महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बोलबाला...‘जनरेशन झेड’चा !

06:16 AM Dec 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतातील युवा पिढीची संख्या ही जगातील सर्वांत मोठी असून त्यातील ‘जनरेशन झेड’ या वर्गाचा आता विलक्षण बोलबाला चाललाय...बाजारपेठेची दिशा ठरविण्यात अन् खास करून ‘ई-कॉमर्स’, ‘डिजिटल व्यवहार’ यांच्या वृद्धीत ते मोलाची भूमिका बजावताहेत...त्यामुळं विविध कंपन्यांनी आपली धोरणं आखण्यास सुरुवात केलीय ती त्यांचा विचार करूनच..

Advertisement

भारतातील विविध ‘ब्रँड्स’ची सध्या प्रचंड धावपळ चाललीय...कारण त्यांना पकडायचंय ते 37 कोटी 70 लाख इतक्या व्यक्तींचा समावेश असलेल्या ‘जनरेशन झेड’ला...हा आकडा चक्क अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक. त्यातील कित्येकांना नोकरी मिळालेली असल्यानं खर्च करण्याचं प्रमाण देखील वाढलंय. ‘जनरेशन झेड’ म्हणजे कोण ?...1997 ते 2012 या कालावधीत जन्मलेल्या व्यक्तींना ती उपाधी देण्यात आलीय. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे घरातील खर्चावर वा एखाद्या नवीन वस्तूच्या खरेदीवर वर्चस्व असतं ते त्यांचंच. सध्याचा विचार केल्यास ग्राहकांच्या एकूण खर्चाच्या 43 टक्के वा तब्बल 860 अब्ज डॉलर्सचा हिस्सा मुठीत दडलाय तो त्यांच्याच...

Advertisement

त्यातील सुमारे 200 अब्ज डॉलर्स थेट ‘जनरेशन झेड’नं कमावलेल्या पैशांतून येतात, तर अन्य 660 अब्ज डॉलर्सना दिशा दाखविण्याचं कामही त्याच व्यक्ती करतात...जरी निर्णय संपूर्ण कुटुंबाचा असला, तरी ‘जनरेशन झेड’पुढं इतरांचं शहाणपण फारसं चालत नाहीये...एका अनुमानानुसार, 2030 पर्यंत या गटातील सुमारे 36 टक्के लोकांना नोकरी मिळालेली असेल आणि त्यांच्या खिशातून बाहेर उड्या मारण्याचं काम करणार ते तब्बल 730 अब्ज डॉलर्स. त्यावेळी भारतीयांचा एकूण खर्च 1.4 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलेला असेल. या पार्श्वभूमीवर सध्या प्रत्येक ‘ब्रँड’ त्यांना डोळ्यांसमोर ठेवून डावपेच आखण्याच्या तयारीला लागलाय...

‘जनरेशन झेड’साठी खास आस्थापनं...

‘या पिढीची आवड, त्यांचं वागणं अन् त्यांच्या आकांक्षा यांनी उद्योगांना 360 अंशांत फिरविलंय असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी टिकाऊपणा आणि परवडण्याजोग्या किमतींवर भर दिलाय. ‘जनरेशन झेड’चं महत्त्व लपलंय ते त्यांच्या खरेदी करण्याच्या वृत्तीत’, एका तज्ञाचे शब्द...त्यांच्या मते, हे क्षेत्र येऊ घातलेल्या तीन ते पाच वर्षांत ‘ब्रँड्स’च्या महसुलात लक्षणीय वाटा उचलेल...‘ई-कॉमर्स’ क्षेत्रातील दिग्गज ‘अॅमेझॉन’ नि ‘फ्लिपकार्ट’ यांनीही अक्षरश: तुफानी गतीनं ‘जनरेशन झेड’चा पाठलाग सुरू केलाय. त्यांनी त्यांच्यासाठी निर्मिती केलीय ती वेगळ्या स्टोअर्सची...‘अॅमेझॉन फॅशन’नं ‘नेक्स्ट जनरेशन स्टोअर्स’ स्थापन केलेत, तर ‘फ्लिपकार्ट’नं ‘फॅशन प्लॅटफॉर्म स्पॉईल’ची तरुण ग्राहकांकरिता निर्मिती केलीय. ‘फ्लिपकार्ट’ समूहाच्या ‘मिंत्रा’नंही वेगळ्या आस्थापनाला जन्म दिलाय...

‘ई-कॉमर्स’चा मोठा आधार...

