For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भक्त माझ्यात सदा मिसळलेलाच असतो

06:35 AM Sep 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
भक्त माझ्यात सदा मिसळलेलाच असतो
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

भगवंत म्हणाले, जो अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंत:करणाने मला चिकटतो आणि मद्रूप होऊन माझीच भक्ती करतो. त्याबद्दल भगवंतांनी सांगितलेल्या अनन्य-चित्त जो नित्य स्मरे मज निरंतर । सदा मिसळला योगी तो सुखे मज पावतो ।। 14 ।।

ह्या श्लोकाचा आपण अभ्यास करत आहोत. त्यानुसार ते सांगतात की, माझ्या प्रिय भक्तांवर जेव्हा देह सोडण्याची वेळ येते त्यावेळी त्यांनी माझी आठवण काढली तरच मी त्यांच्याकडे जातो असे होत नाही. एखाद्याने मरणसमयी काकुळतीने जरी माझा धावा केला तरी मी धावत जातो मग भक्ताने मला हाक मारावी आणि मग मी तेथे जावे अशी वेळ मी येऊच देत नाही. मी आधीच तेथे हजर असतो. माझी अनन्य भक्ती करून त्यांनी मला जिंकून घेतलेले असते. त्यांच्या भक्तीचे माझ्यावर ऋण असते. त्यामुळे त्यांनी माझी आठवण करेपर्यंत मी वाट बघत बसत नाही. त्यांच्या ऋणाच्या परतफेडीकरता मी त्यांचा देह पडण्याच्यावेळी त्यांची सेवाचाकरी करतो. देहांतसमयीच्या वेदनांनी भक्त दु:खी होऊ नये म्हणून माझ्या या सुकुमार हातांनी मी त्याला आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. तो माझे करत असलेले स्मरण ही त्याच्यादृष्टीने दाट, थंडगार अशी सावली असते. ते स्मरण सतत चालू राहील ह्याची काळजी मी घेतो.

Advertisement

भगवंतांच्या ह्या सांगण्याचे प्रत्यंतर संत चरित्राचा अभ्यास केला की येते. संत हे ईश्वराचे चालते बोलते रूप असतात. त्यामुळे ईश्वर करू शकतो ते सर्व ते करू शकतात. श्री गोंदवलेकर महाराजांच्या एक बाई भक्त होत्या. अंत्यसमयी त्या जलोदराने आजारी होत्या. त्यामुळे त्यांना वेदना असह्य होत होत्या. श्रीमहाराजांनी त्यांना विचारले, बाई नामस्मरण चालू आहे ना, त्यावर त्या म्हणाल्या होय पण वेदना असह्य होत आहेत. त्यांना दिलासा देऊन श्रीमहाराज म्हणाले, बाई वेदना मी कमी करतो पण तुम्ही नाम घेत रहा. पुढे वेदनारहित अवस्थेत दोन, तीन दिवस बाई जगल्या. तोपर्यंत शांत चित्ताने त्यांचे नामस्मरण चालू होते. अशा पध्दतीने भगवंतांनी श्रीमहाराजांच्या रूपाने येऊन त्यांचा अंतकाळ साधून दिला.

माउली पुढे म्हणतात, भगवंतांनी सांगितले की, अंतसमयी विनाअडथळा नामस्मरण चालू राहिले की, भक्ताच्या मनात देह तात्पुरता असून आत्मा नित्य आहे हा विचार दृढ राहतो. त्यामुळे त्याला देहाचा मोह पडत नाही. म्हणून मरणाचे संकट भक्तावर कधीच ओढवत नाही. भक्त कोणत्याही संकटात न पडता माझ्याकडे येतो. आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून, अहंकाररूपी धूळ झाडून, शुद्ध वासना वेगळी काढून, त्या भक्ताचे मी माझ्याशी ऐक्य घडवून आणतो. जी वस्तू आपली असते तिच्यावर आपलं प्रेम असतं. ती कुणाला द्यायची वेळ आली किंवा हरवली तर आपल्याला चुटपुट लागते पण माझ्या भक्तांना देहाबद्दल प्रेम, आपलेपणा वाटत नसल्याने देहत्याग करताना, आता हा देह सोडून जावे लागणार ह्याचे वाईट वाटत नाही. दिसताना भक्त वेगळा आणि मी वेगळा असे दिसत असल्याने त्यांच्या मरणाच्या वेळेलाच मी येतो आणि त्यांना आपल्या स्वरूपात मिसळून घेतो असे वाटण्याची शक्यता आहे परंतु असे घडत नाही, कारण भक्त आणि मी जिवंतपणीच एकरूप झालेलो असतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.