नैतिकतेची ऐशीतैशी
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा म्हणजे लोकदबावाचाच दणका म्हटले पाहिजे. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मागच्या 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा उजवा हात असलेल्या वाल्मिक कराडसह मुंडेंच्या अनेक समर्थकांची नावे पुढे आली होती. याशिवाय खंडणीसाठीच ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणात वाल्मिक कराडसह काही जणांना अटक करण्यात आली असली, तरी अटकेदरम्यानही या मंडळींची शाही बडदास्त ठेवण्यात आल्याचे बोलले जाते. वास्तविक, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील आर्थिक व राजकीय संबंध कधीच लपून राहिलेले नाहीत. स्वत: मुंडे यांनीही ते नाकारले नसल्याचे दिसते. वाल्मिक अण्णांशिवाय धनंजयचे पानही हलत नाही, या पंकजा मुंडे यांच्या वाक्याचा प्रत्यय बीडमधील जनतेनेही वारंवार घेतल्याचे सांगण्यात येते. अशा परिस्थितीत या प्रकरणात संशयाची सुई आपल्याकडे वळूनही मुंडे यांनी जो निगरगट्टपणा दाखवला, तो समर्थनीय ठरत नाही. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात वादात सापडल्यानंतर अनेक मुख्यमंत्री व मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याची उदाहरणे आहेत. आर. आर. पाटील यांनी तर अनवधानाने उच्चारलेल्या हिंदीतील चुकीच्या विधानावरून गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दस्तुरखुद्द अजितदादा पवार यांनीही सिंचन घोटाळाप्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचा इतिहास फार जुना नाही. मात्र, मागच्या तीन महिन्यात महाराष्ट्राचे समाजजीवन एकाच विषयाभोवती फिरत असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंडे यांचा राजीनामा घेण्याचे धारिष्ट्या दाखवले नाही. ना मुंडे यांनी पद सोडण्याची तसदी घेतली. ओबीसी व्होटबँक तुटू नये म्हणून राज्यकर्ते असे दिरंगाईचे राजकारण करत असतील, तर तेही असंवेदनशीलतेचेच द्योतक ठरते. देशमुख यांची हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आली, इतकेच कालपरवापर्यंत महाराष्ट्रातील जनता जाणून होती. परंतु, आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त करण्यात आलेले 15 व्हिडीओ आणि 8 छायाचित्रे बघता या हत्याकांडात मुंडे समर्थकांनी क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे पहायला मिळते. या व्हिडीओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपींनी संतोष देशमुख यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आल्याचे दिसते. देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून त्यांच्या चेहऱ्यावर लघुशंका करण्याची कृती म्हणजे विकृतीचा कळसच होय. त्यामुळे याबाबतची छायाचित्रे प्रसृत होताच त्याविरोधात महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. या सगळ्यातून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर लगोलग मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला, तरी जो बुंद से गई, वो हौद से नही आती, हे त्यांनी लक्षात ठेवावे. खरे तर या प्रकरणात वाल्मीक कराड आणि त्याच्या आकाचे नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते. तथापि, आपल्या मतपेढीच्या ताकदीवर मुंडे यांनी अख्ख्या सरकारलाच वेठीस धरण्याचे धोरण अवलंबले. मनोज जरांगे, भाजप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच विरोधी पक्षांनी रान उठवूनही मुंडे बधण्यास तयार नव्हते. तथापि, संतोष देशमुख हत्याकांडाच्या अंगावर काटा आणणाऱ्या छायाचित्रांनी संतापाची लाट उसळल्यानंतर मुंडे यांना राजीनामा भाग पडले. मुख्यमंत्र्यांनीही चटकन त्यांना कार्यमुक्त करण्याची घोषणा केली. परंतु, हीच तातडी आधी दाखवली गेली असती, तर मुंडेंची आणि सरकारची लाज थोडी बहुत तरी वाचली असती. आपल्या राजीनाम्यामागे प्रकृतीचे कारण आहे, असे सांगण्याचाही मुंडे यांनी प्रयत्न केला. याचा अर्थ या प्रकरणाची नैतिक जबाबदारी अद्यापही त्यांनी स्वीकारली नसल्याचे दिसून येते. मागाहून राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या पत्रकात त्याला नैतिकतेची कोंदण लावले असलेही. मात्र, इतके सारे होऊन एखाद्या मंत्र्याकडून नैतिकतेची चाड दाखविली जात नसेल, तर ते नक्कीच भयंकर होय. पंकजा मुंडे यांनी तर धनंजयला शपथच द्यायला नको होती. त्यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता, अशी विधाने केली आहेत. मुळात पंकजाताईंनीही ही भूमिका आधीच घेतली असती, तर ते अधिक योग्य ठरले असते. आता देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार व अंजली दमानिया यांच्यासह अनेकांनी केली आहे. असे असले, तरी मुंडे यांच्या यांच्याविरोधात कोणता ठोस पुरावा आहे, हे आधी तपासावे लागेल. त्यांच्याविरोधात ठोस पुरावा असेल, तरच त्यांना सहआरोपी करता येईल, असे तज्ञ सांगतात. दुसऱ्या बाजूला अंजली दमानिया यांनी मुंडे यांची आमदारकीही घालवण्याचा इशारा दिला आहे. अर्थात तसे करायचे झाल्यासही ठोस गोष्टी समोर आणाव्या लागतील. सध्याचे अपडेट्स बघता सुधारित आरोपपत्राच दाखल करावे लागेल का, हेही पहावे लागेल. राज्यात महायुतीचे सरकार येऊन चार महिने झाले आहेत. मात्र, हत्याकांड, बलात्कारासह बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेने राज्यात चाललेय तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो. देशमुख हत्याकांडाने राज्याचे झालेली बदनामी आणि नैतिकतेचे उडालेले धिंडवडे बघता या गुन्ह्यात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळणे आवश्यकच ठरते.