For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामचुकार कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप

11:06 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
कामचुकार कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप
Advertisement

कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कार्यालयाच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वारे बंद : कर्मचाऱ्यांना सावध रहावे लागणार

Advertisement

बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांचा विनाकारण होणारा गोंधळ थांबविण्याबरोबरच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कार्यालयाच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वारे बंद केली आहेत. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांतून प्रवेशद्वार बंद झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांनिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय नेहमीच नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेले असते. मोर्चे, निवेदने घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांना पोलीस शेड समोरूनच प्रवेश करावा लागतो. असे असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दक्षिण भागातून दोन प्रवेशद्वारे आहेत. यामुळे अनेकवेळा पोलीस बंदोबस्त असला तरी आंदोलकांनी दक्षिण प्रवेशद्वारातून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करून आंदोलन केले होते. यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. सध्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणीच पोलीस बंदोबस्त आहे. दक्षिण प्रवेशद्वार मोकळेच असते. त्यामुळे कार्यालयाच्या सुरक्षेबरोबरच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी दक्षिणेकडील दोन्ही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत.

चहाची टपरीही हटविली

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचारी कामचुकारपणा करत वारंवार चहा पिण्यासाठी, तसेच इतर कामांचे कारण सांगून कार्यालयाच्या दक्षिणद्वारातून बाहेर जात होते. त्यामुळे याचा परिणाम कार्यालयीन कामांवरही होत होता. नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत होते. यासाठीच सदर प्रवेशद्वारे बंद करून कार्यालयाशेजारी असणारी चहा टपरीही हटविण्यात आली आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना मुख्य प्रवेशद्वाराकडूनच ये-जा करावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कोणता कर्मचारी किती वेळ बाहेर गेला हे कैद होणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना सावध रहावे लागणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दक्षिणेकडील दोन्ही प्रवेशद्वारे बंद

कार्यालयाला अनेक प्रवेशद्वारे असल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी दक्षिणेकडील दोन्ही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत.

- जिल्हाधिकारी नितेश पाटील

Advertisement
Tags :

.