हृदय प्रत्यारोपणानंतर दात्याचा राहतोय प्रभाव
एका संशोधनाचा दावा
अवयव प्रत्यारोपण करविणाऱ्या रुग्णांमध्ये भावना, रुची आणि स्मृतींमध्ये अजब बदल दिसून येतात. हा बदल सर्वाधिक हृदय प्रत्यारोपण करविणाऱ्या रुग्णांमध्ये दिसुन आला आहे. परंतु किडनी, फुफ्फुस अणि चेहरा प्रत्यारोपित करविणाऱ्यांमध्ये स्वत:च्या भोजनाची पसंत, संगीत निवड आणि प्रेम तसेच रोमान्सपर्यंतच्या इच्छेत बदल झाल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये रुग्णांमधील नवी रुची आणि पसंत त्यांच्या दात्यांच्या रुचीशी मिळतीजुळती आहे. प्रत्यारोपणासोबत रुग्ण स्वत:च्या दात्याच्या स्मृती आणि भावना देखील ग्रहण करत आहे का याचा विचार आता तज्ञांना करावा लागत आहे. एका संशोधनात यासंबंधीचा दावा करण्यात आला आहे.
चालू वर्षात एक आढावा प्रकाशित करण्यात आला असून एका प्रकरणात 9 वर्षीय मुलाला तीन वर्षीय मुलीचे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले होते. तिचा मृत्यू स्वीमिंग पूलमध्ये बुडून झाला होता. माझ्या मुलाला आत पाण्याची मोठी भीती वाटू लागली असल्याचे मुलाच्या आईने सांगितले आहे. प्रत्यक्षात मुलाला दात्याचा मृत्यू कशामुळे झाला हे माहित नव्हते.
एका अन्य प्रकरणामध्ये एका कॉलेज प्राध्यापकाला एका पोलीस अधिकाऱ्याचे हृदय मिळाले. या पोलीस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर गोळी झाडण्यात आली होती. मला अनेकदा एक चमकणारा प्रकाश दिसतो आणि माझ्या चेहऱ्यावर तीव्र उष्णता जाणवते असे या प्राध्यापकाने सांगितले आहे.
खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल
एका महिलेला दात्याच्या खाण्याच्या सवयी वारशादाखल मिळाल्या. ती एक फिटनेस फ्रिक डान्सर होती. परंतु प्रत्यारोपणानंतर ती अचानक केंटकी फ्राइड चिकनचे नगेट्स खाऊ लागली. तिच्या दात्याचा जेव्हा मृत्यू झाला होता, तेव्हा त्याच्या जॅकेटमध्ये अर्धवट खाल्लेले केएफसी नगेट्स मिळाले होते असे 2002 च्या एका अध्ययनात नमूद आहे. तर अन्य एका प्रकरणात 29 वर्षीय महिला 19 वर्षीय शाकाहारी युवकाचे हृदय मिळाले होते. प्रत्यारोपणानंतर या महिलेला मांसाहारी खाण्याचा तिटकारा येऊ लागला.
अन्य वर्तनातही बदल
प्रत्यारोपणानंतर अनेकांच्या भावनिक वर्तनात बदल झाले आहेत. हृदय आणि मेंदू हे परस्परांशी अत्यंत मोठ्या प्रमाणात जोडलेले असता, हृदयात जे न्यूरॉन्स आणि पेशी असतात, त्या मेंदूसमान असतात. याचबरोबर अवयव प्रत्यारोपणानंतर जीन जे व्यक्तिमत्त्व आणि अन्य लक्षणांना नियंत्रित करतात, वेगळ्या प्रकाराने सक्रीय हेता असे संशोधकाचे सांगणे आहे.
सेल्युलर मेमरीची शक्यता
हृदय प्रत्यारोपणाद्वारे दात्याचे व्यक्तिमत्त्व आणि स्मृतींचे हस्तांतरण होऊ शकते. स्मृती आणि ओळख केवळ मेंदूत असते या पारंपरिक विचाराला यामुळे आव्हान मिळते. या बदलाचे कारण सेल्युलर मेमरी असू शकते. या सिद्धांतानुसार प्रत्येक पेशीकडे स्मृती तयार करण्याची क्षमता असू शकते, परंतु ही प्रक्रिया आतापर्यंत स्पष्ट नाही असे संशोधकांनी नमूद केले आहे.
काही जण मानतात योगायोग
काही तज्ञ या घटनांना केवळ योगायोग मानतात आणि हे केवळ रुग्णांची मानसिक प्रतिक्रिया असू शकते असे त्यांचे म्हणणे आहे. इम्युनोसप्रेसेंट औषधे जी प्रत्यारोपणानंतर घेतली जातात, त्यामुळे भूक वाढते, यामुळे भोजनाची पसंत बदलते. काही प्रकरणांमध्ये रुग्ण पूर्वीच दात्याच्या व्यक्तिमत्त्वावरून चिंतित असू शकतात, हा प्रकार त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणू शकतो. मोठ्या शस्त्रक्रियेनंतर जीवनाची नवी दृष्टी देखील या बदलांचे कारण असू शकते असे त्यांचे सांगणे आहे.