अनमोड घाटातील खचलेला रस्ता कोसळला
गोवा-बेळगाव वाहतूक एकतर्फी सुरू
प्रतिनिधी/ धारबांदोडा
अनमोड घाटातील खचलेला रस्ता अखेर शुक्रवारी रात्री एका बाजूने कोसळला. रस्त्याची एक बाजू कोसळल्याने येथून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे अनमोड घाटातून होणारी गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक सध्या एकतर्फी सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
अनमोड घाटातील दूधसागर मंदिरपासून मोलेच्या बाजूने साधारण 30 मीटरच्या अंतरावर हा रस्ता एका बाजूने खचून भेगा पडल्या होत्या. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर बॅरिकेड्स घालून एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. तसेच तडे गेलेल्या ठिकाणी काँक्रिट घालण्यात आले होते. याठिकाणी जुनी संरक्षक भिंत होती. तरीही गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे हा रस्ता खचला. भेगा पडलेल्या ठिकाणी तातडीने खालच्या बाजूने नव्याने संरक्षक भिंत उभारण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने कामात अडथळे निर्माण होत आहेत. रस्ता खचल्यानंतर सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून अवजड वाहनांना या मार्गावरून बंदी घालण्यात आली असून ही वाहने दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. दक्षिण गोव्याचे वाहतूक पोलीस उपअधीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई, फोंडा वाहतूक पोलीस विभागाचे निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रीय महामार्गाचे अभियंते योगेश शहापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बांधकाम खात्यातर्फे नव्याने संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
अवजड वाहतुकीला 2 सप्टेंबरपर्यंत बंदी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
अनमोड घाटात भूस्खलन झाले व त्यामुळे रस्त्याचा एक भाग कोसळला. त्यामुळे हा रस्ता अवजड वाहतुकीला धोकादायक बनल्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांनी पुढील 60 दिवसांसाठी अवजड वाहतुकीला बंदी घातली आहे. ही बंदी 2 सप्टेंबर 2025 पर्यंत असेल. खराब झालेल्या मार्गावर अवजड वाहनांची सतत हालचाल सार्वजनिक सुरक्षेसाठी, रस्ते वापरकर्त्यांसाठी गंभीर धोका निर्माण करणारी ठरू शकते तसेच रस्त्याच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी बिघाड होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही दुर्घटना किंवा जीवितहानी टाळण्यासाठी प्रभावित भागात वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवा वाहने आणि प्रवासी वाहतूक बसेस वरील निर्बंधातून वगळण्यात येतील. कोणत्याही अनूचित घटना टाळण्यासाठी दक्षिण गोवा पोलिस उपअधीक्षक (वाहतूक) यांना देखरेख ठेवण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला रस्त्याची आवश्यक दुरूस्ती करून तो पुन्हा मूळ स्थितीत आणण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली आहे. साठ दिवसांत हे काम पूर्ण करावे, असे आदेशात म्हटले आहे.