महाकुंभाचा कालावधी वाढविला जावा
अखिलेश यादव यांची राज्य सरकारकडे मागणी
वृत्तसंस्था / लखनौ
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याची सांगता महाशिवरात्रीच्या दिवशी, अर्थात 26 फेब्रुवारीला होणार आहे. मात्र, अद्यापही कोट्यावधी लोकांना संगमस्नानाच्या संधीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे महाकुंभमेळा आणखी काही कालावधीसाठी वाढविला जावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे. कालावधी वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांनी आपली विनंती उत्तर प्रदेश सरकारकडे पाठविली आहे.
महाकुंभ पर्वणीचा पूर्वनिर्धारित कालावधी आता पूर्ण होत आला असला, तरी अद्यापही प्रयागराजकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या आणि बसेस यांच्यात तुडुंब गर्दी आहे. आणखी काही कोटी भाविक संगमस्नानासाठी उत्सुक आहेत. साऱ्या देशातून लोकांची रीघ उत्तर प्रदेशकडे लागली आहे. अशा स्थितीत 26 फेब्रुवारीला हा महाकुंभमेळ्याची सांगता केली गेल्यास कोट्यावधी भाविक निराश होण्याची शक्यता आहे. त्यांची संधी गमावली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने हा कालावधी आणखी 15 दिवसांनी तरी वाढवावा, अशी त्यांची मागणी आहे.
पूर्वी 75 दिवस
पूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभांसाठी 75 दिवसांचा कालावधी दिला जात असे. यंदा तो कमी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रचंड गर्दी होऊन भाविकांना असुविधांचा त्रास सहन करावा लागत आहे. कालावधीत वाढ केल्यास सर्व इच्छुक भाविकांना पवित्र स्नानाची संधी मिळेल आणि त्यांचे समाधान होईल. राज्य सरकारने तशी व्यवस्था करावी, असेही प्रतिपादन यादव यांनी केले आहे.
अपर्णा यादव यांच्याकडून कौतुक
अखिलेश यादव यांच्या नातेवाईक अपर्णा यादव यांनी महाकुंभमेळ्याच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासंबंधी उत्तर प्रदेश सरकारची प्रशंसा केली आहे. यादव या उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. या पर्वणीत सहभागी झालेल्या भाविकांची अतिप्रचंड संख्या पाहता उत्तर प्रदेश सरकारने सर्व व्यवस्था अगदी उत्तम ठेवल्याचे दिसून येते. भाविकांना कमीत कमी त्रास व्हावा या दृष्टीने प्रशासन कार्य करीत आहे. प्रत्येक प्रशासकीय अधिकारी त्याचे उत्तरदायित्व नीट समजून घेऊन कार्य करीत असल्याने आत्तापर्यंत व्यवस्था सुरळीत झाली, अशी भलावण त्यांनी केली.