प्रमोद जठारांना आमदार करण्याची दुहेरी रणनीती
विधान परिषद निवडणुकीत अनेक दिग्गज स्पर्धेत असताना भारतीय जनता पक्षाने कोकणातील माजी आमदार प्रमोद जठार यांना विधान परिषदेवर घेऊन आमदार केले. यावर बरीच चर्चा सुऊ असून त्यांना आमदार करण्यामागे तर्क-वितर्क बांधले जात आहेत. मात्र, रिफायनरी प्रकल्पासाठी आक्रमकपणे बाजू मांडणारा स्थानिक नेता मिळविणे आणि त्याचवेळी कोकणातील राजकारण पूर्णपणे एकाच कुटुंबाच्या हाती न जाता, मूळ भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवणे, अशी ही दुहेरी रणनीती भारतीय जनता पक्षाने आखलेली दिसत आहे.
एप्रिल 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाने कोकणातील माजी आमदार प्रमोद जठार यांची विधान परिषदेवर वर्णी लावली आहे. त्यांच्या या नियुक्तीकडे निव्वळ राजकीय पुनर्वसन म्हणून न पाहता, कोकणातील बदलत्या राजकीय समीकरणांचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे. आमदार प्रमोद जठार यांची निवड ही खासदार नारायण राणे यांना शह देण्यासाठी आहे की रिफायनरी प्रकल्पासाठी, यावर चर्चा सुऊ झाल्या आहेत. मूळ भाजप विऊद्ध दुसऱ्या पक्षातून आयात नेतृत्व कोकणात, विशेषत: सिंधुदुर्ग जिह्यात असून भाजपमध्ये दोन गट स्पष्टपणे जाणवतात. एक म्हणजे प्रमोद जठार यांच्यासारखे ‘मूळ भाजप’ कार्यकर्ते आणि दुसरे ‘राणे समर्थक’ जे नंतर भाजपमध्ये आले.
विद्यमान खासदार नारायण राणेंच्या ताकदीला सुरुंग लावून 2009 मध्ये अवघ्या 34 मतांनी आमदार बनलेल्या प्रमोद जठार यांना 2014 मध्ये मात्र राणेंचेच चिरंजीव असलेले विद्यमान पालकमंत्री नीतेश राणेंकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. विशेष म्हणजे तेच राणे कुटुंबिय नंतर भाजप प्रवेशकर्ते झाले. तेव्हा जिल्ह्यातील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका समजावून सांगण्याची जबाबदारीही जठार यांनीच पार पाडली होती. अर्थात भाजपच्या तिकिटावर सलग दोन निवडणुका लढलेल्या प्रमोद जठारांना नीतेश राणेंच्या भाजप प्रवेशामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यापासून वंचित राहावे लागले. ही सर्व परिस्थिती असतानाच आता जठारांना पक्षाने विधान परिषदेचे आमदार बनविले आहे. यावरुन भाजप पक्ष आपल्या मूळ कार्यकर्त्यांना ताकद देऊ पाहात आहे, हेच स्पष्ट होते.
खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे आधीच मोठी पदे आहेत. अशा स्थितीत मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरू नये, यासाठी प्रमोद जठार यांना आमदारकी देऊन पक्षाने ‘निष्ठेचे फळ’ दिले आहे, असे मानले जाते. प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचे ध्येय ‘2029 पर्यंत कोकणात भाजपचे संघटन अधिक मजबूत करणे आणि भाजपचे स्वतंत्र लोकप्रतिनिधी वाढविणे’ हे आहे. हे विधान अप्रत्यक्षपणे राणे कुटुंबावरील अवलंबित्व कमी करण्याच्या रणनीतीचा भाग असू शकते. रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा प्रमोद जठार हे कोकणातील नाणार-रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचे सुऊवातीपासूनचे खंबीर समर्थक राहिले आहेत. त्यांनी यापूर्वी ‘जागा दाखवा, नाहीतर प्रकल्प संपवा’ अशी आक्रमक भूमिका घेत, सरकारलाच घरचा आहेर दिला होता. रिफायनरीमुळे रोजगार निर्मिती होईल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
जठार यांनीच माहिती दिली होती की, प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावर आता पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून आहे. त्यांना विधान परिषदेवर पाठविण्यामागे या मह्रवाकांक्षी प्रकल्पाला स्थानिक पातळीवर गती देणे, हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश असू शकतो.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या महायुतीला महाराष्ट्रासह कोकणात ‘न् भूतो न् भविष्यती’ असे घवघवीत यश मिळाले. विशेष म्हणजे सिंधुदुर्गात भाजप पक्ष एवढा प्रबळ बनला की, खासदारांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत अनेक सत्तास्थाने भाजपकडे गेली. परंतु, सिंधुदुर्गात नेमका कुठला पक्ष भाजप की अघोषित राणे समर्थक पक्ष याची चर्चा सुरु झाली. काही जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये बंडाचे निशाण रोवले गेले. काही उमेदवार निवडूनही आले. यावेळी जिल्ह्यात भाजपमध्ये राणे व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असे दोन स्वतंत्र गट कधी छुप्या, तर कधी उघड पद्धतीने कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. जठार यांना मिळालेल्या आमदारकीत रवींद्र चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका आहे, हे नाकारता येत नाही. प्रमोद जठार आमदार झाल्यानंतर सिंधुदुर्गात आले, त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मूळ भाजप कार्यकर्त्यांचीच गर्दी दिसून आली.
जठार यांची आमदारकी राणेंना ‘चेकमेट’ देण्यासाठी आहे, असे वरकरणी वाटत असले, तरी जठार यांनी आपल्या प्रतिक्रियेत सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘राणेंच्या येण्याने भाजपची ताकद वाढली आहे’ आणि आपण सर्वांना सोबत घेऊन काम करू. मात्र, ‘शतप्रतिशत भाजप’चा नारा देऊन त्यांनी पक्षाची भविष्यातील स्वायत्तता अधोरेखित केली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने रिफायनरी प्रकल्पासाठी आक्रमकपणे बाजू मांडणारा स्थानिक नेता मिळविणे आणि त्याचवेळी कोकणातील राजकारण पूर्णपणे एकाच कुटुंबाच्या हाती न जाता मूळ भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवणे, अशी ही दुहेरी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.
संदीप गावडे