2036ची ऑलिंपिक स्पर्धा भरवण्याचे स्वप्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारताने नुकताच 2036 ऑलिंपिक स्पर्धा आयोजनाकरिता आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे अर्ज केला असून त्याबाबतच्या निर्णयाकडे आता तमाम भारतीय खेळाडूंचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा पॅरिस ऑलिंपिकच्या पार्श्वभूमीवर भारतही ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन करणार असे सुतोवाच केले होते. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याकडे गांभिर्याने पाहिले जात होते.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचे पाऊल उचलताना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती यांच्याकडे लेटर ऑफ इंटेंट म्हणजेच ऑलिंपिक स्पर्धा आयोजनाबाबतचे इच्छादर्शक पत्र दाखल केले आहे. 2036 वर्षामध्ये ऑलिंपिकसह पॅरालिंपिक स्पर्धा भरवण्याची इच्छा भारताने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे व्यक्त केली आहे.
म्हणजेच आजपासून सुमारे 12 वर्षानंतर भारतामध्ये ऑलिंपिक स्पर्धा भरवण्याचा मानस केला गेला असून सदरच्या अर्जाबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती कोणता निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. ऑलिंपिक स्पर्धा भरवण्यासाठीच्या आवश्यक मैदाने व इतर पायाभूत सुविधा त्याचप्रमाणे खेळाडूंच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था यासोबत इतर गोष्टींचा विचार येणाऱ्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती करेल. भारत सरकारने ऑलिंपिक स्पर्धा आयोजनाबाबतचे पत्र 1 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे सादर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या वर्षीच 2036 च्या ऑलिंपिक स्पर्धा भरवण्याबाबतचे मत व्यक्त केले होते. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे स्पर्धा भरवण्याबाबत अर्ज केलेला असला तरी या स्पर्धेमध्ये सौदी अरेबिया, कतार आणि टर्की हे आघाडीवरचे देशही स्पर्धा आयोजनासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या देशांना भारत मागे टाकतो का हे पाहावे लागणार आहे. भारतामध्ये मागच्या वेळेला म्हणजेच 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन केले होते. 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अहमदाबाद हे शहर सध्याला आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते आहे.
भारताची दिग्गज क्रीडापटू पी टी उषा देखील स्पर्धा भरवण्याच्या बाजुने आहे. यासोबतच ऑलिंपिक स्पर्धेमध्ये योगा, खो-खो आणि कब•ाr यासारख्या खेळांचा समावेश करण्याबाबतही नेटाने भारताने मागणी उचलून धरली आहे. तिचे काय होते तेही भविष्यात कळणार आहे. क्रीडामंत्री मनसुख मांडवीया यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये योगा, खो-खो, कब•ाr, चेस, टी ट्वेंटी क्रिकेट आणि स्क्वॅश यासारख्या खेळांचाही समावेश केला जावा अशी मागणी केली आहे. भारताला ऑलिंपिक स्पर्धा आयोजनाची ही संधी मिळाली तर देशामध्ये आर्थिक विकास, सामाजिक प्रगती आणि युवा सशक्तिकरणाला वाव मिळण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे.
या समितीची निवडणूक झाल्यानंतरच भारताच्या अर्जाबाबत विचार केला जाणार असल्याचे समजते. अर्थात या स्पर्धेत भारत एकटा नाही वर सुचवलेले तीन देशही आहेत, हे येथे लक्षात घ्यावे लागेल. सदरच्या ऑलिंपिक स्पर्धा भरवण्यासाठी भारताला विविध प्रक्रियांना सामोरे जावे लागते. संवादासोबतच औपचारिक दृष्ट्या योग्य रकमेची बोलीही सादर करावी लागते. या बोली संदर्भातील निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला घ्यावा लागतो. सध्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांचे समर्थन भारताला लाभलेले आहे. पुढील वर्षी 18 ते 21 मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय समितीची निवडणूक अॅथेन्स, ग्रीस येथे होणार आहे.