अभिजात मराठी आनंद मेळाव्याला उत्साहात प्रारंभ
माय मराठी अखंडपणे वृद्धिंगत व्हावी हा हेतू : ‘अभिजात मराठी संस्थे’तर्फे मराठा मंदिर येथे आयोजन
बेळगाव : माय मराठी भाषेचे जतन होऊन ती अखंडपणे वृद्धिंगत व्हावी, या हेतूने डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या ‘अभिजात मराठी संस्थे’तर्फे आयोजित अभिजात मराठी आनंद मेळाव्याला उत्साहात सुरुवात झाली. दि. 27 रोजी मराठा मंदिर येथे डॉ. किरण ठाकुर, लेखक श्रीपाद जोशी, लेखक स्वाती राजे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर यांच्यासह संस्थाध्यक्ष डॉ. संध्या देशपांडे, स्वरुपा इनामदार, आप्पासाहेब गुरव, रोटे. अशोक नाईक व कार्यवाह अनंत लाड उपस्थित होते.
मेळाव्याची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. रेल्वे ओव्हरब्रिजवरील अग्निशमन दलाच्या कार्यालयापासून ग्रंथदिंडी मराठा मंदिरपर्यंत नेण्यात आली. दिंडीचे उद्घाटन सरस्वती वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर यांच्या हस्ते झाले. दिंडीमध्ये नावगे येथील सांप्रदायिक भजनी मंडळ सहभागी झाले होते. तसेच महिला विद्यालय, बालिका आदर्श, व्ही. एम. शानभाग स्कूल, ठळकवाडी हायस्कूल, विज्ञान विकास मंदिर, महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूरच्या विद्यार्थिनी व विद्यार्थी सहभागी झाले होते. फ्रेंड्स सर्कलच्या महिलांचे लेझीम आणि बाल शिवाजी व मावळ्यांच्या रूपात आलेले छोटे विद्यार्थी यामुळे दिंडी लक्षवेधी ठरली. कुसुमाग्रज नगरीचे उद्घाटन रोटे. अशोक नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. स्वरुपा इनामदार यांच्या हस्ते रा. रं. बोराडे पुस्तक प्रदर्शन दालनाचे तर मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते बाबा पदमनजी व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले. अक्षता व विनायक मोरे यांनी प्रार्थना सादर केली. पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रणव पित्रे व प्रा. अरुणा नाईक यांनी करून दिला.
स्वागत व प्रास्ताविक करताना डॉ. संध्या देशपांडे म्हणाल्या, आपली भाषा समाजातल्या सर्वसामान्य माणसाला कळली पाहिजे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहितानाही माझी भाषा अमृताशी पैजा जिंकणारी असेल, असाच पण केला. मात्र, आज सगळीकडे भांबावलेपण आहे. भाषेच्या ऱ्हासामुळे अनेक भाषातज्ञ चिंतित आहेत. ही अवस्था आजचीच नाही. आपल्या भाषेला गौरवशाली वारसा आहे. ती वैभवाने नांदत होती, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आज आपल्याला तत्त्वज्ञानच नव्हे तर विज्ञानसुद्धा मराठीतूनच मांडावयाचे आहे. त्यासाठी नवे शब्द घडवावे लागतील. कृत्रिम बुद्धिमत्तेपुढे नैसर्गिक बुद्धिमत्ता हरते की जिंकते, हे ठरविण्याचा हा काळ आहे. यावेळी श्रीपाद जोशी म्हणाले, अभिजात मराठी दर्जा मिळाल्यानंतर महत्त्वाची गोष्टी झाली ती म्हणजे अभिजात मराठी संस्था अस्तित्वात आली. संमेलन न म्हणता मेळावा हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. हा मराठी भाषा गौरव दिन आहे. मराठी संस्कृतीबद्दल आदरभाव जपणारा, तो अधोरेखित करणारा हा दिवस आहे.
सत्र दुसरे, विद्यार्थी संमेलन
या संमेलनामध्ये स्वाती राजे यांनी सहभाग घेतला. व्यासपीठावर वसंत व्याख्यानमालेच्या अध्यक्षा सुनीता देशपांडे व सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार उपस्थित होत्या. स्वरा व श्रीया मोरे यांनी प्रार्थना सादर केली. त्यानंतर स्वाती राजे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दोन गोष्टी सांगितल्या. धुळीच्या कणाला उन्हाच्या माऱ्यामुळे सूर्याचा राग येतो आणि तो आपले वडील, आजोबा, पणजोबा यांना सूर्याबद्दल तक्रार करतो. शेवटी तो धरतीकडे येतो. हिरमुसलेल्या धुळोबाची धरती समजूत काढून त्याला सूर्याचे महत्त्व पटवून देते, अशी ही एक गोष्ट होती. दुसऱ्या गोष्टीमध्ये एक छोटी मुलगी जिला खूप काही सांगायचे आहे. त्यामुळे ती आपले मनोगत झाडासमोर व्यक्त करते आणि झाडांना पालवी फुटते, अशी दुसरी गोष्ट होती. एकत्र कुटुंब, निसर्गाचे महत्त्व, व्यक्त होण्याची गरज असे पैलू या गोष्टींमधून अधोरेखित झाले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. अरुणा नाईक यांनी केले.
