शहराच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचे साम्राज्य
एअरपोर्ट रोडवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक-जनतेत नाराजी
बेळगाव : बेळगावच्या प्रवेशद्वारापासूनच खड्ड्यांची मालिका सुरू होत असल्याने स्मार्ट शहराची दुसरी बाजू दिसून येत आहे. मारुतीनगर कॉर्नर, सांबरा रोड येथील मुख्य रस्त्याची पूर्णत: दूरवस्था झाली आहे. एअरपोर्ट रोडवर अशाप्रकारे खड्डे पडल्यामुळे वाहनचालक प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ नयेत, यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. एअरपोर्ट रोडचे मागील दोन वर्षांपासून रुंदीकरण तसेच डांबरीकरण करण्यात आले. एससी मोटरपासून एअरपोर्टपर्यंत डांबरीकरण करण्यात आले. परंतु, गांधीनगर येथील उड्डाणपुलापासून मारुतीनगर कॉर्नरपर्यंतचा रस्ता खराब झाला आहे.
ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी भरले असल्याने अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी एअरपोर्ट रोडने वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना खड्डे निदर्शनास न आल्याने अपघात होत आहेत. हा रस्ता बागलकोट, सोलापूरला जोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. इतर भागात रस्ता सुरळीत असताना शहरालगतच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच बॅरिकेड्स लावण्यात आल्याने रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. खड्ड्यांमध्ये वाहने अडकून वाहनांचे नुकसान होत असल्याने वाहनचालकातून नाराजी व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधींना खड्डे दिसत नाहीत का?
बेळगाव विमानतळाला आठवड्यातून एखादा तरी लोकप्रतिनिधी अथवा वरिष्ठ अधिकारी ये-जा करीत असतो. या सर्वांना या खड्ड्यांमधूनच वाट काढत विमानतळ गाठावे लागत आहे. त्यामुळे ये-जा करताना त्यांना हे खड्डे दिसत नाहीत का? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारण्यात येत आहे.