For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिरेहट्टीहोळी येथील रस्त्याचा वाद संपुष्टात

10:31 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिरेहट्टीहोळी येथील रस्त्याचा वाद संपुष्टात
Advertisement

ग्रामस्थांचे धरणे आंदोलन मागे : गावात सलोखा राखण्याचे माजी आमदार अंजली निंबाळकर यांचे आवाहन

Advertisement

खानापूर : हिरेहट्टीहोळी येथील जैन मंदिरात जाणाऱ्या रस्त्यावरुन गेले काही दिवस वाद सुरू होता. रस्ता करून देण्याबाबत गेल्या चार दिवसांपासून हिरेहट्टीहोळी पंचायतीसमोर काही ग्रामस्थ आणि पंचायत सदस्य धरणे आंदोलनाला बसले हेते. याची माहिती माजी आमदार अंजली निंबाळकर यांना मिळताच त्यांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधून वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले होते.

यानुसार तहसीलदारांसह सर्व अधिकाऱ्यांनी हिरेहट्टीहोळीला भेट देवून ग्रामस्थ आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून वादावर तोडगा काढण्यात यश आले आहे. याबाबत माहिती अशी की, हिरेहट्टीहोळी येथे जैन मंदिराला जाण्यासाठी रस्ता नव्हता. याबाबत ग्रामस्थांनी पंचायतीकडे रस्ता करून देण्यासंदर्भात निवेदने दिली होती. मात्र हा रस्ता मालकीअंतर्गत असल्याने रस्ता काढण्यात ग्रा. पं. ला अडचणी निर्माण झाल्या होत्या.

Advertisement

रस्ता होत नसल्याचे पाहून ग्रामस्थ आणि काही ग्रा. पं. सदस्यांनी गेल्या चार दिवसांपासून हिरेहट्टीहोळी ग्रा. पं. समोर धरणे आंदोलन सुरू केले होते. याबाबत कोणीही हस्तक्षेप करण्यास तयार नसल्याने वाद चिघळला होता. याची माहिती माजी आमदार अंजली निंबाळकर यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून याबाबत हिरेहट्टीहोळी येथे जावून या वादावर तोडगा काढण्याची सूचना केली होती.

यानुसार बुधवारी तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक एम.गिरीश, ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी विलास राज यांनी प्रत्यक्ष भेट देवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यानंतर मंदिराला जाण्यासाठी रस्त्याबाबत जागा मालक शरनिक जीनगौंड आणि अनिल मुतगी यांच्याशी चर्चा करून मंदिराला जाण्यासाठी रस्ता देण्याचे कबूल केले. यावेळी ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांनी अॅक्शन प्लॅन मंजूर करून या रस्त्यासाठी निधी देण्यात येईल, तोपर्यंत जेसीबीने रस्ता करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते सुरेश जाधव, ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी, तोईद चांदकन्नावर,  ग्रा. पं. अध्यक्ष श्रीधर लवगी, संगाम्मा वाली, अशोक अंगडी यासह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.