जिल्ह्यात 3.3 लाख हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट
यंदा कृषी खात्याकडून रब्बी हंगामासाठी उपाययोजना : उत्कृष्ट दर्जाची बियाणे वितरणासाठी पथके
बेळगाव : शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी करून पिके घेतली होती. मात्र मुसळधार पाऊस व महापुरामुळे हातातोंडाची आलेली पिके वाया गेली. यानंतरही न डगमगता शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या घेतल्या होत्या. पण पुन्हा मुसळधार पाऊस व नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने दुबार पेरण्याही वाया जाऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले. यामुळे निराश होते. आता शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. यंदा जिल्ह्यात कृषी खात्याने 3.3 लाख हेक्टरमध्ये पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कृषी खात्याने खराब बियाणांचे वितरण रोखण्यासाठी व गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी तालुका पातळीवर तपासणी पथके स्थापन केली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्येही उत्साह वाढला असून , चांगल्या पाऊस झाल्यास रब्बी हंगामातील पेरणीचे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार आहे. तसेच कृषी खात्याकडून यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांना आवश्यक असणारे साहित्य कृषी खात्यामार्फत पुरविण्यात येणार आहे.
यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात 3 लाख 30 हजार हेक्टरमध्ये पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गहू, मका, हरबरा, सूर्यफूल, ज्वारी आदी विविध पिकांच्या पेरणी करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 29 हजार 450 क्विंटल बियाणे तर 1 लाख 79 हजार 465 मेट्रिक टन खतांचा साठा संग्रहित करण्याच्या प्रक्रियेत कृषी खाते गुंतले आहे. यामुळे हिवाळी पेरणीसाठी कृषी खात्याकडून वेगाने पावले उचलण्यात येत आहेत.
शेतकरीही पेरणीच्या कामासाठी सज्ज
शेतकरीही पेरणीच्या कामासाठी सज्ज झाले असून, मशागतीची कामे आटोपण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे आतापासूनच बियांची मागणी केली जात आहे. गहू, हरबरा, सूर्यफूल, मका, ज्वारी आदी बियाणांना वाढती मागणी आहे. काही ठिकाणी अद्याप उडीद व सोयाबिनची कापणी झालेली नाही. यामुळे या ठिकाणी पेरण्यांना विलंब होण्याची शक्यता आहे. कापणी झाल्यानंतर शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीच्या कामाला लागणार असल्याचे समजते.
खरिप हंगामातील शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला
खरिप हंगामात शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागल्याचे पाहावयास मिळाले. एकीकडे मुसळधार पाऊस व महापुराचे पाणी शेतात आल्याने पिके धोक्यात आली. दुसरीकडे पाण्यामुळे नष्ट होणाऱ्या पिकांना युरियाची गरज होती तेव्हा राज्यात युरियाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता. याचा परिणाम पिकांवर झाल्यामुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागला होता. यामुळे शेतकरी एकप्रकारे हतबल व निराश झाले होते.
उत्कृष्ट बियाणे खते पुरविणार
मात्र रब्बी हंगामात सर्व खतांचा साठा ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेषकरून युरियाचा मुबलक साठा ठेवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. मात्र कृषी खात्याकडून बियाणांसह खतांचा योग्य प्रमाणात साठा ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची बियाणे व मुबलक खते पुरविण्यासाठी पावले उचलली जात आहेत. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना तेंड द्यावे लागणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे.
रब्बी हंगामात 3 लाख 30 हजार हेक्टरमध्ये पेरणीचे उद्दिष्ट ठेले आहे. निकृष्ट बियाणांचे वितरण रोखण्यासाठी सर्व तालुक्यांमधील खत व बियाणे वितरण दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. मान्यताप्राप्त बियाणांचे वितरण करण्यापूर्वी दुकानदारांनी शेतकऱ्यांची चर्चा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची बियाणे मिळण्यास अडचणी येणार नसून शेतकऱ्यांनाही सोयीचे होणार आहे, असे कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी सांगितले.