दृष्टिहीन मुलांची शिक्षण प्रक्रिया होणार सोपी
व्हीटीयूच्या विद्यार्थ्यांकडून नवीन सॉफ्टवेअर
बेळगाव : एआयचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग कृतिशील उपक्रमांसाठीसुद्धा करता येऊ शकतो. हे सिद्ध करत व्हीटीयूच्या बाळकृष्ण तारीहाळ व अशोक अम्मणगी या दोन विद्यार्थ्यांनी दृष्टिहीन मुलांसाठी व मोठ्यांसाठी नवीन सॉफ्टवेअर तयार केले आहे, ज्यामुळे दृष्टिहीन मुलांची शिक्षण प्रक्रिया सोपी होणार आहे.बाळकृष्ण व अशोक यांनी एक सॉफ्टवेअर व हार्डवेअर तयार केले आहे, ज्याद्वारे त्याला स्पर्श केल्यावर एआयच्या मार्गदर्शनाखाली ही मुले शिकू शकतील. चॅटजीपीटीच्या माध्यमातून अशी सुलभता मिळत नसल्याने हे नवीन सॉफ्टवेअर दृष्टिहीनांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. दृष्टिहीन मुले ब्रेल लिपीला स्पर्श करतील किंवा टाईप करतील तेव्हा एआयचा आवाज त्यांना मार्गदर्शन करणार आहे, जेणेकरून त्यांना सहज आकलन होईल. हे दोघेही व्हीटीयूमध्ये एम.टेक.च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. त्यांना व्हीटीयूचे कुलगुरु डॉ. विद्याशंकर यांचा पाठिंबा व सीएससी चेअरपर्सन डॉ. संतोष देशपांडे व डॉ. रोहित कल्लेवाळ, डॉ. आर. एच. गौडर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.