करमळी कुवळकातोर बांधाची कडा कोसळली
पावसाळ्यात मोठे भगदाड पडण्याची शक्यता, तातडीने दुरुस्तीची शेतकऱ्यांची मागणी, बांधाचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप
तिसवाडी : गेल्या वर्षी पाच कोटी खर्च करून नवीन बांधलेल्या करमळी येथील कुवळकातोर शेतीच्या बांधाची नदीच्या बाजूची कडा दोनकडे नुकतीच कोसळली आहे. याची तातडीने दुरुस्ती न केल्यास ऐन पावसाळ्यात मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी बांधाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे. बांधाला भगदाड पडल्यास झुवारी नदीचे खारे पाणी करमळी गावातील कुवळकातोर, धाडो शेतीच्या बाजूला कोपे, पाटयार येथील घरांनी, शेतीत घुसेल. त्यामुळे घरांचेही मोठे नुकसान होईल. तसेच धाडो,कुवळकातोर येथील शेतीचे बांध कोसळतील व परिसरातील बागायतीसुध्दा नष्ट होतील. सध्या कुवळकातोर शेतीच्या बांधाची बाजू कोसळली आहे. बांधाची माती पाण्याने वाहूनही गेली आहे. हा प्रकार बांधावरून येणाऱ्या ट्रकांमुळे घडला आहे.