‘सीएसके’च्या कोंदणातील हिरा...आयुष म्हात्रे !
यंदाच्या ‘आयपीएल’नं अनेक कोवळ्या चेहऱ्यांना संधी दिलीय आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांनीही त्याचा फायदा उठवत आपली मोहर उमटविलीय...यात राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी, पंजाब किंग्सचा प्रियांश आर्य यांच्याबरोबर समावेश होतो तो चेन्नई सुपर किंग्सच्या आयुष म्हात्रेचाही...मुंबई ते ‘सीएसके’ या आयुषच्या विलक्षण प्रवासावर टाकलेली ही नजर...
वर्ष 2018...चेन्नई सुपर किंग्सनं (सीएसके) इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुन्हा पाऊल ठेवलं होतं ते दोन वर्षांच्या बंदीला तोंड दिल्यानंतर...त्यांनी लिलावाच्या वेळी निवड केली ती वरिष्ठ खेळाडूंचीच अन् 19 वर्षांखालील जगज्जेत्या भारतीय संघातील शुभमन गिल, पृथ्वी शॉ, रायन पराग, अभिषेक शर्मा वगैरे प्रतिभावान युवा खेळाडूंकडे पाहिलं सुद्धा नाही. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी ‘सीएसके’ला ‘डॅड्स आर्मी’ म्हणायला प्रारंभ केला होता...मालक एन. श्रीनिवासन यांनी त्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं होतं की, धोनीच्या मते, आयपीएलमध्ये अनुभवाला पर्याय नाहीये. तुम्हाला संघ कसा चमकतो ते लवकरच कळेल...कर्णधार धोनीची भूमिका अक्षरश: सार्थ ठरली आणि चेन्नई सुपर किंग्सनं त्यानंतरच्या सहा वर्षांत ‘आयपीएल’चा किताब जिंकला तो तब्बल तीन वेळा...
परंतु 2024 साल उजाडलं नि तडे पडण्यास प्रारंभ झाला. यावेळी तर पाठीराख्यांच्या लक्षात येण्यापूर्वीच ‘इंडियन प्रीमियर लीग’मधील त्यांची मोहीम संपली...त्यानंतरच्या दिवसांत हळूहळू चेन्नईच्या भूमिकेत बदल होण्यास प्रारंभ झालेला असून आता दर्शन घडतंय ते कोवळ्या मुलांचं तसंच विशीतील तरुणांचं. त्यात समावेश 20 वर्षांच्या शेख रशिदचा, दक्षिण आफ्रिकेच्या ब्रेव्हिसचा, वंश बेदीचा, आंद्रे सिद्धार्थचा आणि 17 वर्षं 294 दिवसांच्या, तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या मुंबईच्या आयुष म्हात्रेचा...
आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्धच्या सामन्यात जिंकण्यासाठी 214 धावांची आवश्यकता असलेल्या ‘सीएसके’नं अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली आणि त्यात फार मोठा वाटा होता तो आयुष म्हात्रेचा. त्यानं दर्शन घडविलं ते वयाला न शोभेल अशा प्रगल्भ वृत्तीचं. हा ‘पॉकेट हर्क्युलस’ संघातील कित्येक वरिष्ठ खेळाडूंपेक्षा जास्त भरवशाचा वाटला...आपल्या डावातील फिरकी गोलंदाज कृणाल पंड्याचा चौथाच चेंडू आयुषनं पुढं सरसावत मैदानाच्या बाहेर भिरकावला आणि त्यानंतर अचूक भुवनेश्वर कुमारला तर अक्षरश: तुडवलं. चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळविणं शक्य झालेलं नसलं, तरी त्यानं 48 चेंडूंत झोडपलेल्या 94 धावा यादगार ठरल्या...
