For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण आफ्रिका खंडातील इबोला संकट

12:20 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण आफ्रिका खंडातील इबोला संकट
Advertisement

गेल्या शनिवारी  जागतिक आरोग्य संघटनेने सध्या झपाट्याने पसरत चाललेल्या इबोला विषाणू साथीबाबत जगाला इशारा दिला आहे. यावेळी जिनिव्हा येथील 79 व्या जागतिक आरोग्य सभेत बोलताना या संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस म्हणाले, ‘अलीकडे इबोला आणि हंता विषाणूंच्या उद्रेकांनी हे दाखवून दिले आहे की, जग अजूनही वेगाने पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगांसाठी असुरक्षित आहे.’ याच दरम्यान जागतिक आरोग्य ‘संघटनेने इबोला’ आजाराच्या साथीस प्रतिसाद देताना, जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

Advertisement

काँगो लोकशाही प्रजासत्ताक, युगांडा व दक्षिण सुदान या दक्षिण आफ्रिका खंडातील पश्चिमेकडे वसणाऱ्या देशांतील इबोलाची साथ आता भारत, अमेरिकेसह इतर देशांना सतर्कतेचे इशारे देण्यास कारणीभूत ठरली आहे. अनेक देशांनी या भागांचा प्रवास टाळण्याच्या सूचना सरकारी पातळीवर जारी केल्या आहेत. भारतात बेंगळूर व नागपूर सारख्या शहरात संशयित रूग्ण आढळल्याने चिंता वाढल्या होत्या. इबोलाची सर्वाधिक लागण झालेल्या काँगो लोकशाही प्रजासत्ताकात मृत्यूची संख्या जवळपास 234 पर्यंत आणि संशयित रूग्णांची संख्या हजाराच्या आसपास पोहचली आहे. 1976 च्या सुमारास आफ्रिकन प्रदेशात विषाणूची ओळख पटल्यापासून आतापर्यंत या महामारीच्या 17 साथी आल्या आहेत. 2014 ते 2016 या काळात ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात मोठी व प्राणघातक इबोला साथ पश्चिम आफ्रिकेत पसरली. जवळपास तीस हजार लोकांना संसर्ग झाला होता. अकरा हजारांहून अधिक लोकांचा या साथीत मृत्यू झाला. यावरून इबोला संकटाची भयावहता पुरेशी स्पष्ट होते.

इबोला रोग काय आहे?

Advertisement

इबोला हा प्राण्यांपासून माणसात संक्रमित होणारा आजार आहे. इबोलाचा प्रसार सर्वप्रथम फळभक्षी वटवाघुळात होतो. त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कातून किंवा जे इतर प्राणी, पक्षी फळभक्षी वटवाघूळांच्या संपर्कात येतात त्यांच्या संपर्कातून तो माणसाला होतो. एकाकडून दुसऱ्याकडे जात त्याचे सहज साथीत रूपांतर होते. इबोलाचा संसर्ग जलद कळून येत नाही. रोगाने शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षणे दिसण्यास 21 दिवसांचा कालावधी लागतो. ही लक्षणे अचानक उद्भवतात. सामान्य फ्लू केंवा मलेरियाप्रमाणे येणारा ताप, डोकेदुखी, थकवा या लक्षणांनी सुरवात होते. आजार जसा वाढतो तसे वांती, अतिसार असे त्रास सुरू होतात. त्यामुळे अवयव निकामी होऊ शकतात. काही रूग्णांत अंतर्गत किंवा बाह्य रक्तस्त्राव सुरू होतो. कोणत्याही संक्रमित शारिरीक द्रव्यांच्या संपर्कातून विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचतो. म्हणूनच संशय येताच विलगीकरण प्रक्रिया संभाव्य इबोला रूग्णापासून इतरांस सुरक्षित ठेऊ शकते. इबोला विषाणूचे एकूण चार प्रकार आहेत. झाईर, सुदान, बुंदीब्युगो आणि ताई फॉरेस्ट अशी त्यांची नावे आहेत. यातील झाईर विषाणू बहुतेक मानवी साथींचे कारण म्हणून पाहिला जातो. ज्यात पश्चिम आफ्रिकेतील 2014-2016 मधील ऐतिहासिक साथ व काँगो प्रजासत्ताक आणि गॅबॉन सारख्या देशातींल लहान साथींचा समावेश आहे. सुदान विषाणुमूळे दक्षिण सुदान, युगांडा व काँगो लोकशाही प्रजासत्ताकात साथी पसरल्या आहेत. ताई फॉरेस्ट विषाणू खुपच दुर्मीळ आहे. त्याचा प्रादुर्भाव नगण्य आहे.

सध्याच्या साथीचे कारण असलेला ‘बुंदीब्युगो’ विषाणू हा युगांडातील ज्या जिल्ह्यात त्याचा सर्वप्रथम प्रादुर्भाव झाला त्या जिल्ह्याच्या नावाने ओळखला जातो. हा विषाणू यापूर्वीच्या दोन साथींचे कारण असून सध्याची साथ तिसरी आहे. या साऱ्या साथी काँगो आणि युगांडाच्या सीमेवर पसरल्या होत्या. त्यातही झाईर इबोलाच्या विषाणूवर लस उपलब्ध आहे, जी आता या अत्यंत प्राणघातक विषाणूच्या भविष्यातील साथींना रोखण्यासाठी एक प्रभावी साधन बनली आहे. मात्र सध्या पसरत असलेल्या इबोलाच्या बुंदीब्युगो विषाणूवर अद्याप कोणतीही रामबाण लस उपलब्ध नाही. झाईर विषाणूवरील लसीकरणामुळे बुंदीब्युगोपासून थोडे संरक्षण मिळू शकते असे काही पुरावे आहेत, पण ते अंतिम नाहीत.

