चार पिल्ले, आईबाबा असे हत्तीचे कुटुंबच दाखल
कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी :
एक मादी, तिच्यासोबत दोन पिल्ले आणि एक नर त्याच्यासोबत दोन पिल्ले, अशी आई-बाबांसोबत हत्तीच्या चार पिल्लांची जोडी कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिह्याच्या वेशीवर अगदी मुक्तपणे वावरत आहे. कोल्हापूर जिह्यात चंदगड तालुक्यातील पारले व कळसगादे या दोन गावांच्या परिसरात नर हत्ती व त्याची दोन पिल्ले आहेत. एक क्षणही हत्तीला सोडून इकडे-तिकडे न जाणारी ही पिल्लांची जोडी जणू इथे रोज जगण्याचे एकेक धडेच घेत आहे. हा परिसर जंगलाचा आहे. गेल्या काही वर्षांपासून न चुकता या काळात येथे हत्ती येतात. याही वर्षी याच ठिकाणी हत्ती आले आहेत. पण पिल्लांसह आले आहेत. त्यामुळे हत्तींच्या दृष्टीने हा परिसर चारा, पाणी व सुरक्षिततेसाठी पूरक ठरला आहे. वन विभागानेही हा परिसर हत्ती संरक्षण कुटी परिसर म्हणून जाहीर केला आहे.
पारले, कळसगादे गावालगतचा हत्ती व त्याची दोन पिल्ले म्हणजे निसर्गातली प्राणीमात्राची जगण्याची एक धडपडच आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा हत्ती या परिसरात दिसला तेव्हा मोठा गदारोळ उठला. हत्तीही माणसांचा असा गदारोळ पाहून बावरला. दोघा शेतकऱ्यांचा त्यात जीव गेला, तरी लोकांनी हत्ती आपल्या भागात जसा आला, तसा काही दिवसांत जाईल, या समजुतीने त्याला मान दिला. शेतातील त्याच्या पायाच्या ठशाचे पूजन केले. त्याच्या पायाखालची माती पुरचुंडीत बांधून देव्हाऱ्यात ठेवली. मात्र हत्ती उसाचे, भात पिकाचे, केळीचे, माडाचे नुकसान करू लागला व माणूस व हत्तीचा संघर्ष जिह्यात सुरू झाला.
हत्ती तर खायला जेथे मिळते, तेथे जात होताच. पण शेतकऱ्यांना आपल्या डोळ्यासमोर आपल्या शेतीचे होणारे नुकसान पाहवत नव्हते. त्यामुळे मधला काही काळ हत्ती माणसाचा शत्रूच ठरला. वाटेत वीज प्रवाह सोडणे, हत्तीच्या दिशेने फटाके फेकणे, जाळ करणे, गवत या टोकापासून त्या टोकापर्यंत पेटवून देणे, असे प्रकार सुरू झाले आणि हत्तीपासून शेतीचे नुकसान वाचवणे वन खात्यालाही अशक्य झाले.त्यानंतर हत्ती दरवर्षी येऊ लागला.
मे-जूननंतर परत तिलारी किंवा कर्नाटकात परत जाऊ लागला. दरम्यानच्या काळात हत्तीची धाव कुठंपर्यंत आहे, याचा वन खाते व शेतकऱ्यांनाही अंदाज आला. हत्तीपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई तातडीने दिली जाऊ लागली. आता तर एक हत्ती आजरा परिसरात कायमच ठाण मांडून बसला आहे आणि एक नर, एक मादी आणि सोबत चार गोंडस पिल्ले असा सहकुटुंब परिवारच येथे आला आहे. नरासोबतची दोन पिल्ले चंदगड परिसरात तर मादीसोबतची दोन पिल्ले सिंधुदुर्गच्या वेशीवर आहेत. आपल्या आई-बाबाची माया व त्यांचा सहवास हत्तीच्या पिल्लांना किती मोलाचा असतो, हे हत्ती गावालगतच असल्याने लोकांना दुरूनही पाहायला मिळते आहे. एक क्षणभरही पिल्ले हत्तीपासून दूर होत नाहीत. जवळ पिल्लांना घेतल्याशिवाय हत्ती रस्ता ओलांडत नाही.
पहिल्यांदा हत्ती पाण्यात जातो, नंतर पिल्लांना बरोबर घेतो, हे लांबून शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे. कारण हत्तीचा वावर अगदी नागरी वस्तीजवळ आहे. या पार्श्वभूमीवर वन खात्याची जबाबदारी वाढली आहे. त्यांना आपले वनवैभव असलेला हत्तीही जपायचा आहे आणि शेतकऱ्यांचे नुकसानही टाळायचे आहे. हत्ती-माणूस यांच्यात संघर्ष होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यायची आहे. त्यासाठी हत्ती संरक्षक कुटी तयार केली आहे.
हत्ती मानवी वस्तीच्या दिशेने फारच जाऊ लागला तर त्याला हुसकावण्यासाठी वन कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्यात आली आहे. माणूस आणि वन्यप्राणी यांच्यात काही अंतर राखून एक सहवासच या परिसरात सुरू झाला आहे. हत्ती शंभर असू देत. पण शेतीच्या नुकसानीपासून त्यांना रोखावे. खास हत्तीसाठी जंगलातच ऊस, भात, नाचणी, माड, केळीची वन विभागाने शेती करावी, अशी शेतकऱ्यांची विनंती आहे आणि हत्ती आणि माणूस यांच्यातला संघर्ष टाळायचा असेल तर वन विभागाला हे करावेच लागणार आहे.
हत्तीवर वन विभागाचे लक्ष
हत्ती हे कोल्हापूरचे वनवैभव आहे, त्याला जपलेच पाहिजे. पण त्याच्यापासून शेतीचे नुकसान होणार नाही, यासाठी वन खाते पूर्ण खबरदारी घेत आहे. आता ती दोन पिल्लांसोबत चंदगड परिसरात व दुसरा हत्ती सिंधुदुर्ग वेशीवर वावरतो आहे. त्याच्यावर वन कर्मचारी रोज देखरेख ठेवून आहेत.
गुरुप्रसाद, मुख्य उपवनसंरक्षक,कोल्हापूर
गरज भासल्यास ड्रोनचाही वापर
आम्ही ठिकठिकाणी हत्ती संरक्षक कुट्या उभ्या केल्या आहेत. त्यात वन कर्मचाऱ्यांची पथके आहेत. हत्तीच्या हालचालीवर त्याच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर या पथकाचे लक्ष आहे. गरज लागल्यास ड्रोनचाही वापर केला जाणार आहे.
प्रशांत आवळे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर
हत्ती समूहप्रेमी असतो
हत्ती समूहप्रेमी असतो. जर कळपात नर पिल्ले असतील तर ती वयात आल्यानंतर म्हणजे तीन ते पाय वर्षानंतर कळप सोडतात. एकटे वावरतात. मादी पिल्ले मात्र कळपातच राहतात .संपूर्ण कळपावर मादीचेच नियंत्रण असते. आणि नर हत्ती कळपाच्या पुढे राहून सरक्षकाची भूमिका बजावत असती.
विशाल माळी, वन अधिकारी