म्हात्रेनं मुंबईतर्फे पदार्पण केलं ते गेल्या मोसमात, तर ‘सीएसके’नं त्याला उचलण्याचा निर्णय घेतला तो कर्णधार ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यामुळं. आयुषनं पाच वेळा जेतेपद मिळविणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात प्रवेश केला तेव्हा इंडियन प्रीमियर लीगला तीन आठवड्यांहून जास्त काळ लोटला होता. त्यानं दबावाची अजिबात पर्वा न करता मुंबई इंडियन्सला 15 चेंडूंत 32, तर सनरायझर्स हैदराबादला 19 चेंडूंत 30 धावांचा प्रसाद दिला. आयुष म्हात्रेला टी-20 मधील एक परिपूर्ण खेळाडू म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये आणि खुद्द ‘सीएसकेचे’ प्रमुख प्रशिक्षक व न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यांना देखील तसंच वाटतंय...
आयुष म्हात्रेत गुणवत्ता अगदी ठासून भरलीय...हात व डोळे यांच्यातील समन्वय अक्षरश: अप्रतिम आणि बॅटचा ‘सिल्की स्विंग’ भात्यात असलेला फलंदाज असंही त्याचं वर्णन करता येईल....‘फटके प्रत्येक फलंदाजाजवळ असतातच. पण त्यांचं मोठ्या मंचावर न घाबरता, कुठल्याही दबावाला बळी न पडता दर्शन घडविणं हे अत्यंत महत्त्वाचं. मला त्यामुळंच तो आवडतोय’, फ्लेमिंग यांचे शब्द...‘आयुषचा मुंबईचा ड्रेसिंग रूम ते चेन्नई सुपर किंग्सचा तंबू हा प्रवास कुठल्याही अडथळ्याविना सहज झालाय. ‘सीएसके’चा संघ ओळखला जातोय तो त्यांच्या शांत, संयमी वातावरणासाठी. म्हात्रेला तिथं शिवम दुबेसारख्या मुंबईच्याच खेळाडूंना भेटण्याची संधी मिळालीय. मला फार आवडतेय ती त्याची प्रगल्भता. तो प्रत्येक लढतीच्या वेळी अगदी आरामात असतो’, स्टीफन फ्लेमिंग त्याचे गुणविशेष सांगताना पुढं म्हणतात !
प्रतिभावान आयुष...
- 17 वर्षं 294 दिवसांचा आयुष म्हात्रे हा ‘सीएसके’तर्फे अर्धशतक ठोकणारा सर्वांत लहान खेळाडू. यापूर्वी हा विक्रम होता सुरेश रैनाच्या नावावर. रैनानं 2008 साली 21 वर्षं 148 दिवस वयावर अर्धशतकाची नोंद केली होती...इंडियन प्रीमियर लीगचा विचार करता अशी कामगिरी करणारा तो तिसरा सर्वांत तरुण खेळाडू ठरलाय...
- यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या 14 वर्षं 32 दिवसांच्या वैभव सूर्यवंशीनं गुजरात टायटन्सविरुद्ध जबलपूर इथं 28 एप्रिल या दिवशी, तर 17 वर्षं 175 दिवसांच्या रायन परागनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दिल्ली इथं 4 मे रोजी अशा पराक्रमाची नोंद केली होती...
- रोहित शर्मा हा आयुष शर्माचा सर्वांत आवडता खेळाडू. त्यानं क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला तो त्याची फलंदाजी पाहिल्यानंतरच...विशेष म्हणजे आयुष रोहितप्रमाणंच खेळण्याचा सतत प्रयत्न करतोय...
- मुंबई इंडियन्सतर्फे शर्मानं ‘सीएसके’विरुद्ध 45 चेंडूंत नाब्ााद 76 धावा काढल्यानंतर आयुष म्हात्रे संघाचा पराभव नि स्वत:ची फलंदाजी देखील विसरला...
- नेहमी नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देणारा भारताचा ‘टी-20’ कर्णधार सूर्यकुमार यादवलाही आयुष म्हात्रे खूप आवडतोय. अभिषेक शर्मा देखील सूर्याचा आवडता खेळाडू. ‘स्काय’नं आयुषचा उत्साह वाढविण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय आणि त्याला नुकतीच बॅट सुद्धा भेट दिलीय...
