जिल्ह्यात अतिवृष्टी, राधानगरीचे ४ दरवाजे खुले; पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पंचगंगेची पाणीपातळी 23 फुटांवर; 20 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर, राधानगरी प्रतिनिधी
पंधरा दिवसांच्या ब्रेकनंतर जिह्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. रविवारी सकाळपासून धरणक्षेत्रासह जिह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून त्यामधून 7 हजार 212 क्युसेक विसर्ग सुरु झाला आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगेची पाणीपातळी 23 फुटांवर पोहोचली. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे रविवारी रात्रीपर्यंत 20 बंधारे पाण्याखाली गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिह्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने रविवारी सकाळी 6 वाजता सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला. त्यानंतर सकाळी 9 वाजून 13 मिनिटांपासून ते सव्वाअकरा वाजेपर्यत 3 दरवाजे खुले होऊन 5712 क्युसेक व जलविद्युत केंद्रामधून 1500 क्युसेक असा एकूण 7212 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला. पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. सध्या भोगावती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा दिला आहे. सर्फनाला वगळता अन्य 14 धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
यावर्षी 25 जुलै रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाचे पाच दरवाजे खुले झाले होते. तसेच 8 ऑगस्ट रोजी सर्व दरवाजे बंद झाले होते. पुन्हा एकदा 17 दिवसांनी धरणाचे चार दरवाजे खुले झाले आहेत. सध्या धरणाची पाणी पातळी 347.38 फूट इतकी असून पाणीसाठा 8338.93 इतका आहे. या धरणक्षेत्रात रविवारी दिवसभरात 59 मि. मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून ते आतापर्यंत 4 हजार 683 मिमी पाऊस झाला आहे.
20 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे व कासारी नदीवरील यवलूज, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, खडक कोगे, सरकारी कोगे, तर दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे एकूण 20 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अलमट्टी धरणातून 42 हजार क्युसेक व हिप्परगीतून 22 हजार 251 पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
गेल्या चोवीस तासात 30.6 मिमी पाऊस
जिह्यात गेल्या 24 तासांत एकूण 30.6 मि.मी. तर गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 58.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हातकणंगले तालुक्यात 21.4 मिमी, शिरोळ 13.1, पन्हाळा 29.3, शाहूवाडी 33.9, राधानगरी 42.6, गगनबावडा 58.4, करवीर 27.1, कागल 28.6, गडहिंग्लज 21.4, भुदरगड 37.3, आजरा 53.3, चंदगड 39.7 मि. मी. पाऊस झाला आहे.