येत्या पाच वर्षात दुपदरीकरणाचे काम पूर्ण करणार
कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांची माहिती
त. भा.प्रतिनिधी/ खेड
कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवाशी गर्दी आणि मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाला वेग दिला जाणार असून येत्या 5 वर्षात दुपदरीकरणाचे काम पूर्ण करणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली. यामुळे दररोज 100 हून अधिक रेल्वे गाड्या धावतील, असेही स्पष्ट करत यामुळे खऱ्याअर्थाने कोकणातील पर्यटनासह अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा आत्मविश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, दुपदरीकरणाच्या मार्गातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आणि वाहतूक सुरू करण्याकरिता नव्या बोगद्यांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पेडणे (गोवा) आणि जुने गोवे येथे नव्या रेल्वे बोगद्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आवश्यक निधीही मंजूर केला आहे. यामुळे प्रकल्पांच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.
सद्यस्थितीत कोकण रेल्वे मार्गावर मर्यादित गाड्या चालवल्या जातात. दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गाची क्षमता वाढून दररोज 100 पेक्षा जास्त प्रवाशी व मालवाहू गाड्या धावू शकणार आहेत. एकेरी मार्ग असल्यामुळे गाड्यांना क्रॉसिंगसाठी ताटकळत रहावे लागते. दुपदरीकरणामुळे गाड्यांचा वेग वाढून प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होईल. कोकण रेल्वे मार्गावरून होणाऱ्या मालवाहतुकीला यामुळे मोठा बुस्ट मिळणार असून कोकणातील व्यापार आणि उद्योगांनाही फायदा होणार आहे.
नवीन बोगदे आणि आधुनिक टॅकमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होईल. कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीनही राज्यातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून कोकणातील पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.
मालवाहतुकीला चालना देण्यासाठी कोलाड-सुरतकल रो-रो सेवेचा विस्तारही करण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोबरपासून या सेवेच्या फेऱ्या 12 वरून 46 करण्यात येणार आहेत. एका फेरीत 57 टन वजनाची अवजड वाहने वाहून नेण्याची क्षमता असणार असल्याचेही स्पष्ट केले.
263 किमी मार्गाचे दुपदरीकरण
सध्या संपूर्ण 741 किमी मार्गापैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्ग एकेरी आहे. त्यामुळे पुढील 5 वर्षांत पहिल्या टप्प्यात 263 किमी मार्गाचे ‘पॅच डब्लिंग‘ केले जाईल. यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळूर ते गोवा आणि गोवा ते वैभववाडी या टप्प्यांचे दुपदरीकरणासाठीचे तांत्रिक सर्वेक्षण सध्या प्रगतीपथावर आहे.
कोकण रेल्वे पूर्णपणे कर्जमुक्त
रोखे बाजारातून उभारलेल्या कर्जाचा 300 कोटी रुपयांचा हप्ता 22 सप्टेंबर रोजी फेडण्यात आला आहे. यामुळे कोकण रेल्वे पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. पुढील 5 वर्षात 300 कोटींपेक्षा जास्त वार्षिक नफ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही संतोषकुमार झा यांनी सांगितले.