बद्रीनाथ धामचे दरवाजेही उघडले
यात्रेदरम्यान लष्करी बँड वाजला, पारंपरिक नृत्य सादर
वृत्तसंस्था/ देहराडून
चारधाम यात्रेदरम्यान रविवारी सकाळी 6 वाजता बद्रीनाथ धामचे दरवाजेही उघडण्यात आले. गणेश पूजेनंतर मुख्य पुजाऱ्यांनी मंदिराचे दरवाजे उघडले. याप्रसंगी महिलांनी लोकगीते गात पारंपरिक नृत्य सादर केले. तसेच गढवाल रायफल्सच्या बँडने पारंपरिक धून वाजवली. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही दर्शन घेत पूजा केली. आता चारधाम यात्रा पूर्णपणे सुरू झाली असून सर्व ठिकाणी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. यापूर्वी, 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने गंगोत्री-यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर 2 मे रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले होते.
बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पहिल्या दोन तासात 10 हजारांहून अधिक भाविक मंदिर परिसरात दाखल झाले होते. आता पुढील 6 महिने भाविकांना भगवान बद्रीविशाळाचे दर्शन घेता येईल. दरवाजे उघडण्यापूर्वी शनिवार, 3 मे रोजी भगवान बद्रीविशाळ यांची पालखी, आदि गुरु शंकराचार्यांचे सिंहासन, कुबेर आणि उद्धव यांची उत्सवाची पालखी धामात पोहोचली होती. शनिवारपासूनच येथे शेकडो भाविक दाखल झाल्याचे दिसून येत होते.