For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भीषण अपघातानं जिल्हा हळहळला

03:00 PM Mar 10, 2025 IST | Pooja Marathe
भीषण अपघातानं जिल्हा हळहळला
Advertisement

चार अपघातात चार ठार, पाच जखमी

Advertisement

सातारा

रविवारचा सुट्टीचा दिवस, त्यातच चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम लढत भारत-न्यूझिलंडमध्ये असल्यामुळे आज जिल्ह्यात सर्वत्र वेगळाच माहोल होता. परंतु याच आनंदावर विरजण ठरणाऱ्या अपघाताच्या एकामागून एक घटना कानावर आल्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला. रविवारी दिवसभरात चार ठिकाणी भीषण अपघतात झाले. या अपघातात माजी सैनिकासह चौघांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Advertisement

याबाबत सविस्तर माहिती अशी, सातारा शहरात दुपारनंतर क्रिकेट मॅचमुळे वाहतूक मंदावली होती. परंतु एक इनिंग झाल्यानंतर मधल्या वेळेत थोडी वाहतूक वाढली होती. याचवेळी सिव्हील हॉस्पिटलच्या समोर असणाऱ्या मोरे टी स्टॉलचा मालक माजी सैनिक शिवाजी राजाराम मोरे (वय ४२ मूळ रा. राकुसलेवाडी, आसनगाव, ता. सातारा) हा दुचाकीवरुन ओव्हरटेक करत असताना दुसऱ्या दुचाकीला धक्का लागत शेजारुन जाणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पाचवडनजिक झालेल्या अपघातात रमजान ईदच्या खरेदीसाठी पुण्याकडे जाणाऱ्या शेख-मोमीन कुटुंबावर काळाने घाला घातला. महामार्गावर बंद असलेल्या ट्रकला पाठीमागून इनोव्हा कारची जोरदार धडक बसली. यामध्ये नहिदा समीर शेख (तेलीखड्डा, सातारा) व सांगली येथील सलमा इरफान शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह त्यांच्याच कुटुंबातील तिघे जखमी झाले आहेत.

महामार्गावर शेंद्रेनजिक समोरुन आलेल्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये तामकणे (ता. पाटण) येथील दिगंबर मनोज शिंदे (वय २२) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या दुचाकीवर मागे बसलेल्या योगिता (दुर्गा) काशिनाथ जाधव (वय १७ रा. कोडोली, ता. सातारा) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर साताऱ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

तसेच वर्धनगड घाटामध्ये महाकाय क्रेन सुमारे दोनशे फूट खाली कोसळली. यामध्ये क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी झाला आहे. येथील रामोशीवाडीच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित क्रेन ऑपरेटरला दरीतून बाहेर काढत उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
या चारही अपघाताच्या घटनांची नोंद संबंधित पोलीस स्टेशनला झाली आहे.

Advertisement
Tags :

.