्शन
आशाताईंचे पार्थिव सकाळी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले तेव्हा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, उध्दव ठाकरे यांनी सहकुटुंब अंत्यदर्शन घेतले. तसेच माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, खासदार प्रणीती शिंदे, अभिनेत्री तब्बु, ज्येष्ट गायक नितीन मुकेश, अभिनेता रीतेश देशमुख,सचिन पिळगांवकर, सुदेश भोसले, मंगलप्रभात लोढा, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील, ज्येष्ठ अभिनेत्री हेलन, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी अंत्यदर्शन घेतले.
स्मशानभूमीत या मान्यवारांनी वाहिली श्रध्दांजली
दुपारी साडेचार वाजता आशा ताईंचे पार्थिव दादर, शिवाजी पार्क स्मशानभूमीत पोहोचले. यावेळी संपूर्ण भोसले कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित होते. आशा भोसलेंची बहीण गायिका उषा मंगेशकर यांनी सर्वप्रथम आपल्या लाडक्या बहिणीला निरोप दिला. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राज्याच्या जनतेच्यावतीने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदिंनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर सिनेसफष्टीतील अभिनेते आमिर खान, विवेक ओबेरॉय, भजन सम्राट अनुप जलोटा,गायक शान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, गायक शान, सुदेश भोसले,, महापौर रितु तावडे, मंत्री शंभुराज देसाई, भरत गोगावले, संजय शिरसाट, खासदार अनिल देसाई, माजी महापौर श्रद्धा जाधव, सुदेश भोसले, संगीतकार अनु मलिक, गायक नंदेश उमप यांनी पुष्पचक्र वाहत आशाताईंना अभिवादन केले.
सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
बहुमुखी प्रतिभा आणि अलौकिक स्वरांची देणगी लाभलेल्या ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना अश्रू अनावर झाले. आशाताईंच्या पार्थिवाचे दर्शन घेताना भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज सिराज महंमद भावूक झाला होता.सचिन तेंडुकल यांच्यासोबतच उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना देखील आशाताईंचे पार्थिव पाहून अश्रु अनावर झाले.
आशाताईंना गायकांची स्वरांजली
आशाताईंचे पार्थिव दादर शिवाजीपार्क स्मशानभूमीत पोहचल्यानंतर तेथे मान्यवरांनी श्रध्दांजली वाहील्यानंतर संगीतक्षेत्रातील भजनसम्राट अनुप जलोटा, शान आणि सुदेश भोसले यांनी आशाताईंची गाणी गात स्वरांजली अर्पण केली.
राज ठाकरेंकडून पिवळ्या चाफ्यांचा मोठा हार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशाताईंचे वेगळेच नाते होते, स्मशानभूमीत सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आशाताईंसाठी खास पिवळ्या चाफ्याच्या फुलांचा भलामोठा हार आणला होता, पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत त्यांनी हा हार आशाताईंच्या पार्थिवावर अर्पण केला.