For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरजी-बोरकर यांच्यातील वाद वाढला

03:09 PM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
आरजी बोरकर यांच्यातील वाद वाढला
Advertisement

बैठकीला गैरहजर : गोव्याबाहेर असल्याचे दिले कारण

Advertisement

पणजी : मतभेद व वाद संपुष्टात आणण्यासाठी रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) या पक्षाचे अध्यक्ष मनोज परब आणि इतर पदाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीस हजर राहून चर्चा करण्यास आमदार विरेश बोरकर यांनी नकार दर्शवून त्यांचे आवाहन फेटाळून लावले. त्यामुळे पक्ष व बोरकर यांच्यातील वाद मिटण्याऐवजी आणखी चिघळला असल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या पणजी येथील मुख्य कार्यालयात काल सोमवारी केंद्रीय समितीची बैठक बोलावली होती. दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत हजर राहण्याचे निमंत्रण बोरकर यांना देण्यात आले होते. परंतु आपण गोव्याबाहेर असल्याचे कारण सांगून बोरकर यांनी पक्षाच्या बैठकीस जाण्याचे टाळले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बोरकर यांनी समोर येऊन म्हणणे मांडावे

Advertisement

केंद्रीय समितीच्या म्हणण्यानुसार आमदार बोरकर यांनी बैठकीस हजर राहणार नसल्याचे कळवले नाही. त्यांच्यासोबतचा वाद कायमचा मिटावा म्हणून प्रयत्न चालू आहेत. बोरकर यांनी समोर येऊन आपले म्हणणे मांडावे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यास पक्ष तयार आहे तथापि ते येत नाहीत, बोलत नाहीत मग प्रश्न कसा सुटणार? असे पक्षीय सूत्रांनी सांगितले.

गोव्याचे हित जपण्यासाठी राजकारणात

आमदार विरेश बोरकर यांनी समाज माध्यमातून आपली काही मते मांडली आहेत. त्यात ते म्हणतात की, सत्तेसाठी राजकारणात आलो नाही, तर गोव्याचे हित जपण्यासाठी धडपडतोय. गोव्याच्या रक्षणासाठी लढा देताना जर शत्रू तयार झाले तर त्यांचे स्वागत असून त्यांना स्वीकारतो. तथापि राजकारण व घड्याळ यांची वेळ एकच असत नाही तर ती वेगवेगळी असते, असे त्यांनी म्हटले आहे.

योग्य दिवस ठरवून बैठक घेणे उचित

गोव्याबाहेरील काही महत्त्वाच्या कामांसाठी आधीच नियोजन होते, म्हणून बैठकीला येऊ शकलो नाही. बैठकीला गैरहजर म्हणजे दुरावा नाही. पक्षासाठी आदर, बांधिलकी, जबाबदारी कायम असून परस्पर सहमतीने योग्य दिवस, वेळ ठरवून बैठक घेणे उचित ठरले असते. याबाबत लवकरच योग्य समन्वय साधणार असल्याचे बोरकर यांनी नमूद केले.

आपल्यावर विनाकारण आरोप

आरजीच्या बैठकीस जाणार नसल्याचे आमदार बोरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. आपल्यावर विनाकारण आरोप होत असून त्यामुळे दुखावलो आहे. माझाच पक्ष, माझेच पदाधिकारी म्हणजे माझीच माणसे अशा प्रकारे आरोप करतील, असे वाटले नव्हते, असे मत बोरकर यांनी मांडले.

-आमदार विरेश बोरकर

Advertisement
Tags :

.