For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिष्याने घातला गुरुलाच गंडा!

06:55 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिष्याने घातला गुरुलाच गंडा
Advertisement

बीएसएफ कॉन्स्टेबलकडून अधिकाऱ्याची 40 लाखांची लुबाडणूक, रक्कम दुपटीचे आमिष

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

बीएसएफमधून निवृत्त झालेल्या बेळगाव येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्यांच्याच हाताखाली काम केलेल्या कॉन्स्टेबलने सुमारे 40 लाख रुपयांना गंडा घातला आहे. यासंबंधी कॅम्प पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

या घटनेने एकच खळबळ माजली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची रक्कम दुप्पट करून देण्याचे सांगून कॉन्स्टेबलने आपल्या खात्यात जमा करून घेऊन फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. यासंबंधी भाग्यनगर येथील अशोक पाटील या निवृत्त अधिकाऱ्यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अनिलकुमार जयकरण सिंग, रा. उत्तरप्रदेश याच्यावर भादंवि 406, 420 कलमान्वये एफआयआर दाखल केला आहे. अनिलकुमार हा बीएसएफमधील कॉन्स्टेबल असून फसवणुकीच्या प्रकारानंतर त्याने आपले फोन बंद ठेवले आहेत. कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला पुढील तपास करीत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक पाटील हे बीएसएफमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनिलकुमार या शिपायाने त्यांचा विश्वास संपादन करून ‘तुमच्याजवळील रक्कम माझ्याकडे द्या. वेगवेगळ्या मार्गाने ती दुप्पट करून देतो’, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून थोडी रक्कमही त्याला देण्यात आली.

निवृत्तीनंतर आलेली सर्व रक्कम अनिलकुमारच्या खात्यात जमा करण्यात आले. मोठी रक्कम आपल्या खात्यात जमा होताच अनिलकुमारने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क तोडला आहे. खानापूर रोडवरील एसबीआयच्या खात्यातून आर्थिक व्यवहार झाल्याने कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.