कत्ती-पाटील गटाचे वर्चस्व
‘स्वाभिमानी’चे सर्वच उमेदवार मोठ्या फरकाने विजयी : जारकीहोळी-जोल्ले पॅनेलचा पराभव
वार्ताहर/हुक्केरी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या हुक्केरी तालुका विद्युत संघाच्या निवडणुकीसाठी रविवारी अत्यंत चुरशीने मतदान झाले. मतदानानंतर रात्री 9 वाजता सुरू झालेली मतमोजणी सोमवारी पहाटे 3 वाजेपर्यंत चालली. या निवडणुकीचा निकाल मात्र एकतर्फी झाला. चुरशीने झालेल्या या निवडणुकीत हुक्केरी तालुक्यात कत्ती-पाटील गटच किंग असल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत माजी खासदार रमेश कत्ती व माजी मंत्री ए. बी. पाटील पुरस्कृत स्वाभिमानी पॅनेलच्या सर्व 15 उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला. तर विरोधी जारकीहोळी बंधू व माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला. विजयानंतर स्वाभिमानी पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करताना फटाक्याची आतषबाजी केली. 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पॅनेलने सर्व जागा जिंकून आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले आहे.
सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रांगेत असलेल्या मतदारांचे मतदान करून घेण्यात आले. रात्री 9 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. टप्प्याटप्प्याने विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. यामुळे स्वाभिमानी पॅनेलच्या जल्लोषाला सुरुवात झाली. रात्री उशिरा महिलावर्गातील दोन्ही उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले. रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास सामान्यवर्गातील 9 उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले.
लव रमेश कत्ती-21880, कलगौडा बसनगौडा पाटील-20844, विनय अप्पयगौडा पाटील-19925, शिवनगौडा सत्याप्पा मडीवाळ-18538, महावीर वसंत निलजगी-18583, शिवानंद शिवपुत्र मुडशी-18719, लक्ष्मण बसवराज मुन्नोळी-18406, केंपन्ना सत्याप्पा वासेदार-17873, महादेव बाबू क्षिरसागर- 17393, महिला-महबूब गौसजम नाईकवाडी-19863, मंगल गुरुसिद्धाप्पा मुडलगी-19468, मागासवर्ग ‘अ’-गजानन निंगाप्पा क्वळ्ळी-20427, मागास वर्ग ‘ब’-सत्याप्पा भरमन्ना नाईक-18795, अनुसूचित जात-श्रीमंत गंगाप्पा सननाईक-20250, अनुसूचित जमात-बसवानी सनप्पा लंकेपगोळ-18262 अशी विजयी झालेल्या उमेदवारांची नावे व मते आहेत. पराभूत झालेल्या प्रत्येक उमेदवाराला 3 हजारापासून ते 7500 मते कमी पडल्यामुळे विरोधी पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. या निवडणूक निकालाने कत्ती-पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला शक्ती मिळाली आहे.