साथ नियंत्रणातील अडथळे

द. आफ्रिका खंडात, काँगो लोकशाही प्रजासत्ताक आणि काँगो प्रजासत्ताक हे एकमेकाशेजारी असलेले दोन वेगवेगळे देश आहेत. त्यामुळे इबोलाची सद्यकालीन साथ नेमकी कोठे आहे. याबाबत गेंधळ संभवतो. तर ती संपूर्ण पश्चिम युरोप इतके मोठे क्षेत्रफळ असलेल्या काँगो लोकशाही प्रजासत्ताकात पसरली आहे आणि आसपासच्या किमान दहा देशांना साथीचा सर्वाधिक धोका आहे. 1994 च्या खांडा नरसंहारापासून कोबाल्ट, कोल्टन, हिरे, तांबे या खनिज संपत्तीने, नद्या व वर्षावनानी संपन्न असलेले काँगो लोकशाही प्रजासत्ताक गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ सशस्त्र संघर्षाने ग्रासले आहे. वंशवाद, खनिज साठ्यांवर नियंत्रण, सत्ता यामुळे उद्भवणाऱ्या अविरत संघर्षामुळे सरकार व प्रशासन व्यवस्था खिळखिळी झाली आहे. या अस्थिरतेमुळे इबोलासारख्या गंभीर महामारीवर खबरदारी व निवारणाची प्रक्रिया कमकुवत करून रोग प्रसार व मृत्यूच्या शक्यता वाढवल्या आहेत. उशीरा शोध आणि असुरक्षितता हा रोग निवारणातील एक मोठा अडथळा आहे. एवाद्या व्यक्तीस संसर्ग झाल्यापासून निदान होईपर्यंत लागणारा वेळ हे एक मोठे आव्हान आहे. इबोला अत्यंत संसर्गजन्य आहे. त्याचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी संशयित रूग्णास विनाविलंब विलगीकरणात ठेवणे आवश्यक असते. उशीरा निदानास प्रामुख्याने प्रादेशिक अस्थिरता व असुरक्षितता जबाबदार आहे. चुकीचे निदान होण्याच्या शक्यता इबोलाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात दिसून येतात. फ्लू, मलेरिया, विषमज्वर, लस्सा ताप या आजारांची आणि इबोलाची लक्षणे सारखीच असतात, त्यामुळे अचूक निदान कठीण बनते. महत्त्वाचे म्हणजे, इबोलाचा बुंदीब्युगो विषाणू अगदी अलीकडील इबोलाच्या साथींमध्ये उपचार केलेल्या विषाणूपेक्षा वेगळा आहे. काही दशकांपूर्वी शोध लागलेल्या झाईर इबोला विषाणूच्या तुलनेत 2007 मध्ये शोध लागलेल्या या विषाणूवर लस व औषधोपचाराच्या संदर्भात कमी संशोधन झाले आहे. त्यामुळे धोका अधिक आहे. परंपरेतून आलेल्या विधी व प्रथा रोग निवारणात अडथळा आणि प्रसार वाढवण्यास कारणीभूत ठरतात.

काँगो लोकशाही प्रजासत्ताकासारख्या अनेक आफ्रिकन देशांमध्ये धार्मिक दफनविधी सामान्य आहेत. मृत्यू हा दुसऱ्या जगात किंवा पूर्वजात सामील होण्याचा पवित्र मार्ग आहे. या श्रद्धेतून हे विधी जन्मास आले आहेत. बहुतेकदा याची सुरवात सामुदायिक शोक आणि अंत्यविधीपूर्व कर्मकांडाने होते. अशावेळी मृतदेहास स्पर्श करणे, स्पर्श करणाऱ्याच्या संपर्कात येणे अटळ होते. मृतदेह जर इबोलाग्रस्त रूग्णाचा असेल तर अंत्यविधीस हजर असलेल्या अनेकांना लागण झाल्याच्या घटना  काँगोमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेसह आरोग्य सेवा क्षेत्रातील अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या निधीत कपात केल्याने काँगोसह जगभरातील सार्वजनिक आरोग्य उपक्रमांच्या सेवा कार्यावर प्रतिकुल परिणाम होऊन साथी वाढत आहेत.

कोणते उपाय आवश्यक

काँगो लोकशाही प्रजासत्ताकातील इबोलाचा सामना करण्यासाठी एक जलद बहुस्तरीय प्रतिसादाची आवश्यकता आहे. यासाठी जलद रूग्ण शोध, बहुराष्ट्रीय सहकार्य, वेगवान सहयोगी निगराणी आणि सामुदायिक सहकार्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. या प्रकारच्या इबोलावर लस व औषधे उपलब्ध नसल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी जनजागृती व संवेदनशीलता वाढवण्यासाठी सामुदायिक उपक्रम सुरू केले पाहिजेत. त्यांनी सार्वजनिक आरोग्य कायद्यांची अंमलबजावणी देखील केली पाहिजे. विशेषत: असुरक्षित दफनविधींना प्रोत्साहन देणाऱ्या आणि इबोला संसर्गाचा धोका वाढवणाऱ्या संस्कृतीना लक्ष्य करणाऱ्या कायद्यांचा कठोर वापर केला पाहिजे.

अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :

.