लाळ्याखुरकत लसीकरणाच्या आठव्या फेरीला सुरुवात
बेळगाव : लाळ्याखुरकत रोग हद्दपार करण्यासाठी पशुसंगोपन खात्याने कंबर कसली आहे. वर्षातून दोन वेळा जिल्ह्यातील जनावरांना गोठ्यावर जाऊन लस टोचली जात आहे. नुकतीच आठव्या फेरीला सुरुवात करण्यात आली असून, सर्व पशु पालकांनी आपल्या जनावरांना लाळ्याखुरकत लस टोचून घ्यावी, असे आवाहन पशुसंगोपन खात्याकडून करण्यात आले आहे. पल्स पोलिओच्या धर्तीवर पशुसंगोपन खात्याकडून देखील लाळ्याखुरकत रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तरी देखील दरवर्षी जिल्ह्यात या ना त्या ठिकाणी जनावरांना लाळ्याखुरकत रोगाची लागण होताना दिसत आहे. कर्नाटक राज्यात जनावरांना लाळ्याखुरकत लस टोचली जात आहे. मात्र महाराष्ट्रात लसीकरणाची तीव्रता कमी आहे.
बहुतांश जनावर मालक महाराष्ट्रातून जनावरांची खरेदी करतात. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बैलजोड्या नेल्या जातात. तेथूनच लाळ्याखुरकत रोगाचा पुन्हा फैलाव होत आहे. मा, ज्या जनावरांना लस टोचण्यात येते, त्या जनावरांना रोगाचे लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. एकंदरीत बेळगाव जिल्ह्यातून लाळ्याखुरकत हद्दपार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आठव्या फेरीला नुकतीच सुरुवात झाली असून, ही मोहीम महिनाभर चालणार आहे. पशुसंगोपन खात्याचे डॉक्टर व त्यांचे सहकारी गोठ्यावर जाऊन जनावरांना लस टोचत आहेत. त्यामुळे याचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका पशु वैद्याधिकारी डॉ. अनंत पाटील यांनी केले आहे.