पात्राची पात्रता
माणसाचे शरीर हेही एक पात्रच आहे. पूर्वसंचिताचे, प्रारब्धाचे आणखी एक पात्र त्याच्याजवळ आहे. हे पात्र घेऊन सद्गुरूंपाशी माणूस आला की पात्राप्रमाणे त्याला कृपा लाभते. पात्र जर छोटे असेल तर तेवढेच कृपामृत मिळते. पूर्वकर्म जर थोर असेल तर संचिताचे पात्रही मोठे असते. त्याप्रमाणे कृपेचा वर्षाव शिगोशीग होतो.
मराठी भाषा अद्भुत आहे. एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ त्या त्या प्रसंगानुसार संभवतात. शब्दाचा अर्थ एकच असतो, परंतु त्यात सूक्ष्म अर्थच्छटा सामावलेली असते. एखादा शब्द स्त्राrलिंगी, पुल्लिंगी आणि नपुसकलिंगीही असू शकतो. उदाहरणार्थ ‘पोर’ हा शब्द. ती कुणाची पोर? तो पोर हळवा आहे बघा. तर, ते जावयाचे पोर आहे. कळशी, घागर, गुंड, माठ, डेरा असे एकाच कामासाठी वापरत असलेले पण सूक्ष्म अर्थ दर्शवणारेही शब्द असतात. त्यातलाच एक शब्द म्हणजे ‘पात्र’. या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. नाटकांमध्ये पात्र याचा अर्थ व्यक्तिरेखा. पात्र हे रंगमंचावरही साकारले जाते. एखाद्या विक्षिप्त व्यक्तीला देखील ‘पात्रच आहे अगदी’ असे म्हणतात. पात्रतेची खात्री करतानाही पात्र असे म्हणतात.
संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्यात ते म्हणतात, ‘सर्वाभूती द्यावे अन्न । द्रव्य पात्र विचारून । उपनिष्ठे कारण तेथे बीज पेरीजे । महाराज म्हणतात, ‘अन्न सर्व भूतमात्रांना द्यावे. अन्न देताना कुठलाही भेद करू नये, परंतु द्रव्य मात्र पात्र बघूनच द्यावे. तेव्हा जरूर विचार करावा. कारण योग्य असेल तर कार्य देखील योग्य निर्माण होते.’ दानाचा परिणाम देणाऱ्यावर होतो. प्रामाणिकपणे कमावलेला पैसा जर दारुड्याकडे गेला तर त्याचा दोष देणाऱ्याला लागतो. द्रव्य पात्र विचारून, अधिकाराची चर्चा करूनच दिले गेले पाहिजे. सत्पात्री दान द्यावे असे शास्त्र सांगते. पात्र याचा एक अर्थ स्वयंपाकघराशीही निगडित आहे. स्वयंपाकघरातील भांडी म्हणजे पात्र होय. स्टीलच्या पेल्याला फुलपात्र म्हणतात.
संत एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये गुरूभेटीचा एक प्रसंग आहे. संत एकनाथ महाराजांचे गुरू श्रीजनार्दन स्वामी निर्जन स्थळी ध्यानमग्न होते तेव्हा तिथे मलंग वेषात श्री दत्तप्रभूंची स्वारी आली. काखे झोळी आणि सवे एक कुत्री होती. वेष निराळा असला तरी श्रीजनार्दन स्वामींनी त्यांना ओळखून नमस्कार केला. कामधेनू कुत्रीचे रूप घेऊन आली होती. श्री दत्तप्रभूंनी झोळीतून एक मातीचे पात्र काढून श्री जनार्दन स्वामींना दिले आणि सांगितले की या पात्रात या कुत्रीचे दूध काढ. त्याप्रमाणे दूध काढल्यानंतर झोळीतून शिळ्या भाकरीचे तुकडे काढले आणि त्या पात्रात कालवले. श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार दोघेही एकाच पात्रात जेवले. दिव्य अन्न होते ते. संत एकनाथ महाराज तिथेच होते. दुरून पहात होते. श्रीदत्तप्रभू आणि श्रीजनार्दन स्वामी या दोघांनी तृप्तीची ढेकर दिली आणि त्या पात्रातच हात धुतले. त्यानंतर जनार्दन स्वामींनी एकनाथांना बोलवून म्हटले, ‘अरे इकडे ये. हे पात्र पलीकडे असलेल्या तळ्याच्या पात्रातून धुऊन आण बरे.’ नाथ महाराज ते पात्र घेऊन तळ्यावर गेले. त्यांच्या मनात गुरूभक्ती उमलून आली. त्यांना वाटले, ज्या अर्थी आपले सद्गुरू या पात्रात जेवले त्याअर्थी आपणही प्रसाद आवश्य घेतला पाहिजे. ते हात धुतलेले पाणी म्हणजे महाप्रसादच आहे म्हणून सद्गुरू भक्तीचा फुलोरा येऊन प्रेमाने त्यांनी ते मृतिका पात्र आपल्या मुखास लावले.
संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘श्री गुरूंचे उशिटे लाहे जे अवचटे । तेणे लाभे विटे समाधीसी।’ अशीच अवस्था एकनाथ महाराजांची झाली. त्यांना समाधी लागली. तेव्हा जनार्दन स्वामींनी श्रीदत्तप्रभूंना विनंती केली की हे श्रीगुरू माझ्या शिष्याने आपल्याला ओळखलेच नाही. तरी आपल्या स्वस्वरूपाचे त्याला दर्शन द्यावे. तेव्हा श्रीदत्तप्रभू म्हणाले, ‘अरे हा जगदोद्धार करण्यास आलेला भगवंताचा अवतार आहे. श्रीदत्तप्रभूंनी सगुणरूपात षडभूज रूपात नाथ महाराजांना दर्शन दिले. कुत्री कामधेनू रूपात प्रकट झाली. श्री दत्तप्रभूंनी कृपाशिर्वाद दिला आणि ते अंतर्धान पावले.
