डॉक्टरचे निलंबन होणार नाही
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून स्पष्ट : आरोग्यत्र्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांना अमान्य, राज्यात दुसऱ्या दिवशीही संतापाची लाट
पणजी : गोमेकॉतील एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केलेला हंगामा शांतपणे हाताळताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सदर अधिकाऱ्याचे निलंबन करण्यास स्पष्ट नकार दिला आणि या संपूर्ण नाट्यातील हवाच काढून घेतली. आरोग्यमंत्र्यांच्या वर्तनावरून राज्यात उमटलेली संतापाची लाट काल रविवारी दुसऱ्या दिवशीही कायम होती. त्या डॉक्टरपेक्षा आरोग्यमंत्र्यांनाच मंत्रिमंडळातून निलंबित करावे हीच मागणी समाजमाध्यमावरून होत होती. महत्वाचे म्हणजे गोमेकॉतील निवासी डॉक्टरांच्या (गार्ड) या संघटनेने आरोग्यमंत्र्यांकडून जाहीर माफीची मागणी केली आहे.
त्यासाठी 48 तासांची मुदत दिली असून तसे न झाल्यास मूक ब्लॅकआऊट निषेध करण्याचा तसेच पुढे संपाचाही इशारा देण्यात आला आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी (7 जून) गोमेकॉतील एका वैद्यकीय अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचा आदेश दिला होता. त्या डॉक्टरशी बोलताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वापरलेले शब्द त्या डॉक्टरांना हीन वागणूक देणारे होते., त्यांचा अमपमान करणारे होते. त्यामुळे संपूर्ण गोव्यात असंतोष पसरला होता. काल रविवारीही हा असंतोष कमी न होता उलट आणखी वाढला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि डॉक्टरच्या विरोधात निलंबनाची कारवाई अजिबात होणार नाही, असे स्पष्ट केले.
सुरक्षारक्षकांकडून बाहेर फेकून देईन
कर्तव्यात कसूर केलेल्या सदर अधिकाऱ्याला जाब विचारण्याच्या प्रयत्नात आरोग्यमंत्र्यांनी स्वत:चा संयम गमावला आणि गोमेकॉत सर्वांसमक्ष सदर डॉक्टर अधिकाऱ्याला अक्षरश: फैलावर घेतले. तेवढ्यावरच न थांबता त्याला तात्काळ निलंबित करण्याचा आदेश काढण्यास सांगितले. त्याही पुढे जाताना सदर अधिकाऱ्याला त्याच क्षणी गोमेकॉतून घरी जाण्यास सांगितले व आपला आदेश न ऐकल्यास सुरक्षा रक्षकांकडून बाहेर फेकून देईन, असा इशाराही दिला.
विविध संघटनांकडून माफीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून राज्यात एकच खळबळ माजली. हे प्रकरण पार दिल्लीपर्यंत पोहोचले व डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अखिल भारतीय वैद्यकीय संघटना महासंघ (फेमा) या संघटनेने विश्वजित राणे यांना माफी मागण्यासाठी 72 तसांची मुदत दिली आहे. गोमेकॉतील निवासी डॉक्टरांच्या (गार्ड) या संघटनेने 42 तासांची मुदत दिली आहे. काँग्रेस गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी टीकेची झोड उठवताना आरोग्यमंत्र्यांच्याच मानसिक स्थितीची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांनीही आरोग्यमंत्र्यांवर कठोर शब्दात टीका केली होती. आरोग्यमंत्र्यांचे एकूण वर्तन पाहता गोमेकॉ ही स्वत:ची खाजगी मालमत्ता असल्यासारखे ते वागतात, असे बोरकर यांनी म्हटले होते.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपल्या एक्स हँडलवरून केलेल्या वक्तव्यात आरोग्यमंत्र्यांचे सदर वर्तन कोणत्याही प्रकारे समर्थनीय नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या वागणुकीमुळे आरोग्य सेवेतील सर्व प्रोटोकॉल नष्ट झाले आहे. त्याचबरोबर ज्या प्रकारे सदर दृष्याचे रेकॉर्डिंग करून व्हायरल करण्यात आले ते तर अत्यंत निंदनीय व सरकारी अधिकाऱ्याची बदनामी करणारे होते, असे म्हटले आहे. राज्यभरातून फेसबूक आणि अन्य माध्यमांवरून लोकांनी सरकारला फैलावर घेतले होते. अशावेळी ही संतापाची ठिणगी अधिक प्रखर होऊन रौद्ररूप धारण केल्यास ते सरकारच्या प्रतिमेस बाधक, मारक ठरू शकते याची जाणीव मुख्यमंत्र्यांसह भाजपलाही झाली व वेळीच नमते घेताना मुख्यमंत्र्यांनी सदर अधिकाऱ्याचे निलंबन होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याद्वारे एकुण प्रकरणातील हवाच काढून घेतली. त्याचाच परिणाम म्हणून की काय शनिवारी रात्रीच उशीरा स्वत: आरोग्यमंत्र्यांनीही एक्स वरून निवेदन जारी केले व आपला संयम सुटला अशी कबुली दिली. मात्र संबंधित डॉक्टरने आरोग्यसेवा नाकारल्याने आपण माफी मागणार नाही हे सांगण्यास ते विसरले नाहीत. तरीही भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
डॉक्टर निलंबित होणार नाही : मुख्यमंत्री
आरोग्यमंत्र विश्वजित राणे यांनी शनिवारी केलेल्या हंगाम्याची काल रविवारी मुख्यमंत्र्यांनी हवाच काढून घेतली. या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि ‘कोणतेही निलंबन होणार नाही’ असे स्पष्ट केले. ‘या संपूर्ण प्रकरणाचा आपण आढावा घेतला व आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर डॉ. रुद्रेश कुर्टीकर यांना निलंबित न करण्याचा निर्णय घेतला आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या एक्स हँडलवर लिहिले आहे. सरकार आणि वैद्यकीय अधिकारी गोमंतकीय जनतेला दर्जेदार सेवा देण्यास कटिबद्ध आहेत असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी, लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या डॉक्टरांची अमूल्य सेवा खरोखरच प्रशंसनीय असल्याचे नमूद केले.
