महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेती विकासातूनच आत्मनिर्भरतेची दिशा मिळणार!

11:27 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : निपाणीत डॉ. प्रभाकर कोरे यांचा गौरव सोहळा : व्हीएसएम एमसीए एमबीए नूतन इमारतीचे उद्घाटन 

Advertisement

वार्ताहर/निपाणी

Advertisement

आपला भारत देश पारंपरिक पद्धतीने शेती करत आला आहे. पण सध्या परिस्थिती पाहता शेतीमध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. नवे बदल शेतकऱ्यांनी स्वीकारायला हवेत. पारंपरिक शेती व्यवसायामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. असे असले तरी उत्पन्न मात्र कमी मिळत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्याचा आहे, असा समज निर्माण झाला आहे. शेती उत्पादनांच्या किमती कमी होत आहेत. तर उत्पादित माल मात्र महागाने विकला जात आहे. निर्माण झालेली ही परिस्थिती बदलली पाहिजे. आपला भारत देश विश्वगुऊ होण्यासाठी प्रयत्न करत आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठीही आशा वाढल्या आहेत. त्यासाठी आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. दूरदृष्टी वाढवली पाहिजे, शेती हे व्हिजन म्हणून केली पाहिजे. शेती विकासातूनच खऱ्या अर्थाने देशाला आत्मनिर्भर होण्याची दिशा मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

निपाणी येथील विद्या संवर्धक मंडळाच्या श्रीपेवाडी रोडवरील सोमशेखर आर. कोठीवाले अभियांत्रिकी महाविद्यालय याठिकाणी डॉ. प्रभाकर कोरे यांचा नागरी गौरव सोहळा व एमबीए-एमसीए महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते आयोजित समारंभात बोलत होते.

प्रारंभी स्वागत सहकाररत्न चंद्रकांत कोठीवाले यांनी केले तर प्रास्ताविक माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, कोणत्याही गावाचा किंवा शहराचा विकास होण्यासाठी तेथील आर्थिक स्थिती भक्कम असणे गरजेचे आहे. घर, वीज, पाणी, रोजगार अशा सर्व सुविधा उपलब्ध असायला हवे. बेळगाव व कोल्हापूर जिह्यात ऊस उत्पादन वाढल्याने शेतकरी समृद्ध होताना दिसत आहे. शेती विकासाला आवश्यक संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. सद्यपरिस्थितीत विकास स्तरांमध्ये उत्पादन क्षेत्राचा 22 ते 24 टक्के तर सेवा क्षेत्राचा 52 ते 54 टक्के वाटा आहे. पण शेती हा प्रमुख व्यवसाय असून देखील त्याचा वाटा मात्र फक्त 12 ते 14 टक्के आहे. हा टक्का वाढण्यासाठी शेती विकास साधण्याची गरज ख्रया अर्थाने निर्माण झाले. यापूर्वीच्या काळात देशात 90 टक्के लोक ग्रामीण भागात राहत होते. पण निर्माण होणाऱ्या समस्या व सुविधांचा अभाव यामुळे अधिक तर लोक शहरात गेले. यामुळे आता ग्रामीण भागात फक्त 65 टक्के लोक राहत आहेत. 30 ते 35 टक्के लोक मोठे शहरात का गेले? याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. यातूनच खऱ्या अर्थाने विकासाची ध्येय धोरणे सहजपणे ठरवता येऊ शकतात.

चंद्रकांत कोठीवाले यांच्या नेतृत्वातून चालवण्यात येणारी व्हीएसएम संस्था व डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वातून चालवली जाणारी केली संस्था शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करत आहेत. शिक्षण ही समाज समृद्ध होण्याची सर्वात मोठी ताकद आहे. भविष्य बदलायचे असेल तर शिक्षण फार महत्त्वाचे आहे. केएलई संस्थेत एमबीबीएस करण्यासाठी परदेशातून विद्यार्थी येतात, ही अभिमानाची बाब आहे. अशा परिस्थितीत देखील रशिया-युक्रेनसारख्या देशात आपल्या देशातील अनेक विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी जातात. शिक्षणातूनच परिवार आणि गावाची स्थिती बदलते. आर्थिक प्रगतीमध्ये शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातूनच व्यक्तिमत्व घडताना कर्तृत्व आणि नेतृत्व घडते. आपल्या देशातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी कौशल्यशक्ती आहे, म्हणूनच परदेशात अधिक तर इंजिनियर हे भारतीय आहेत अमेरिकेसारख्या देशात 10 पैकी 6 डॉक्टर हे भारताचे आहेत. संपूर्ण जगात सर्वाधिक टॅलेंट हिंदुस्थानात आहे.

