चांदोली धरणाचे दरवाजे उघडले ! ३६४८ क्यूसेसने प्रतिसेकंद विसर्ग
८१.८३ टक्के धरण भरले,शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली
वारणानगर / प्रतिनिधी
वारणा नदीचा जलसाठा असलेल्या वसंत सागर या चांदोली धरणात अतिवृष्टीमुळे पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे १ मिटर ने उचलून पात्रात विसर्ग चालू केल्यामुळे वारणा नदी काठच्या गावांना महापूराचा धोका वाढला आहे.
चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी असून आज धरणात २८.१५ टीएमसी पाणीसाठा होऊन धरण ८१.८३ टक्के भरले आहे.जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग चालू झाल्याने नदीकाठच्या दोन्ही बाजूची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे.धरण क्षेत्रात आजपर्यंत १७३५ मि.मी. पाऊस पडला असून गेल्या सहा दिवसांत ३६० मि.मी. पाऊस पडला आहे त्यामुळे सहा दिवसात ६.६५ टीएमसी धरणात पाण्याची आवक झाली आहे. आजही मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे
आज मंगळवार सकाळी ११ वा. वीजनिर्मिती केंद्रातून १६०० व वक्र द्वारातून २२०० क्युसेक असा ३८०० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर गेले असून इशारा पातळी ओलांडली आहे नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आहे दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आल्याचे पाटबंधारे कोडोली उपविभागाचे सहा. अभियंता मिलींद किटवाडकर यांनी दिला आहे.