For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हाथी चले अपनी चाल

12:19 PM Nov 13, 2024 IST | Radhika Patil
हाथी चले अपनी चाल
The elephant made its move
Advertisement

हसने गावास पाच महिन्याने रामराम : आजऱ्याकडे प्रयाण
कोल्हापूर/ सुधाकर काशीद : 
काहीही करा तो जागचा हलायचा नाही डबे वाजवले. ढोल वाजवले. वाजवून वाजवून ते ढोल-डबे फुटले तरी त्याचा परिणाम त्याच्यावर व्हायचा नाही. आपल्या मागे 15 ते 20 जण सातत्याने आहेत आपल्याला हुसकावत आहेत हे त्याला दिसत असूनही तो अजिबात दाद द्यायचा नाही. ‘हाथी चले अपनी चाल’ याच स्टाईलने तो बिनधास्त वावरत होता. पण त्यालाच काय उपरती झाली माहित नाही. हसणे (ता. राधानगरी) या गावाजवळ देवराई जंगलात गेले साडेपाच महिने तळ ठोकून बसलेल्या हत्तीने दोन दिवसांपूर्वी गावाला रामराम केला. हसणे-वाकीघोल-कडगाव-पाटगाव मार्गे तो आजरा तालुक्यात गेला. हत्तीच्या वास्तव्याला नव्हे पण त्याच्याकडून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीला कंटाळलेल्या हसणे ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला.

Advertisement

या हत्तीबद्दल हसणे ग्रामस्थांत सुरुवातीला कुतहुल होते. मातीत उठलेल्या त्या हत्तीच्या पायाच्या ठशाचे लोक श्रद्धेने पूजनही करत होते. हत्ती आपल्या हसणे गावाभोवती असलेल्या जंगलाचे वैभव आहे या श्रद्धेने ग्रामस्थ सुरुवातीला आस्थेची भावना व्यक्त करत होते. पण हत्ती दिवस मावळला की थेट गावच्या हद्दीत प्रवेश करू लागला. भात, नाचणी, केळी, माड याचा रोज फडशा पाडू लागला. शेतातील दारातील पाण्याच्या टाक्या एका झपाट्यात फेकून लागला. उभ्या ट्रॅक्टरचे नुकसान करू लागला. हत्तीचे रुप त्रासदायक होऊ लागले. लोक दिवस मावळला की दरवाजे बंद करून बसून राहू लागले. हत्तीच्या भीतीचे सावट गावावर जाणवू लागले. लोकांनी रात्री शेतीवर राखणीसाठी जाणेही बंद केले. तरुणांचे गट रात्री गस्त घालू लागले.

या हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. हत्ती जंगलात रहाणारच. पण तो रोज नागरी वस्तीत येणार नाही शेतीचे नुकसान करणार नाही याची दक्षता वन खात्याने घ्यावा। अशी ते मागणी करत होते. त्यामुळे वन खात्याचे कर्मचारी सलग तीन महिने रात्री हसणे गावात तळ ठोकून होते. पण हत्तीला हुसकावणे त्यांना शक्य होत नव्हते. पण वनखात्याला हत्तीलाही जपायचे होते व लोकांचे होणारे नुकसानही टाळायचे होते.

Advertisement

तीन दिवसापूर्वी दाजीपूर, राधानगरी, हसणे येथील वनकर्मचारी व कोल्हापूरहून आलेली रेस्क्यू टीम यांनी हत्तीला नागरी वस्तीपासून लांब नेण्याची मोहीम राबवली व हत्तीने हसणे गावातील आपला मुक्काम अखेर हलवला. वनविभागाचे कर्मचारी त्यांच्या पाठीमागून होतेच. हत्ती पहिल्यांदा वाकीघोलात गेला. तेथून काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पोहत कडगाव-पाटगावच्या बाजूला गेला व पुढे आज्रयाच्या जंगलात गेला. तेथे गेली कित्येक वर्ष हत्तीचे वास्तव्य आहेच. परत तो तिथेच गेला. हत्तीला परत पाठवण्याच्या या मोहिमेत विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार, वनक्षेत्रपाल अजित माळी, अमोल चव्हाण, राहुल पाटील, प्रदीप खोत, सोमनाथ पवार व रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Advertisement
Tags :

.