उसापासून इथेनॉल निर्मिती कामाला चालना दिली गेली. पेट्रोल मधील इथेनॉलचे प्रमाण वाढवले जात आहे. सध्या इथेनॉलची निर्मिती 1200 कोटी लिटर इतकी केली जाते. पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण जसे वाढत जाईल, त्यानुसार इथेनॉलचे उत्पादन देखील वाढवले जात आहे. मका, तांदूळ, ज्वारी, बांबू कचऱ्यापासून देखील निर्मिती करण्यासाठी कार्य केले जात आहे. 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या देखील आता येत आहेत. मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिल्यापासून बिहारमध्ये मक्याचा असणारा 1200 रुपये भाव 2600 रुपयावर पोहोचला आहे. सीएनजी, नॅचरल गॅस, बायो सीएनजी उत्पादनाला देखील प्राधान्य दिले जात आहे. येणाऱ्या दिवसात शेतीमालाच्या उत्पादनातूनच विमानाचे इंधन देखील बनवले जाईल आणि तो शेती विकास सर्वोच्च असेल शेतकरी फक्त अन्नदाताच नाही तर तो ऊर्जादाता व इंधनदाता देखील आहे.

शेती व्यवसायाला दूध उत्पादनाचा म्हणजेच पशुपालनाचा व्यवसाय हा जोड व्यवसाय आहे. दूध उत्पादन वाढवण्यासाठी जनावरांची पैदास देखील त्याप्रमाणे असायला हवी. देशी गाई व म्हैशी अधिक अधिक दूध देतील, अशी पैदास निर्माण करण्यासाठी नियोजन केले जात आहे. शेती व्यवसायात रासायनिक खते औषधे पारंपारिक पद्धतीने वापरली जातात. पण पारंपारिक पद्धतीने वापरली जाणारी खते ही फक्त 25 टक्केच वापरात येतात बाकीची 75 टक्के वाया जातात. पण नव्या नॅनो तंत्रज्ञानाच्या खतांच्या वापरातून शेतीला 75 टक्के लाभ होतो. तर फक्त 25 टक्के खत वाया जाते औषध फवारणीसाठी ड्रोन पद्धतीचा वापर केला गेला पाहिजे. यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत त्याचा लाभ घेतला पाहिजे.

आपल्याकडे पाणी कमी नाही पण नियोजना विना पाणी कमी पडत आहे. धावणारे पाणी कसे चालेल चालणारे पाणी कसे थांबेल?, थांबलेले पाणी वापरात कसे येईल?, वापरात आलेले पाणी आपल्याच जमिनीत कसे मुरेल? याचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. पाणी आडवा, पाणी जिरवा! ही मोहीम महत्त्वपूर्ण आहे. तलाव निर्माण करून अधिक तर पाणी वापरात आणले पाहिजे. पाणी वापरण्याची माहिती सगळ्यांना आहे. पण साठवण्याची नाही हे समजून घेतले पाहिजे. देशाचा विकास होण्यासाठी आयात कमी आणि निर्यात वाढली पाहिजे आणि ते ज्ञानातूनच शक्य आहे. देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आरोग्य शिक्षण शेती विकासाला पाठबळ द्या. योग्य काम करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे रहा. डॉ. प्रभाकर कोरे यांचा आज झालेला गौरव हा व्यक्तीचा नसून त्यांच्या कार्याचा आहे. या कार्यातून प्रेरणा घेतली तरच हा सत्कार सत्कारणी लागेल लागेल असे सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article