अपघातात पळून गेलेल्या चालकाचा कुडाळ पोलिसांकडून छडा
पिंगुळी येथे झाला होता अपघात ; धडक देणारे वाहन शासकीय
कुडाळ -
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस मार्गावर पिंगळी - गुढीपूर येथे रिक्षाला मागून जोराची धडक देऊन बोलेरोसह पळून गेलेला चालक व त्या महिंद्रा बोलेरोचा छडा लावण्यात कुडाळ पोलीसांनी अखेर यश आले. महाराष्ट्र शासनाच्या पतन विभाग (सिंधुदुर्ग ) या कार्यालयाची सदर बोलेरो असून चालक प्रताप शंकर ठाकूर (रा.कोनाळकट्टा, दोडामार्ग ) असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे . काही दिवसापूर्वी हा अपघात झाला होता. रिक्षा चालक रूपेश विनायक पाटकर ( 44, रा.पाट) आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन 27 जुलै रोजी दुपारी पिंगुळी - गुढीपूर येथील महींद्रा शो रूम येथून पिंगुळी- शेटकरवाडीकडे जाण्यासाठी निघाले.ते शेटकरवाडी कडे वळण्यापुर्वी अलीकडे असलेल्या प्रवाशी शेडजवळील गतीरोधकाकडे त्यांनी रिक्षाचा वेग कमी केला असता, मागून येणाऱ्या बोलेरो पॅसेंजरने त्यांच्या रिक्षाला मागून जोरात दिली होती.यात रिक्षाचालक श्री पाटकर व दोन प्रवाशांना दुखापत झाली होती. धडक देणारे वाहन पांढऱ्या रंगाचे बोलेरो पॅसेंजर होती. त्या बोलेरोच्या मागील बाजूला लाल रंगात महाराष्ट्र शासन असे लिहीलेले होते,असल्याचे पाटकर यानी फिर्यादीत म्हटले होते. अपघातानंतर बोलेरो चालकाने लागलीच बोलेरो मागे घेत महामार्गावरून बोलेरोसह पळ काढला होता. अज्ञात बोलेरो चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, अपघात केलेले वाहन हे महाराष्ट्र शासनाचे असूनही वाहन चालक पळून गेल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. सदर अपघात केलेल्या वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान कुडाळ पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते.गुन्हयातील अज्ञात बोलेरो चालकाचा शोध घेण्यासाठी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पोलीस पथक स्थापन केले होते . पोलिसांनी काही लोकांकडून माहिती घेतलीतसेच महामार्ग व काही खासगी सी सीटिव्ही फुटेज तपासण्यात आले होते. पोलिसानी तपास करून अपघातग्रस्त महिंद्रा बोलेरो वाहन व चालक निष्पन्न केला . सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले,उपविभागीय पोलीस अधिकारी (सावंतवाडी ) विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शकाखाली पोलीस अंमलदार कृष्णा परुळेकर व सुबोध माळगावकर यांनी केली.