धिंगाणा डीजेचा...मौन सज्जनांचे, हाल सर्वसामान्यांचे!
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
तुम्ही बालरुग्ण असा... आजाराने हॉस्पिटलमध्ये असा... वृद्ध असा... किंवा गर्भवती असा... तुमची काळजी घेण्याचा ठेका आम्ही घेतला नाही. आम्हाला तुमच्या जीवाची पर्वा नाही. आम्हाला नाचायचे आहे... आम्ही डीजे लावणार आणि शहर वेठीला धरणार. आम्हाला विचारतो कोण? कुठल्याही नियमांना आम्ही बांधील नाही. ‘आम्ही कोण म्हणून काय पुसता?’
ही विचारधारा समाजाला नेमकी कोठे नेणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सण, परंपरा, उत्सव यांना विशेष स्थान आहे. उत्सवांचा हेतूच मुळात लोकांनी एकत्र यावे, यानिमित्ताने समाजात स्नेहभाव वाढावा, सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, हा आहे. परंतु अलिकडे या हेतूला मूठमाती मिळालेली आहे. डीजेच्या नावाने चालणारा धिंगाणा आता सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. परंतु विवेकच गमावून बसल्याने सामान्यांनी हात टेकले आहेत.
इथे आमचा किंवा तुमचा उत्सव हा मुळात प्रश्नच नाही. तर कोणत्याही उत्सवाच्या निमित्ताने लोकांना, वृद्धांना, रुग्णांना होणारा त्रास आणि यानिमित्ताने वेठीस धरलेले शहर याबाबत प्रशासन कधीतरी गांभीर्याने विचार करणार आहे की नाही, हा प्रश्न आहे. दरवेळी गणेशोत्सव किंवा शिवजयंती आली की, प्रशासनाला आपली कर्तव्यतत्परता दाखविण्याचा पुळका येते आणि वेळेची मर्यादा, ध्वनीची मर्यादा घालून देण्यात येते. उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात येतो. प्र्रशासनाची ही भूमिका रास्त आहे. परंतु ती सर्वांसाठी समान नाही. हे मूळ दुखणे आहे.
उत्सव साजरा करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. परंतु उत्सव उन्मादाकडे वळतो, तेव्हा मात्र त्याकडे लक्ष वेधणे भाग आहे. हॉस्पिटल्स, लहान मुलांचे हॉस्पिटल, वृद्धाश्रम, मॅटर्निटी होम या परिसरातून मिरवणुका जाताना आवाजाची मर्यादा पाळावी हा कायदा आहे. परंतु कायद्याचे रक्षकच त्याकडे हेतूत: कानाडोळा करतात. तेव्हा न्याय मागायचा कोणाकडे, हा प्रश्न पडतो.
राज्योत्सवाच्या निमित्ताने 1 नोव्हेंबर रोजी सकाळपासून शहराला वेठीस धरण्यात आले. ठिकठिकाणी बॅरिकेड्स घालून मार्ग रोखण्यात आले. ही बाब आता बेळगावकरांना नवीन नाही. मात्र दिवसभर डीजेचा जो धुमाकूळ सुरू होता, त्याने मात्र सर्वसामान्य नागरिक वैतागले. डीजेची ध्वनी मर्यादा ठराविक ठिकाणी कमी केलीच पाहिजे, या नियमाला तर हरताळच फासला गेला. अनेक वृद्ध नागरिकांनी पोलीस प्रशासनाला आणि पत्रकारांना फोन करून आवाज कमी व्हावा, अशी विनंती केली.
काही जणांनी आवाज सहन न झाल्याने त्यांचा रक्तदाब वाढला. काही जणांना असह्या डोकेदुखी होऊन उलट्या सुरू झाल्या. काही इमारतीच्या भिंती हादरल्या. काही जणांच्या कानाला दडे बसले. एखाद्याच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नसताना अनेकांच्या आरोग्याशी रविवारी खेळ झाला. याची जबाबदारी जिल्हाधिकारी, प्रशासन, सरकार की आयोजक, कोण घेणार आहे? दुर्दैवाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे या शहराला कोणी वाली आहे की नाही, हाही प्रश्न आहे.
सामंजस्य भूमिका घेण्याची गरज
कोणत्याच उत्सवामुळे इतरांना त्रास होऊ नये ही समंजस भूमिका घेण्याची गरज आहे. परंतु सामंजस्य, सलोखा हे शब्दच आपण बासनात गुंडाळून ठेवले आहेत. प्रत्येकवेळी आम्हाला का सांगता, त्यांना सांगा, आम्हाला सांगणारे तुम्ही कोण? ही भूमिका घेणाऱ्यांसमोर जो तो हतबुद्ध झाला आहे. प्रशासन आणि पोलीस यांना कायद्यानेच काही हक्क दिले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा अधिकार त्यांच्याकडे निश्चितच आहे. तथापि, नेहमीच ‘आपला तो बाब्या...’ ही त्यांची भूमिका नियम मोडणाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. उत्सव कोणाचाही असो तो आनंदाने आणि शांततेने साजरा व्हायला हवा. मात्र जेव्हा तो उन्मादाकडे वळतो तेव्हा आवाज उठवणे भाग आहे. ते पोलीस किंवा प्रशासन असो अथवा सर्वसामान्य नागरिक असो. सज्जनांचे मौन अधिक घातक असते. असे म्हटले जाते, दुर्दैवाने बेळगाव शहराला सहनशीलता आणि मौन मिरवण्यातच अधिक धन्यता वाटत असल्यास कोण काय करणार?