दुचाकी घसरून चालकाचा मृत्यू ! मुलीला भेटण्यासाठी जाताना काळाचा घाला
रहिमतपूर ते वाठार किरोली रस्त्यावरील घटना
सातारा प्रतिनिधी
वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथे मुलीला भेटण्यासाठी जाताना दुचाकी घसरून झालेल्या अपघात पाडळी (ता. कोरेगाव) येथील एकाचा मृत्यू झाला आहे. यादवराव रघुनाथ जाधव (वय 50) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाडळी गावचे रहिवाशी यादवराव जाधव हे त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी गुरूवारी रात्री वाठार किरोली येथे जात होते. यावेळी त्यांची दुचाकी घसरून ते रस्त्यावर पडले. यामुळे त्यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर इजा होऊन ते जखमी झाले. या अपघातात ते बेशुद्ध होवून रस्त्याच्या कडेला पडले होते. मॉर्निंगवॉकला जाणाऱ्या लोकांनी त्यांना रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेले पाहिले. त्यानंतर याची माहिती रहिमतपूर पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी जावून यादवराव जाधव यांना रूग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यांच्या जवळील कागदपत्रावरून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. नातेवाईकांना रूग्णालयातच पोहचून मृत्यू झाल्याचे कळताच त्यांना धक्का बसला. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.