आपल्या शरीरात असलेल्या ईश्वरी अंशाला आत्मा असे म्हणतात
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, हे सारे विश्व अविनाशी तत्वाने व्यापले आहे आणि त्याचा नाश कुणीही करू शकत नाही. त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात व जातात पण आत्मतत्व शाश्वत व सर्वव्यापी असून जन्ममरणरहित आहे. त्याचा नाश करू म्हणलास तरी होत नाही.
देह जरी नाशवंत असला तरी त्यात असलेले आत्मतत्व किंवा आत्मा अमर असतो. त्या आत्म्यासाठी अर्जुना तू लढ ह्या अर्थाचा
विनाशी देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत । नित्य नि:
स्सीम तो आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव ।। 18।।
हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार आत्म्याच्या उद्धारासाठी स्वधर्म पालन करणे महत्त्वाचे असते. म्हणून भगवंत म्हणाले, अर्जुना विनाशी देहासाठी न लढता तुझ्या आत्म्याच्या उद्धारासाठी तू लढ. श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंत पुढे म्हणाले, देहासकट समोर दिसणाऱ्या सर्व वस्तुत चैतन्य म्हणजे ईश्वरी अस्तित्व गुप्तरूपाने वास करत असते. हे मूळ ब्रह्माचा अंश असते. ह्या ब्रह्मामुळे ह्या तिन्ही लोकांचा विस्तार झालेला आहे. मग हे ब्रह्म डोळ्यांनी दाखवा तरी असे कुणी म्हणाले तर ते मात्र शक्य नाही कारण त्याला नाम, वर्ण, आकार अशी काही चिन्हे किंवा लक्षणे नसल्याने ते सामान्य दृष्टीला दिसू शकत नाही. ब्रह्म हे शाश्वत व सर्वव्यापी असून जन्ममरणरहित आहे त्याचा केव्हाही घात होत नाही. पुढील श्लोकात भगवंत आत्म्याचे वैशिष्ट्या सांगत आहेत. ते म्हणाले, काही लोक आत्म्याला मारणारा आहे असे समजतात तर दुसरे तो मरतो असे मानतात, ह्या दोन्ही प्रकारच्या लोकांना खरे कळत नाही कारण हा कोणाला मारत नाही किंवा कोणाकडून मारला जात नाही.
जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो म्हणे । दोघे न जाणती काही न मारी न मरे चि हा ।।19 ।।
आपल्या शरीरात असलेल्या ईश्वरी अंशाला आत्मा असे म्हणतात. काही लोक आत्मा मरतो असे म्हणतात तर काही तो मर्त्य आहे असे समजतात पण दोघेही अज्ञानी आहेत कारण आत्मा कुणाला मारतही नाही किंवा स्वत:ही मरत नाही. श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, आत्मा अमर आहे हा धागा पकडून भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, समोर दिसणाऱ्या तुझ्या नातेवाईकांच्या हातून अन्यायी वर्तणूक झाली असल्याने नीतीशास्त्रानुसार त्यांच्या देहाला शासन करणे हे तुझे क्षत्रिय म्हणून कर्तव्य आहे म्हणून तू युद्ध कर. त्यांचे देह नाश पावले तरी त्यांच्या आत्म्याला काहीही होत नाही. असे असताना अज्ञानामुळे मी मारणारा व हे कौरव मरणारे आहेत असे म्हणत आहेस. अर्जुना तुला खरे तत्व समजलेलेच नाही. आपण पहात असलेले स्वप्न आपण झोपेत आहोत तोपर्यंतच खरे वाटते मग जागे होऊन पहावे तर काहीच नसते. त्याप्रमाणे आपले जीवन हे मायेने दाखवलेले दीर्घकाळ चालणारे स्वप्न आहे. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी खऱ्या नसतात. म्हणून जीवनात घडणाऱ्या गोष्टींचा शहनिशा करून मगच नितिशस्त्रानुसार योग्य तो निर्णय घ्यावा.
पुढील श्लोकात आत्म्याविषयी अधिक सांगताना भगवंत म्हणाले, हा आत्मा कधी जन्म पावत नाही अथवा कधी मरत नाही. हा एकदा उत्पन्न होऊन पुन: नाश होणारा आहे, असेही नाही. हा जन्मरहित, नित्य, क्षयरहित व अनादि आहे. शरीराचा नाश झाला तरी ह्याचा नाश होत नाही.
न जन्म पावे न कदापि मृत्यु । होऊनी मागे न पुढे न होय ? आला न गेला स्थिर हा पुराण । मारोत देहास परी मरे ना ।। 20 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ज्याप्रमाणे स्वप्नात जे काही दिसते. त्यापैकी जागे झाल्यावर काहीच दिसत नाही. ही केवळ माया आहे असे समज. तू व्यर्थ भ्रमात पडला आहेस.
क्रमश: