धनगर समाजाने शिक्षणावर भर द्यावा : कुलगुरू डॉ. महानवर
दक्षिण सोलापूर :
धनगर समाजाने आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना सुसंस्कृत बनवावे, तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.
धनगर समाज कर्मचारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिवस्मारक, सोलापूर येथे आयोजित दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सिद्धारूढ बेडगनूर होते. यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, नायब तहसीलदार सुधाकर बंडगर, विलास पाटील, प्राचार्य अंबादास पांढरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व आरतीने झाली. माजी मुख्याध्यापक सदाशिव होनमाने यांनी संस्थेचा उद्देश सांगून प्रास्ताविक केले.
डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, “धनगर समाज पारंपरिक व्यवसायात गुंतलेला असून, शिक्षणाची अडचण आहे. मुलांना शिक्षणासाठी फिरत्या शाळांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनदरबारी संघटनेने पाठपुरावा करावा. समाजाने शासनाच्या योजनांचा लाभ घेत व्यवसायातही पुढे यायला हवे.”
श्रीकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले, “हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतल्यास अनुभव, नेतृत्व व आत्मविश्वास प्राप्त होतो. शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये अन्याय झाल्यास त्याविरोधात संघटित होण्याची तयारी हवी. शिक्षण घेत असतानाच भविष्यातील दिशा निश्चित करून त्यासाठी प्रयत्न करावेत.”
कार्यक्रमात धनगर समाजातील अनेक मान्यवरांचा डॉक्टरेट मिळविल्याबद्दल सन्मान करण्यात आला. त्यामध्ये डॉ. शहाजी ठोंबरे (इंग्रजी),डॉ. रामचंद्र धर्मशाळे (मराठी), डॉ. मंगल खांडेकर लवटे (फार्मसी) यांचा समावेश होता.
तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव होनमाने, डॉ. नरेंद्र ढेकणे, वरिष्ठ लिपिक नीळकंठ दुधभाते यांचाही गौरव करण्यात आला.
दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असलेली ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्कारकर्त्यांमध्ये ओंकार बंडगर, ओंकार बेडगनूर, सौ. कल्पना बेडगनूर, प्राचार्य अंबादास पांढरे, प्रा. देवेंद्र मदने, प्रा. संजय बनसोडे, प्रा. संतोष खेंडे, मुख्याध्यापक जयवंत हाके, भगवान बनसोडे, राम वाकसे, प्रशांत फत्तेपूरकर, सिद्राम वाघमोडे, शिवराया हांडे, सुभाष बंडगर, अविनाश आलदर, प्रा. शंभूदेव गावडे, निमिषा वाघमोडे, सौ. अनुजा शिंगाडे, शेखर बंगाळे, बिसलसिद्ध काळे आदींचा समावेश होता. ओंकार बंडगर यांनी विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य सिद्धारूढ बेडगनूर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश आलदर यांनी केले, तर प्रा. शंभूदेव गावडे यांनी आभार मानले. समाजातील सर्व स्तरांतील नागरिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.