श्रीदत्तप्रभूंची राजधानी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीजवळ शिरोळनामक गावी जगातील एकमेव भोजनपात्राचे मंदिर आहे. पंधराव्या शतकामध्ये सर्वत्र यावनी सत्तेचा अंमल असताना श्रीदत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी यतिरूप अवतार घेऊन धर्मरक्षणाचे कार्य केले. एक दिवस माध्यान्ह समयी श्रीमहाराज एका निर्धन परंतु सदाचारी, सत्त्वशील असलेल्या जुन्या घरासमोर येऊन थांबले.
ओम ऱ्हीम असा त्रिवार उच्चार करून श्रीस्वामी महाराज उभे राहिले. घरातील गृहिणी ही सत्त्वसंपन्न, सुशील धर्माचरण करणारी पतिव्रता होती. यतीवेषातील साक्षात दत्तप्रभूंना पाहून ती क्षणभर स्तब्ध झाली. नंतर घरात त्यांना सन्मानाने बोलवून तिने त्यांची यथासांग पूजा केली. स्वामी म्हणाले, ‘माते, आम्हाला खूप भूक लागली आहे. जे अन्न तयार असेल त्याची भिक्षा वाढ.’ तिच्या घरी छोट्याशा पातेल्यात फक्त ज्वारीच्या कण्या शिजवलेल्या होत्या. भोजन वाढायला घरात पात्र नव्हते. ती विचार करत असतानाच स्वामी महाराज अंगणात गेले आणि एक चौरस शिळा उचलून आणली. त्यावर ॐ हे अक्षरलेखन अष्टदलयुक्त चक्र काढले. तिला म्हणाले, ‘या प्रशस्त पात्रावर आता आम्हाला भिक्षा वाढा.’ पाषाणपात्रावर वाढलेल्या जोंधळ्यांच्या कण्या स्वामी महाराजांनी आवडीने खाल्ल्या. हा एक अभूतपूर्व भोजन सोहळा म्हणजे अपूर्व असा एक महायज्ञच होता. या भोजनपात्राची आरती प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी रचली आहे.
प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हणतात, ‘जय जय सद्गुरू भोजनपात्रा । सुपवित्रा निरांजन उररी करी शुची मम गात्रा ।’ हे भोजनपात्रा, तू अतिशय पवित्र आहेस. माझ्यातील द्वैताचा स्वीकार करून मला अद्वैताकडे ने. शरीरातले गात्र जे सतत दूषित होत असतात त्यांनाही पवित्र कर. या आरतीमध्ये पाच कडवी आहेत. त्यातल्या चौथ्या कडव्यामध्ये स्वामी महाराज म्हणतात, ‘ते तू गुरूकर शाखाचिन्हित जे असशी । आठही सिद्धी नवनिधी राबती तुजपासी । भजकांच्या तू सर्वही कामा पुरविसी ।अश्रांत अन्नपूर्णा निवसे तुजपासी।’ या भोजनपात्रावर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या उजव्या तळहाताचा ठसा उमटलेला आहे. ती सुंदर मनोहर अशी हस्तमुद्रा आहे. आठ अलौकिक सिद्धी आणि आध्यात्मिक गूढ संपत्ती या भोजनपात्राजवळ असून अविरत अन्न पुरवणारी अन्नपूर्णा सन्निध आहे. या भोजनपात्राचा महिमा असा आहे की दारिद्र्या दु:ख पीडा हरण करणारा आशीर्वाद त्यांनी गुरूंजवळून घेतला आहे. याची नित्य त्रिकाळ जो अर्चना करील त्याला भोजनपात्राचा आशीर्वाद मिळेल. प. प. स्वामींचे हृदय आणि बुद्धी यापाशी जोडलेली आहे असे स्वामी म्हणतात.
माणसाचे शरीर हेही एक पात्रच आहे. पूर्वसंचिताचे, प्रारब्धाचे आणखी एक पात्र त्याच्याजवळ आहे. हे पात्र घेऊन सद्गुरूंपाशी माणूस आला की पात्राप्रमाणे त्याला कृपा लाभते. पात्र जर छोटे असेल तर तेवढेच कृपामृत मिळते. पूर्वकर्म जर थोर असेल तर संचिताचे पात्रही मोठे असते. त्याप्रमाणे कृपेचा वर्षाव शिगोशीग होतो. असे म्हणतात की सिंहिणीचे दूध फक्त सुवर्णपात्रातच टिकते. दुसऱ्या कोणत्याही धातूच्या पात्रात ते ठेवले तर त्या भांड्याला छिद्र पडून ते सारे दूध गळून जाते. ज्या व्यक्तीचे चित्त, अंत:करण विषयशून्य, विकाररहित, अनासक्त असते, ज्याच्या हृदयात प्रेम असते तेच हृदय परमेश्वराची शक्ती ग्रहण करण्यास योग्य असते. असे पात्र तयार होण्यास मंत्रजप करावा आणि शिस्तबद्ध जीवन जगावे ही सद्गुरूंची इच्छा असते.
-स्नेहा शिनखेडे