आज विविध कार्यक्रम
मराठा मंदिरमध्ये सुरू असलेल्या अभिजात मराठी आनंद मेळाव्यामध्ये शुक्रवारी सकाळपासून विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. दि. 28 रोजी सकाळी 10.30 ते 12 या वेळेत मंगळागौरीचे खेळ होणार आहेत. त्यानंतर ‘आम्ही कचऱ्याच्या ग धनी’ हे पथनाट्या होणार आहे. समूह गायन प्रशिक्षणाने सांगता होणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी 12 ते 1 या वेळेत विद्यार्थ्यांचे कथाकथन होणार आहे.
सत्र तिसरे, पालक-शिक्षक मेळावा
या सत्रामध्ये स्वाती राजे दुपारी 1 ते 2 या वेळेत पालक-शिक्षक मेळावा घेणार आहेत. अध्यक्ष म्हणून जगदीश पुंटे उपस्थित राहणार आहेत.
कवि संमेलन-कृतज्ञता सोहळा
या सत्रामध्ये बेळगावमधील निमंत्रित कवींचे कवि संमेलन होणार असून अध्यक्ष म्हणून स्वरुपा इनामदार उपस्थित राहणार आहेत. पाचव्या सत्रामध्ये कृतज्ञता सोहळ्यानंतर अभिजात नाट्यासंगीताचा कार्यक्रम होणार आहे.
तरुणांना कौतुकाची थाप
या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. मात्र, केळीच्या झाडाच्या गाभ्यापासून तयार केलेल्या प्रतिकृतींमध्ये तिरंगी ध्वजाच्या रंगानुसार सुगड ठेवून त्यावर पणत्या ठेवून उद्घाटन करण्यात आले. ही प्रतिकृती कुस्ती हाच पेशा निवडलेल्या कुद्रेमनीच्या शुभम काकतकर व आकाश सांबरेकर या दोन तरुणांनी केली होती. याशिवाय तबला, डग्गा, संबळ आदी वाद्ये ठेवून त्यांनी व्यासपीठासमोर नादब्रह्म उभे केले होते. श्रीपाद जोशी यांनी आपल्या भाषणात या प्रतिकृतीचे विशेष कौतुक केले. तसेच उपस्थितांनीसुद्धा या तरुणांच्या प्रयत्नांना कौतुकाची थाप दिली.
मातृभाषेविना कोणतीच भाषा शिकता येणार नाही : श्रीपाद जोशी
खासगीकरणामुळे इंग्रजीचा प्रसार वाढला. इंग्रजी ही व्यावहारिक भाषा आहे. सध्या सगळीकडे इंग्रजीचा बोलबाला दिसून येतो. मात्र विद्यार्थी मातृभाषेविना कोणतीही भाषा शिकू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देणे काळाची गरज आहे, असे विचार साहित्यिक श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले. अभिजात मराठी कार्यक्रमाच्या व्याख्यान सत्रात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे भाषेची अधोगती सुरू झाली. माध्यमे दाखवतात तेच आपण खरे मानतो. माध्यमांमुळेच इंग्रजीचा प्रसार वेगाने वाढला. त्यामुळे इंग्रजीचे आव्हान जगातील सर्वच भाषांसमोर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भाषा हे सर्व विचारांचे मूळ असते. व्यक्ती आपल्या मातृभाषेमध्येच विचार करीत असते. भाषेचा विकास करायचा असेल तर तिला आधुनिकता आणणे गरजेचे आहे. मराठी भाषेला आधुनिकता आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु राज्यकर्त्यांकडून खासगीकरणाला वाव दिला जात असल्याने त्यांचे भाषिक धोरणाकडे दुर्लक्ष होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. व्यासपीठावर अभिजात मराठी संस्थेच्या अध्यक्षा संध्या देशपांडे, प्रा. डॉ. विनोद गायकवाड, अनंत लाड उपस्थित होते. डॉ. विनोद गायकवाड यांनी अध्यक्षीय समारोप केला. अनंत लाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.