आयुषची प्रभावी वाटचाल...
- वयाच्या पाचव्या वर्षी सिझनबॉल क्रिकेट खेळू लागलेल्या आयुष म्हात्रेसाठी दिलीप वेंगसरकर यांनी ज्ञानाचा खजिनाच उघडला. परंतु तीन वर्षांनंतर त्याला त्यांची अकादमी सोडावी लागली ती दररोज पहाटे 5 वा. उठून विरार ते चर्चगेट हा प्रवास करणं कठीण जाऊ लागल्यानं...
- 10 व्या वर्षी आयुषनं ‘मिग क्रिकेट क्लब’मध्ये प्रवेश घेतला. विशेष म्हणजे त्या क्लबनं तसंच दिलीप वेंगसरकर यांनी त्याच्याकडून प्रशिक्षणासाठी एक रुपयाही घेतला नाही...
- म्हात्रेनं विरारच्या साईनाथ स्पोर्ट्स क्लबचं प्रतिनिधीत्व करण्यास सुरुवात केली ती वयाच्या 13 व्या वर्षी. त्या संघानं त्याला सरळ मुंबईच्या ‘अ’ विभागात ढकललं. त्यामुळं तिथं त्याला प्रचंड अनुभव मिळाला...
- आयुषच्या आजोबा म्हणजे आईचे वडील लक्ष्मीकांत आनंद नाईक यांनी म्हटलंय की, त्याच्या अंगातील गुणवत्तेचं दर्शन घडल्यामुळंच त्याला दिलीप वेंगसरकर यांच्या क्रिकेट अकादमीत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला...पुढं कितपत यश मिळणार हे अवलंबून असणार ते त्याच्यावरच...
- आयुष म्हात्रेच्या लहानपणीच्या प्रशिक्षकांच्या मते, त्याच्यात मोठे डाव खेळण्याची भूक दडलीय आणि त्याच्या झपाट्यानं वाढीस कारणीभूत ठरलाय तो हा गुण...
वडिलांची साथ...निराशेवर मात !
- आयुष म्हात्रेलाही इथंपर्यंत येताना बराच संघर्ष करावा लागलेला असून एका टप्प्यावर नैराश्याशी दोन हात करावे लागलेत तसंच तंदुरुस्तीच्या समस्यांवर मात करावी लागलीय. या अनिश्चिततेच्या काळात त्याला भक्कम साथ लाभली ती त्याचे बँकेत काम करणारे वडील योगेश म्हात्रे यांची...
- आयुषचं कुटुंब हे मध्यम वर्गातलं. बँकेची जबाबदारी सांभाळण्याची कसरत करत त्याचे वडील नेहमी सामन्यांवेळी त्याच्याबरोबर येत असत. मुलासाठी योगेश म्हात्रे त्यांनी एका वर्षापूर्वी आपल्या नोकरीला देखील सोडचिठ्ठी दिली...
- म्हात्रेचं पहिलं ध्येय होतं ते भारताचं 19 वर्षांखालील विश्वचषकात प्रतिनिधीत्व करण्याचं. मात्र त्याबाबतीत त्याला अनपेक्षित धक्का बसला आणि त्याला वेढलं निराशेनं...
- त्याला एनसीएच्या आघाडीच्या 30 खेळाडूंत समाविष्ट करण्यात आलं नाही ते शिबिरातील संघांच्या सामन्यांत अपयशी ठरल्यानं. यामुळं तो थोडसा खचल्याशिवाय राहिला नाही. परंतु प्रशिक्षकांनी त्याच्या तंत्रावर काम करण्यास केलेली सुरुवात त्याचा आत्मविश्वास पुन्हा वाढवून गेली...
- 2024-25 च्या विजय हजारे चषक स्पर्धेत आयुष म्हात्रेनं नागालँडविरुद्ध 117 चेंडूंत 181 धावा फटकावल्या...
- राजू प्रभू