‘ई-कॉमर्स’च्या विश्वात डोकावून पाहिल्यास ‘जनरेशन झेड’ हा ‘डिजिटल’ माध्यमाचा वापर करणारा सर्वांत मोठा गट. उदाहरणार्थ ‘मिशो’च्या तीन ग्राहकांत समावेश आहे तो 25 वर्षांखालील एका व्यक्तीचा...‘अॅमेझॉन इंडिया’च्या ‘फॅशन अँड ब्युटी’ संचालिका झेबा खान यांच्या मते, त्यांच्या कंपनीला स्टोअर्सची स्थापना केल्यानंतर दर्शन घडलंय ते व्यवहार तीन पटींनी वाढल्याचं. पण भारताच्या संस्कृतीत विविध रंग भरलेले असल्यामुळं त्यांच्यासाठी ‘फॅशन ब्रँड्स’ची निर्मिती करणं म्हणजे एक फार मोठं आव्हान. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या गटाचं सर्व लक्ष असतं ते किमतींवर. शिवाय त्यांना विकत घेतलेली वस्तू मजबूत देखील हवीय...

? वेगानं विकसित होत असलेल्या डिजिटल विश्वात भारतातील ‘ई-कॉमर्स’ची वाढ अभूतपूर्व वेग पाहतेय ती ‘जनरेशन झेड’च्या वाढत्या प्रभावामुळं अन् ‘टियर-2’ नि त्यापलीकडील शहरांतील ग्राहकांच्या वाढत्या सहभागामुळं...हे बदल देशभरातील ऑनलाइन खरेदीचं भविष्य बदलू लागलेत...

? ‘जनरेशन झेड’ची महत्त्वपूर्ण भूमिका एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या अहवालात ठळकपणे दिसून आलीय. त्यानुसार भारतातील प्रत्येक तीन ऑनलाइन खरेदीदारांपैकी एक आता 25 वर्षांपेक्षा कमी वयाचा असतो.

? ही तरुण आणि तंत्रज्ञानाची जाण असणारी पिढी त्यांच्या खरेदीच्या गरजांसाठी ‘ऑनलाईन प्लॅटफॉर्म’कडे झेपावतेय. त्यामागं दडलीय ती सोय व्हावी ही इच्छा आणि तेथील उत्पादनांतील वैविध्य...

‘ब्रँड्स’हून मोठे झालेत ‘ट्रेंड्स’...

अन्य एका विश्लेषकाच्या मतानुसार, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीचा विचार केल्यास ‘जनरेशन झेड’ कुठल्याही एका गटात अडकून पडलेला नाहीये. त्यांना फॅशनपासून वाहनांपर्यंत प्रत्येक गोष्ट हवीय. ‘जनरेशन झेड’च्या जमान्यात ‘ब्रँड्स’ना फारसं महत्त्व राहिलेलं नसून त्यांची जागा घेतलीय ती ‘ट्रेंड्स’नी. त्यामुळं कंपन्यांना त्यांच्यावर सतत मोहिनी घालणं, त्यांना सातत्यानं आपल्या दिशेनं खेचणं जड जातंय...भारतातील एक वस्त्रप्रावरणांचा ब्रँड ‘नॉईज’नं ‘जनरेशन झेड’ची उत्सुकता वाढविण्यासाठी फार मोठी गुंतवणूक केलीय ती तंत्रज्ञानात...या क्षेत्रातील तज्ञ सांगतात की, ही पिढी जर एखाद्या ब्रँड त्यांच्या पसंतीतून उतरला, तर त्याला लगेच फेकून देण्यास मागंपुढं पाहत नाही. त्यामुळं प्रत्येक आस्थापनावर पाळी येतेय ती सातत्यानं सज्ज राहण्याची, नाविन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती करण्याची...

‘टायटन’च्या ‘फास्ट ट्रॅक’नं या गटातील व्यक्तींसाठी ‘फास्ट ट्रॅक फ्लीक गॅम्बिट कलेक्शन्स’ आणि ‘ब्रँड व्हीवायबी’सारख्यांची निर्मिती केलीय अन् त्यामुळं ‘टाटा समूहा’चं उत्पन्न देखील वाढलंय....या पार्श्वभूमीवर ‘जनरेशन झेड’नं तंत्रज्ञान नि जीवनशैलीच्या साहाय्यानं फार मोठा प्रभाव टाकलाय तो ‘मिलेनियल्स’ व ‘जनरेशन अल्फा’वर...सध्या ‘जनरेशन झेड’ गटातील चारपैकी एका व्यक्तीला नोकरी मिळालीय!

कुणाला काय म्हणतात ?...

? ‘जनरेशन अल्फा’ : 2013 नंतर जन्मलेल्या व्यक्ती...त्यांची संख्या 30 कोटी 40 लाख...