राणेंना माफीसाठी ‘फेमा’नी दिलीय 72 तासांची मुदत
अखिल भारतीय वैद्यकीय संघटना महासंघ (फेमा) नेही हे प्रकरण गांभीर्याने घेताना अशाप्रकारे एखाद्या मंत्र्याकडून हीन पातळीवर जाऊन एका डॉक्टराचा झालेला अपमान सहनशिलतेच्या पलिकडे असल्याचा आरोप केला. हा प्रकार जेवढा संतापजनक तेवढाच निंदाजनकही होता. त्यासाठी सदर मंत्र्याने 72 तासांच्या आत जाहीर माफी मागावी, अन्यथा देशभरात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. फेमाने हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविले आहे.
विश्वजितना डच्चू देण्याची राज्यभरातून मागणी
गोमेकॉतील डॉक्टर अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक देण्याचा आरोग्यमंत्र्यांचा हा प्रकार शनिवारी सकाळी घडल्यांनतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. काल रविवारीही दिवसभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. जवळजवळ सर्वच विरोधक आणि सर्वसमान्य लोकही विविध प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यामांच्या माध्यमातून सरकारवर तुटून पडले आहेत. त्यातून सर्वांनीच मंत्री विश्वजित राणे यांना तात्काळ डच्चू देण्याची एकमुखी मागणी लावून धरली आहे.
आरोग्यमंत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या मानसिक स्थितीची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात यावी.
अमित पाटकर, अध्यक्ष, गोवा प्रदेश काँग्रेस
आरोग्यमंत्र्यांचे असभ्य वर्तन अत्यंत निंदनीय. गोमेकॉ ही स्वत:ची खासगी मालमत्ता असल्यासारखे वागतात आरोग्यमंत्री.
विरेश बोरकर, आमदार, आरजीपी.
निंदनीय तसेच डॉक्टरांची बदनामी करणारा आरोग्यमंत्र्यांनी केलेला लज्जास्पद प्रकार कदापी समर्थनीय नाही.
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते..
ही प्रवृत्ती खपवून घेणार नाही : गार्ड,आरोग्यमंत्र्यांनी माफी मागावी,मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी,अन्यथा निषेध, मोर्चा, संपही
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका डॉक्टरला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा गोवा असोसिएशन ऑफ रेझीडेंट डॉक्टर्स (गार्ड) या संघटनेने निषेध नोंदवला असून राणे यांनी सदर प्रकरणी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकणाची चौकशी करावी, अपमानास्पद बोलण्याची प्रवृत्ती खपवून घेणार नाही, असेही ‘गार्ड’ ने म्हटले आहे. या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी सरकारने घ्यावी, सरकारी इस्पितळात व्हिडीओग्राफीला बंदी घालावी अशा इतर मागण्याही ‘गार्ड’ तर्फे करण्यात आल्या आहेत. वरील सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास संपाचा इशाराही गार्ड ने दिला आहे. डॉक्टरांची बाजू व म्हणणे एwकून न घेता तोंडी निलंबनाची भाषा करणे तसेच गलिच्छ शब्दात डॉक्टराची मानहानी करणे राणे यांना शोभणारे नाही. डॉक्टर्स हे ऊग्णांच्या सेवेसाठी सातत्याने झटत असतात. अहोरात्र काम करतात त्यांना आरोग्यमंत्र्यांनी अशी वागणूक देणे चुकीचे आहे. असे ‘गार्ड’ ने प्रसिद्धी पत्रकातून नमूद केले आहे. इतर डॉक्टर्स-ऊग्णांसमोर डॉक्टरांचा अनादर करणे आणि त्यांना मान खाली घालण्यास लावणे हा मोठा अन्याय असून तो यापुढे खपवून घेतला जाणार नाही. डॉक्टरांचा आदर, प्रतिष्ठा राखणे सर्वांचीच जबाबदारी असून या प्रकरणाचा डॉक्टरांतर्फे काळ्या रिबीनी बांधून निषेध करण्यात येणार असल्याचे ‘गार्ड’ ने म्हटले आहे. ‘गार्ड’ ही डॉक्टर्सची संघटना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात कार्यरत असून प्रकाशित केलेल्या पत्रकावर अध्यक्ष डॉ. आयुष शर्मा, सरचिटणीस डॉ. विराज देसाई, उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, डॉ. समीधा फडते, डॉ. सिद्धी आमोणकर, डॉ. वेदांत कुंदे, डॉ. लक्ष्मी निकम यांच्या सह्या आहेत.