For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भक्त आणि भगवंत एकमेकांसाठी जीव टाकत असतात

06:25 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
भक्त आणि भगवंत एकमेकांसाठी जीव टाकत असतात
Advertisement

भगवंत अर्जुनाला म्हणाले, तपस्वी, ज्ञानी व कर्मी ह्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून तू योगी हो. ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहून योगी वेगळा असतो. म्हणून तो कर्मनिष्ठांना पूज्य आहे. ज्ञानी पुरुष त्याची योग्यता जाणून असतात. तपस्वी लोकांच्यासाठी तो तपोनाथ आहे. योग्याला एव्हढे महत्त्व मिळण्याचे कारण म्हणजे जीव व परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणी त्याचे मन गुंतलेले असते. तो जरी देहधारी असला तरी त्याचा महिमा मोठा असतो, म्हणून तू योगी हो असे मी तुला नेहमी म्हणतो.

Advertisement

आणखी एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, कौटुंबिक जबाबदारी किंवा शारीरिक असमर्थतेमुळे ध्यानसाधना करणे ज्यांना शक्य नसते किंवा त्याची मनापासून आवडही नसते, अशा साधकांना ईश्वराची भक्ती करून कैवल्यसाक्षात्कार होऊ शकतो. पूर्ण श्रद्धेनं केलेल्या ईश्वराच्या भक्तीमुळेही असंप्रज्ञात समाधी साध्य होते कारण अत्यंत प्रेमाने ईश्वर भजनात रंगलेल्यांचा बुद्धिशी योग घडवून आणून, भगवंत त्यांना आत्मज्ञान प्राप्त करून देतात. म्हणून पौरूषप्रयत्नाने करत असलेल्या योगसाधनेला साधकाने ईश्वरस्मरणाची जोड द्यावी म्हणजे त्याचा योगाभ्यास जलद पूर्ण होतो.

नामस्मरण करताना जेव्हा साधकाचे चित्त जेव्हा ईश्वराशी एकरूप झालेले असते त्यावेळी पश्यन्ति, मध्यमा अथवा वैखरी वाणीने ईश्वराच्या प्रणवादि नाममंत्राचा जप तो करत असतो आणि जेव्हा ते ईश्वराशी एकरूप झालेले नसते तेव्हा ईश्वर आणि मी एकच आहोत अशा भावनेने नाम घेत असतो, ह्याला ईश्वराची पूर्ण श्रद्धेने केलेली भक्ती किंवा ईश्वरप्राणिधान असे म्हणतात. योगाभ्यासाला जर ईश्वरभक्तीची जोड मिळाली तर दुधात साखर पडते. जे योगी योगाभ्यासाबरोबर ईश्वराशी भक्तीने जोडले गेलेले आहेत ते योगी ईश्वराला थोर वाटतात.

Advertisement

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, माझ्या ठिकाणी मुरलेल्या अंत:करणाने जो मनुष्य माझी श्रद्धेने भक्ती करतो, तो मला सर्वश्रेष्ठ योगी वाटतो.

सर्व योग्यांमधे योगी जीव माझ्यात ठेवुनी । श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो ।। 47 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुना, जो योगी असतो तो देवांचा देव, माझे सुखसर्वस्व आणि माझा आत्मा असतो असे समज. त्याच्या दृष्टीने भजन करणारा, भजन व भज्य अशी भक्तिसाधनांची जी त्रिपुटी आहे, ती सर्व अनुभवाने त्याला माझेच रूप वाटत असते. त्यामुळे त्याच्या आमच्या प्रेमाचे स्वरूप शब्दाने सांगता येत नाही.

सहवासाने प्रेम वाढत जाते. आईचे मुलावरील प्रेम, मुलाला आईबद्दल वाटणारी ओढ, पतीपत्नीचे एकमेकांवरील प्रेम ही दृश्य जगातली आढळणारी प्रेमाची ठळक उदाहरणे आहेत परंतु ही मंडळी एकमेकांवर कितीही प्रेम करत असली तरी स्वत:चे अस्तित्व विसरलेली नसतात. भक्त आणि भगवंत ह्यांच्या एकमेकांवरील प्रेमाची तऱ्हाच वेगळी असते. ते स्वत:ला विसरून एकमेकांसाठी जीव टाकत असतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.