? ‘जनरेशन झेड’ : 1997 ते 2012 या कालावधीत जन्मलेले लोक...भारतीय लोकसंख्येतील त्यांचा आकडा 37 कोटी 70 लाख...

? ‘मिलेनियल्स’ : 1981 ते 1996 दरम्यानच्या काळात जन्मलेल्या व्यक्ती...आपल्या लोकसंख्येतील त्यांचं प्रमाण 35 कोटी 60 लाख...

? ‘जनरेशन एक्स’ : 1965 ते 1980 दरम्यान जन्मलेले नागरिक...त्यांची संख्या 24 कोटी 60 लाख...

? ‘सायलंट जनरेशन’ वा ‘बेबी बोनर्स’ : 1928 ते 1964 या कालावधीत जन्मलेले लोक...आकडा 15 कोटी 90 लाख...

‘जनरेशन झेड’ची खर्च करण्याची ताकद...

कालावधी         स्वत: केलेला खर्च                      कुटुंबावर टाकलेला प्रभाव

सद्यस्थिती          200 अब्ज डॉलर्स                       660 अब्ज डॉलर्स

2030                  730 अब्ज डॉलर्स                  630 अब्ज डॉलर्स

2035                 1800 अब्ज डॉलर्स               130 अब्ज डॉलर्स

 

भारतीय युवा जगात आघाडीवर...

? भारताची 10 ते 24 वर्षे वयोगटातील लोकसंख्या 35 कोटी 60 लाख असून ती जगातील सर्वांत मोठी तऊण लोकसंख्या असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात म्हटलंय...

? चीन 26.90 कोटी तऊणांसह दुसऱ्या क्रमांकावर...त्यानंतर इंडोनेशिया (67 दशलक्ष), अमेरिका (65 दशलक्ष), पाकिस्तान (59 दशलक्ष), नायजेरिया (57 दशलक्ष), ब्राझील (51 दशलक्ष) आणि बांगलादेश (48 दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो...

? मोठ्या प्रमाणात तऊण लोकसंख्या असलेल्या विकसनशील देशांना त्यांची अर्थव्यवस्था वाढतानाचं दर्शन घडू शकतं. मात्र त्यासाठी त्यांनी तऊण पिढीच्या शिक्षण आणि आरोग्यामध्ये मोठी गुंतवणूक करणं तसंच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणं आवश्यक असंही त्यात म्हटलंय...

? सदर अहवालानुसार, भारताची लोकसंख्या 1.44 अब्जांवर पोहोचलीय अन् पुढील 77 वर्षांत ती दुप्पट होईल असं अनुमान...लोकसंख्येच्या बाबतीत आपण अग्रक्रमांकावर पोहोचलेलो असून चीन (1.425 अब्ज) दुसऱ्या क्रमांकावर ढकलला गेलाय...2011 मध्ये झालेल्या मागील जनगणनेत भारताची लोकसंख्या नोंदविण्यात आली होती ती 1.21 अब्ज इतकी...

? अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार, भारतातील अंदाजे 24 टक्के लोकसंख्या 0 ते 14 वयोगटातील, तर 17 टक्के लोक 10 ते 19 वयोगटातील...10 ते 24 वयोगटाच्या विभागाची व्याप्ती 26 टक्के अन् 15 ते 64 वयोगटाची 68 टक्के असल्याचा अंदाज..

? भारतातील 7 टक्के लोकसंख्या 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची असून पुऊषांचं सरासरी आयुर्मान आता 71 वर्षांवर अन् महिलांचं 74 वर्षांवर पोहोचलंय...याउलट अमेरिकेमध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयाची लोकसंख्या 17 टक्के नि युरोपमध्ये 21 टक्के...

वाढता ‘वर्कफोर्स’...

? एका अंदाजानुसार 2030 पर्यंत भारतातील संपूर्ण लोकसंख्येत 1.04ं अब्ज इतक्या काम करण्याच्या वयाच्या व्यक्ती असतील. त्यामुळं आपलं ‘अवलंबित्व प्रमाण’ (डिपेंडन्सी रेश्यो) इतिहासातील सर्वांत कमी स्तरावर म्हणजे 31.2 टक्क्यांवर पोहोचेल...

? भारत हा जगातील सर्वांत मोठा मानव संसाधन पुरवठादार राहील. पुढील दशकभरात वाढीव जागतिक ‘वर्कफोर्स’पैकी सुमारे 24.3 टक्के वाटा आपण उचलू...

 

संकलन : राजू प्रभू

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article